Ambernath News : सकाळी गर्दीच्या वेळेत हजारो प्रवाशांचा प्रवास सुरू असतानाच अंबरनाथ आणि उल्हासनगर दरम्यानच्या रेल्वे रुळावर असा काही प्रकार समोर आला, ज्यामुळे संपूर्ण रेल्वे प्रशासनाची धावपळ उडाली. डाऊन ट्रॅकवर थेट रेल्वे रुळांच्या मधोमध एक लोखंडी बॉक्स ठेवल्याचे निदर्शनास आले. सुदैवाने कर्जत लोकलच्या गार्डची नजर वेळेवर या वस्तूवर पडली आणि एक मोठा अनर्थ टळला. गार्डच्या सतर्कतेमुळे मोठा अपघात टळला असला तरी या घटनेने प्रवाशांच्या सुरक्षिततेवर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत.
काय आहे प्रकरण?
सकाळच्या सुमारास जेव्हा लोकल गाड्या प्रवाशांनी खच्चून भरून धावत होत्या, त्याच वेळी रुळांवर हा संशयास्पद लोखंडी बॉक्स दिसला. लोकलच्या गार्डने अजिबात वेळ न गमावता गाडी जागीच थांबवली. यानंतर त्यांनी इतर कर्मचाऱ्यांच्या मदतीने तो लोखंडी बॉक्स उचलून ट्रॅकवरून बाजूला केला. गार्डने दाखवलेल्या या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले असून सध्या सर्वत्र त्यांच्या या तत्परतेचे कौतुक होत आहे.
( नक्की वाचा : Pune News :पुण्यात शेजाऱ्याचाच दोन चिमुकल्या बहिणींवर अत्याचार; 61 वर्षांच्या नराधमाला ठोकल्या बेड्या )
घटनेचे गांभीर्य ओळखून या प्रकाराची माहिती तात्काळ बदलापूर आरपीएफ आणि जीआरपीला देण्यात आली. माहिती मिळताच रेल्वे सुरक्षा दलाचे पथक घटनास्थळी दाखल झाले. हा लोखंडी बॉक्स कोणी आणि कोणत्या उद्देशाने रुळावर ठेवला होता, की यामागे काही घातपाताचा कट होता, या दिशेने आता पोलीस कसून तपास करत आहेत.
ट्रेकच्या कामाचा भाग की घातपाताचा प्रयत्न?
या संपूर्ण प्रकरणाबाबत बदलापूर आरपीएफचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष अहिरवार यांनी माहिती दिली आहे. ही घटना आज (मंगळवार, 28 जुलै) सकाळच्या सुमारास घडली असून लोकल गार्डने लोखंडी बॉक्स बाजूला करून आरपीएफला कळवले होते. सध्या या परिसरातील रेल्वे ट्रॅकच्या आजूबाजूला काही कामे सुरू आहेत. त्यामुळे हा बॉक्स तिथे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांकडून अनावधानाने राहिला की कोणी मुद्दाम तिथे आणून ठेवला, याचा शोध घेतला जात आहे. घटनेनंतर सर्व यंत्रणा सतर्क झाल्या असून तपास वेगाने सुरू आहे.