लालबागच्या राजाचे विसर्जन रविवारी, 7 सप्टेंबर रोजी रात्री उशिरा, म्हणजेच 33 तासांनंतर पार पडले. विसर्जनाला इतका विलंब लागण्याची ही पहिलीच वेळ असून यामुळे अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे. खासकरून सोशल मीडियावर लालबागचा राजा मंडळाच्या कार्यकर्त्यांच्या मुजोरीची शिक्षा त्यांना राजानेच दिल्याच्या असंख्य प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत.
नक्की वाचा: अखेर लालबागच्या राजाचे विसर्जन, मोठ्या प्रतिक्षेनंतर 'इतक्या' तासाने झाले विसर्जन
आगमन उशिरा झाले आणि सगळे गणित बिघडले!
हिरालाल वाडकर यांनी सांगितले की, लालबागचा राजा हा कोळी बांधवांचा आहे, वाडकर बंधू कित्येक वर्षांपासून विसर्जनाची सेवा करत आले आहेत. यंदा विसर्जनाला जो उशीर झाला, त्याची कारणे त्यांनी स्पष्ट केली. रविवारी भरती असल्याने समुद्राला जोर होता, याचा अंदाज विसर्जन करणाऱ्यांना बांधता आला नाही. वाडकर यांनी म्हटले की, पाण्याला जोर असल्याने विसर्जनासाठीची ट्रॉली जमिनीमध्ये अडकून राहिली होती, यामुळे मोठ्या अडचणी निर्माण झाल्या. जोपर्यंत ट्रॉलीवर बाप्पा चढवणार नाही तोपर्यंत त्याचे विसर्जन केले जाऊ शकत नव्हते. वाडकर यांनी सांगितले की ते विसर्जनासाठी दोन बोटींचा तराफा करून विसर्जन करत होते, ही जुनी पद्धत किती प्रभावी होती हे रविवारच्या प्रकारावरून लक्षात आले.
नक्की वाचा: 8 किमीसाठी 20 तास; 'या' 5 परंपरांमुळे लालबागच्या राजाच्या विसर्जनाला लागतो इतका वेळ
पैशांचा बाप्पा झालाय!
गेल्या 20 वर्षांपासून लालबागच्या राजाचे विसर्जन गुजरातहून आणलेल्या तराफ्यावरून केले जात आहे, ज्यात कोळी बांधवांची पारंपरिक मदत घेतली जात नाही, याबद्दल वाडकर यांनी खंत व्यक्त केली. आम्ही वाडकर बंधू सुरुवातीपासून सेवा करत होते मात्र गेली 20 वर्ष आम्ही ही सेवा थांबवली आहे. लालबागच्या राजाच्या विसर्जनाची परंपरा खंडित झाल्याने आपल्याला फार वाईट वाटतं असं त्यांनी म्हटलं. लालबागचा राजा पैशाचा बाप्पा झालाय असं म्हणत वाडकर यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. लालबागचा राजा मंडळाने गुजरातहून आणलेला तराफा येताच कोळी बांधवांची सेवा घेणे बंद करून टाकले, याबद्दल विचारले असता वाडकर यांनी म्हटले की, मंडळासमोर आम्ही काय बोलणार?