अविनाश पवार
"रेंज रोव्हर कार घेण्याचं माझं स्वप्न होतं. मला जी गोष्ट हवी असते ती हवी असते आणि शुभम मला ती मिळवून देतो. मला जे हवं असतं ते देण्याची सवयच माझा नवरा शुभम याने लावली आहे." कारेगावच्या माजी सरपंच निर्मला नवले यांचं हे विधान बरंच गाजलं होतं. नवऱ्याने दिलेली Range Rover कार पाहून लहान मुलासारख्या उड्या मारतानाचा व्हिडीओ निर्मला नवले यांच्या युट्युब चॅनेलवरून प्रसिद्ध करण्यात आला होता. 'सरपंच पदावर एवढं कमवता येत माहित नव्हतं' अशा आशयाच्या बऱ्याच प्रतिक्रिया या व्हिडीओवर दिसून येत होत्या.
कोण आहेत निर्मला नवले ?
निर्मला नवले या माजी सरपंच आहेत. सोशल मीडियावर त्यांचे 5 लाखांहून अधिक फॉलोअर्स असून त्यांचा रेज रोव्हर मिळाल्यानंतर आनंद व्यक्त करणारा व्हिडीओ बराच गाजला होता. आयटी इंजीनिअर असलेल्या निर्मला या सरपंच झाल्यानंतर उच्चशिक्षित सरपंच असे त्यांचे कौतुक केले जात होते. अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने त्यांना उमेदवारी दिली होती आणि त्या जिंकूनही आल्या होत्या.
शिरूरमधल्या कारेगांवमधून निर्मला नवले यांना पुन्हा संधी
राज्यामध्ये 12 जिल्हा परिषदा आणि 125 पंचायत समितीसाठी निवडणुका झाल्या. यामध्ये शिरूर पंचायत समितीचाही समावेश आहे. कारेगाव गणातून निर्मला नवले यांना अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने उमेदवारी दिली होती. भाजपच्या मनीषा पाचंगे यांना त्यांच्याविरोधात उमेदवारी देण्यात आली होती. या निवडणुकीत निर्मला नवले यांचा पराभव झाला आहे. मनीषा पाचंगे यांनी या गणातून विजय मिळवला आहे. मनीषा यांनी निर्मला नवले यांचा 2700 मतांनी पराभव केला आहे.