छावा (Chhaava) चित्रपटातील छत्रपती संभाजी महाराज यांची भूमिका साकारलेल्या विकी कौशलचं (Vicky Kaushal) सध्या मोठ्या प्रमाणात कौतुक होत आहे. विकी कौशलनं या सिनेमात संभाजी महाराजांची भूमिका दमदार पद्धतीनं साकारली आहे. हिंदी चित्रपटात काम करणाऱ्या विकी कौशलचं मराठी देखील तितकंच उत्तम आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून मराठी भाषा गौरव दिनानिमित्त शिवाजी पार्क येथे झालेल्या कार्यक्रमात हे सर्वांना दिसलं. विकी कौशल यांनी यावेळी त्याच्या मनोगताची सुरुवात 'जय भवानी, जय शिवराय' नं करत सर्वांची मनं जिंकली.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
काय म्हणाला विकी?
विकी कौशल यावेळी बोलताना म्हणाला की, 'खरं सांगू तर मी खूप नर्व्हस फिल करतोय. मी दहावीपर्यंत मराठी शिकली आहे. मी मराठी बोलू शकतो. दहावीमध्ये मराठीमध्ये जास्त मार्क्स आले होते. इंग्रजीमध्ये कमी मिळाले होते. पण, ती इतकी चांगली नाही. चूक-भूल माफ.'
जावेद अख्तर यांच्यानंतर इथं येऊन कविता वाचणे हा माझ्या आयुष्यातील सर्वात खडतर प्रसंग आहे. अमराठी असूनही ज्याचा जन्म महाराष्ट्रात झालाय. ज्याचं शिक्षण महाराष्ट्रात झालंय. जो काम महाराष्ट्रात काम करतो. त्याचं आज या शिवाजी पार्काच्या स्टेजवर मराठी भाषा दिनाच्या दिवशी असणे ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे.
( नक्की वाचा : 'कोण तू रे कोण तू...', शिवाजी पार्कवर गाजली राज ठाकरेंची सुंदर कविता )
आशा भोसले म्हणाल्या तौबा-तौबा
मी इथं बसलो होते. त्यावेळी माझ्या जवळ बसलेल्या आशा मॅम (आशा भोसले) यांनी अगदी भीत-भीत मला विचारलं तू देखील कविता वाचणार?. मी म्हणालो हो. मराठीमध्ये? मी म्हणालो हो. आशा मॅम म्हणाल्या तौबा, तौबा..' मी इथं प्रयत्न करणार आहे, असं सांगत विकीनं कवी कुसामग्रज यांची अजरामर 'कणा' कविता सादर केली.
छावा चित्रपट केल्यानंतर मला 'कणा' या शब्दाचा अर्थ कळाला, असं विकीनं यावेळी आवर्जुन सांगितलं.
विकी कौशलनं सादर केलेली कविता
कवितेचे नाव - कणा
ओळखलत का सर मला? – पावसात आला कोणी,
कपडे होते कर्दमलेले, केसांवरती पाणी.
क्षणभर बसला नंतर हसला बोलला वरती पाहून :
गंगामाई पाहुणी आली, गेली घरट्यात राहुन.
माहेरवाशीण पोरीसारखी चार भिंतीत नाचली,
मोकळ्या हाती जाईल कशी, बायको मात्र वाचली.
भिंत खचली, चूल विझली, होते नव्हते नेले,
प्रसाद म्हणून पापण्यांवरती पाणी थोडे ठेवले.
कारभारणीला घेउन संगे सर आता लढतो आहे
पडकी भिंत बांधतो आहे, चिखलगाळ काढतो आहे,
खिशाकडे हात जाताच हसत हसत उठला
पैसे नकोत सर, जरा एकटेपणा वाटला.
मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा
पाठीवरती हात ठेऊन, फक्त लढ म्हणा!
-कवी कुसुमाग्रज