Maharahtra Rain Update : दिवाळी संपली तरी पावसाचा अद्याप संपलेला नाही. या आठवड्यात राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाने हजेरी लावल्यानंतर आता पुढील आठवड्यातही हवामान विभागाकडून पावसाचे संकेत देण्यात आले आहेत. त्यामुळे तुळशीचं लग्न केल्याशिवाय पाऊस परतणार नसल्याचं म्हटलं आहे.
अरबी समुद्रासह बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे बुधवारपर्यंत हवामान विभागाकडून पावसाचा अंदाज व्यक्त केला जात आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भाला पावसाचा इशारा देण्यात आला आहे. बंगालच्या उपसागरातील क्षेत्राचे चक्रीवादळात रुपांतरण होणार असल्याची शक्यता असून यामुळे मुंबईसह जवळील जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट देण्यात आला आहे.
26 ऑक्टोबर ते 30 ऑक्टोबरपर्यंत राज्यातील अनेक जिल्ह्यांना पावसाचा इशारा देण्यात आला आहे. अनेक जिल्ह्यांना यल्लो अलर्ट देण्यात आला असून ढगांच्या गडगडाटासह पावसाची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे नागरिकांनी गोंधळ टाळण्यासाठी घराबाहेर पडताना छत्री घेऊनच पडावे.
26 ऑक्टोबर -
आज 26 ऑक्टोबर रोजी राज्यातील अनेक जिल्ह्यांना यल्लो अलर्ट देण्यात आला आहे. यामध्ये कोकणातील सर्व जिल्हे, परभणी, हिंगोली आणि नांदेड सोडता मराठवाडा इतर जिल्हे, मुंबई, पुण्यासह उत्तरेकडील जिल्ह्यात पावसाची शक्यता व्यक्त केली जात आहे.
27 ऑक्टोबर -
27 ऑक्टोबरलाही मराठवाडा सोडता इतर जिल्ह्यांना पावसाचा यल्लो अलर्ट देण्यात आला आहे. यादिवशी वीज आणि ढगांच्या गडगडाटाची शक्यता व्यक्त केली जात आहे. याशिवाय कोकण, मुंबई, पुणे, ठाणे या जिल्ह्यांनाही यल्लो अलर्ट देण्यात आला आहे.
नाशिक जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट...
हवामान विभागाने नाशिक जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट दिला असून मनमाडसह जिल्ह्यात अनेक तालुक्यात रात्रीपासून संततधार सुरू आहे. मनमाडमधून वाहणाऱ्या पांझण व रामगूळना नदीला पूर आला असून या पुरामुळे नदीवरील पुलावरून पाणी वाहू लागले आहेत. तर नदी काठच्या गवळी वाड्यातील घरांमध्ये पाणी शिरले तर त्यांची दुभती जनावरे सुरक्षित हलवावे लागले.
सिंधुदुर्गात भातशेतीचं मोठं नुकसान...
सिंधुदुर्ग जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे भातशेतीचं मोठं नुकसान झालं आहे. शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेलं पीक पाण्यात गेले असून अनेक ठिकाणी भाताला कोंब फुटू लागल्याने शेतकरी चिंतेत आहे. शेतकऱ्याला संकटातून उभ करण्यासाठी शासनाने ठोस पावले उचलावीत अशी मागणी केली जात आहे. तत्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी ठाकरे शिवसेनेने केली आहे.