भाजपामध्ये मराठा विरुद्ध ब्राह्मण वाद ?; 'स्वतःला OSD समजता का?' मेधा कुलकर्णींचा अभिमन्यू पवारांना थेट सवाल

Medha Kulkarni Abhimanyu Pawar fight: आमदार अभिमन्यू पवार यांनी आपल्याला जातीवरून डिवचल्याचा खळबळजनक दावा मेधा कुलकर्णी यांनी केला आहे.

जाहिरात
Read Time: 3 mins
Medha Kulkarni vs Abhimanyu Pawar: खासदार मेधा कुलकर्णी यांनी आमदार अभिमन्यू पवार यांच्यावर अत्यंत टोकदार शब्दांत टीका केली.
मुंबई:

Medha Kulkarni Abhimanyu Pawar fight: राज्यातील सत्ताधारी भारतीय जनता पक्षामध्ये एका मोठ्या अंतर्गत वादाचा स्फोट झाला आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वतः उपस्थित असलेल्या एका जाहीर शासकीय कार्यक्रमात भाजपच्या दोन बड्या नेत्यांमध्ये थेट जातीच्या मुद्द्यावरून जोरदार खडाजंगी झाल्याचे समोर आले आहे. भाजप खासदार मेधा कुलकर्णी आणि आमदार अभिमन्यू पवार यांच्यातील हा वाद आता चव्हाट्यावर आला असून, मेधा कुलकर्णी यांनी अत्यंत संतप्त होत थेट जाहीर कार्यक्रमातून एक्झिट घेतली. आमदार अभिमन्यू पवार यांनी आपल्याला जातीवरून डिवचल्याचा खळबळजनक दावा मेधा कुलकर्णी यांनी केला आहे, ज्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.

नेमकं काय घडलं?

छत्रपती राजर्षि शाहू महाराज यांच्या जयंतीदिनी 'सारथी' संस्थेच्या वतीने एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासह अनेक मंत्री आणि आमदार-खासदार उपस्थित होते. कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी पहिल्या रांगेतील काही खुर्च्या रिकाम्या होत्या. तिथे उपस्थित असलेल्या शासकीय अधिकाऱ्यांनी प्रोटोकॉलनुसार खासदार मेधा कुलकर्णी यांना पहिल्या रांगेत बसण्याची विनंती केली. 

Advertisement

मात्र, त्याच वेळी तिथे आलेल्या आमदार अभिमन्यू पवार यांनी मेधा कुलकर्णी यांना पहिल्या रांगेत बसण्यापासून रोखल्याचा आरोप आहे. हा कार्यक्रम मराठा समाजाचा आहे, तुम्ही इथे पहिल्या रांगेत बसणे शोभत नाही, असा थेट टोमणा अभिमन्यू पवार यांनी मारल्याचा दावा मेधा कुलकर्णी यांनी केला आहे. हे ऐकून प्रचंड अपमानित झालेल्या मेधा कुलकर्णी यांनी  तो कार्यक्रम सोडून जाणे पसंत केले.

( नक्की वाचा : 'त्या' एका गोष्टीमुळे ठाकरेंना 'जय महाराष्ट्र' केला; बंडखोर खासदाराने जाहीरपणे सांगितली मनातील खरी खंत )
 

मेधा कुलकर्णींचा संताप

या घटनेनंतर खासदार मेधा कुलकर्णी यांनी आमदार अभिमन्यू पवार यांच्यावर अत्यंत टोकदार शब्दांत टीका केली. त्या म्हणाल्या की, हा कार्यक्रम सरकारचा होता आणि तिथे आसनव्यवस्था सरकारी प्रोटोकॉलनुसार केली जाते, कोणाची जात बघून नाही. मी नेहमीच हिंदू समाज म्हणून एकत्र येण्याची भाषा करते, मग इथे जातीचा विषय आलाच कुठून? 

 मेधा कुलकर्णी यांनी यावेळी बोलताना थेट सवाल केला की, अभिमन्यू पवार तुम्ही अजूनही स्वतःला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे ओएसडी (OSD) समजता का? मुख्यमंत्र्यांनी कोणाशी बोलावे आणि कोणाशी नाही, हे आता तुम्ही ठरवणार का? मेधा कुलकर्णींनी बोलावलेली माणसे आत सोडू नका आणि मी बोलावलेलीच माणसे आत सोडा, असे पोलिसांना सांगण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिला, असा संतप्त सवालही त्यांनी उपस्थित केला.

( नक्की वाचा : Operation Tiger चा दुसरा अंक! खासदारांपाठोपाठ 14 आमदारही शिंदेंसोबत जाणार? ठाकरे गटाची धाकधूक वाढली )
 

पवारांना करुन दिली आठवण

मेधा कुलकर्णी यांनी अभिमन्यू पवार यांच्या जुन्या आठवणींची आठवण करून देत त्यांच्या राजकारणावर थेट निशाणा साधला. अभिमन्यू पवार जेव्हा निवडणूक लढवत होते, तेव्हा त्यांनी मला सतत फोन करून प्रचाराला येण्याची विनंती केली होती, असे कुलकर्णी यांनी सांगितले. लातूरमध्ये ब्राह्मण समाजातील मतदारांना आपल्याकडे वळवण्यासाठी त्यांनी मला साकडे घातले होते. त्यावेळी माझी तब्येत बरी नसतानाही मी केवळ पक्षासाठी तिथे जाऊन त्यांच्यासाठी प्रचार केला होता. आज मात्र त्यांना माझ्या जातीचा अडसर वाटत आहे, अशी खंत मेधा कुलकर्णी यांनी व्यक्त केली.

 अभिमन्यू पवार यांचे स्पष्टीकरण

या संपूर्ण वादानंतर आमदार अभिमन्यू पवार यांनी आपली बाजू मांडत मेधा कुलकर्णी यांचे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. पवार म्हणाले की, मेधा कुलकर्णी ताईंचा केवळ गैरसमज झाला आहे. मी त्यांना असे काहीही बोललो नाही. अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील हे तिथे आले होते, त्यामुळे ते पुढे बसतील आणि आपण लोकप्रतिनिधी म्हणून पाठीमागच्या रांगेत बसू, असे मी केवळ ताईंना म्हणालो होतो.

Advertisement

यावेळी कोणताही जातीचा वाद नव्हता आणि या विषयाला उगाच मोठे करण्यात काहीही अर्थ नाही. माझ्या बाजूला इतरही अनेक व्यक्ती उपस्थित होत्या, त्यांनी मी काय संवाद साधला तो ऐकला आहे, असे सांगत अभिमन्यू पवार यांनी मेधा कुलकर्णी यांना पुन्हा एकदा आपले शब्द आठवून पाहण्याची विनंती केली आहे.

Topics mentioned in this article