सुनील महाडेश्वर
दहिहंडीचा सराव सुरू असताना 6 व्या थरावरून कोसळून 11 वर्षीय मुलाचा मृत्यू झाला आहे. दहिसरच्या केतकीपाडा येथे रविवारी रात्री ही दुर्घटना घडली. हा चिमुकला गोविंदा नवतरुण मित्र मंडळ पथकातील सदस्य होता. याप्रकरणी दहिसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. तरुणाईच्या सळसळत्या उत्साहाने भरलेला दहीहंडी उत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेला आहे. त्या आधीच ही दुर्दैवी घटना घडली आहे.
‘ढाक्कुमाक्कुम ढाक्कुमाक्कुम', ‘गोविंदा रे गोपाळा', ‘मच गया शोर सारी नगरी रे' या गाण्यांचे सूर कानी पडू लागले आहेत. 16 ऑगस्टला होणार्या दहिहंडी उत्सवाची मुंबईत जोरदार तयारी सुरू आहे. मुंबईसह राज्यांत ठिकठिकाणची गोविंदा पथके रात्रीचा जागर करून मानवी मनोरे रचण्याचा सराव करीत आहेत. आगामी पालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर लाखो रुपयांच्या बक्षिसांचे वाटप होणार आहे. त्यावरून वर्चस्वाची हंडी फोडण्यासाठी राजकीय पक्षही मैदानात उतरले आहेत. त्यामुळे उंच थर रचण्याची स्पर्धा वाढू लागली आहे. मात्र या उंच थराच्या स्पर्धेत एका चिमुकल्याला आपला जीव गमवावा लागला आहे.
दहिसरच्या केतकीपाडा येथे रविवारी रात्री नेहमीप्रमाणे नवतरूण मित्रमंडळाचे पथक गोविंदाचा सराव करत होते. या पथकात महेश रमेश जाधव या चिमुकल्या गोविंदाचा समावेश होता. पथकाने 6 थर लावले होते. महेश 6 व्या थरावर चढला होता. रात्री पावणे दहाच्या सुमारास तो 6 व्या थरावरून कोसळला. पण त्याला झेलण्याच्या आत तो जमिनीवर पडला. त्याला उपचारासाठी दहिसर पूर्वेच्या प्रगती रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. या दुर्घटनेमुळे परिसरात मोठी शोककळा पसरली आहे.
याप्रकरणी आयोजक मंडळाविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती दहिसर पोलिसांनी दिली. सराव करताना मंडळाने सुरक्षेचे उपाययोजना करणे आवश्यक होते. मात्र ते केलेले दिसून आले नाहीत, असे पोलिसांनी सांगितले. सराव करताना सुरक्षेचे सर्व उपाय करणे गरजेचे आहे. एक छोटी चुकही त्यामुळे जीवावर बेतू शकते. त्याचाच प्रत्यय दहीसरच्या केतकीपाडा इथे आला.