सूरज कसबे, प्रतिनिधी
Mumbai Pune Expressway Landslide: मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवरून प्रवास करणाऱ्या नागरिकांसाठी एक अत्यंत महत्त्वाची आणि चिंताजनक बातमी आहे. या महामार्गावर आज दुपारी ( मंगळवार, 7 जुलै 2026) अचानक दरड कोसळल्याची घटना घडली आहे. दुपारी 3:30 ते 4:00 च्या दरम्यान मुंबईहून पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावरळ दरड कोसळली. डोंगरावरून आलेले दगड आणि माती थेट रस्त्यावर आल्यामुळे या मार्गावरील वाहतुकीला मोठा ब्रेक लागला आहे.
कधी होणार वाहतूक सुरळीत?
या घटनेनंतर प्रशासनाने सुरक्षेच्या दृष्टीने तातडीने पावले उचलली असून, सध्या पुणे मार्गावरील वाहतूक तात्पुरती एकाच लेनवरून सुरू ठेवण्यात आली आहे. महामार्गाची देखभाल करणाऱ्या आयआरबी कंपनीकडून युद्धपातळीवर रस्त्यावरील दगड-माती हटविण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. सुमारे एका तासात रस्ता पूर्णपणे मोकळा करून वाहतूक पूर्ववत करण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे. अत्यंत दिलासादायक बाब म्हणजे या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही किंवा मोठी दुर्घटना घडलेली नाही.
( नक्की वाचा : BMC News: 4 वर्षे काम करूनही कमी पडलो, पावसाळ्यातील 'त्या' जीवघेण्या धोक्यावर पालिका आयुक्तांची मोठी कबुली )
सोमवारीच होता बंद
यापूर्वी म्हणजेच काल सोमवारी मुसळधार पावसामुळे मिसिंग लिंकच्या शेवटच्या टप्प्यात मोठी दरड कोसळल्याने हा मार्ग पूर्णपणे बंद करण्यात आला होता. यामुळे प्रवाशांचे अतोनात हाल झाले होते. महामार्ग पोलिसांच्या 8 ते 9 तासांच्या अथक प्रयत्नांनंतर रस्त्यावरील मलबा पूर्णपणे हटवून मिसिंग लिंकच्या दोन लेन पुन्हा वाहतुकीसाठी खुल्या करण्यात आल्या होत्या.
सोमवारच्या घटनेनंतर पुण्याहून मुंबईकडे जाणारी वाहतूक आता कुठे सुरळीत सुरू झाली होती. ही वाहतूक पूर्ववत झाल्यानंतर काही तासांचा अवधी उलटत नाही तोच आज पुन्हा हे नवे विघ्न आले आहे. त्यामुळे मुंबई आणि पुण्याच्या दरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांना सलग दुसऱ्या दिवशीही मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत असून महामार्गावर वाहनांच्या रांगा लागण्यास सुरुवात झाली आहे.