मुंबई उपनगरीय रेल्वेच्या मध्य, पश्चिम आणि हार्बर मार्गावर रविवारी 25 ऑगस्ट ला मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे काही लोकल या काळात रद्द करण्यात आल्या आहेत. तर काही गाड्यांचे मार्ग हे बदलण्यात आले आहेत. त्यामुळे जर रविवारी घरा बाहेर पडण्याचे ठरवले असाल तर रेल्वेचे रविवारचे मेगाब्लॉक दरम्यानचे वेळापत्रक नक्की बघून घराबाहेर पडा असे आवाहन रेल्वेने केले आहे.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
रेल्वेच्या तीनही मार्गांवर अभियांत्रिकी काम केले जाणार आहे. त्यासाठी 25 ऑगस्टला मेगा ब्लॉक घेण्यात आला आहे. मध्य रेल्वेवर माटुंगा ते मुलुंड अप आणि डाऊन जलद मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात आला आहे. हा ब्लॉक सकाळी 11.05 ते दुपारी 3.05 वाजे पर्यंत असेल. त्यामुळे सीएसएमटीवरून सकाळी साडेदहा ते दुपारी पावणे तीन या काळात सुटणाऱअया डाऊन जलद मार्गावरील गाड्या माटुंगा आणि मुलुंड स्थानकादरम्यान डाऊन धिम्या मार्गावरून धावतील. त्यामुळे या लोकल पंधरा मिनिटे उशिराने धावणार आहे. दरम्यान ठाण्या पुढील जलद सेवा मुलुंड इथून डाऊन जलद मार्गावर धावतील.
ट्रेंडिंग बातमी - भर पावसात शरद पवारांचे आंदोलन, कार्यकर्त्यांना दिली शपथ
पश्चिम रेल्वे मार्गावर ही मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. बोरीवली ते गोरेगाव अप आणि डाऊन धिम्या मार्गावर हा ब्लॉक असेल. सकाळी 10 ते दुपारी 3 वाजेपर्यंत हा मेगाब्लॉक असेल. या ब्लॉकच्या कालावधीत बोरीवली आणि गोरेगाव स्थानका दरम्यानची अप आणि डाऊन लोकल सेवा जलद मार्गावरून सुरू राहील. त्यामुळे काही सेवा रद्द ही करण्यात आल्या आहेत. तर हार्बर सेवा गोरेगाव पर्यंतच सुरू राहाणार आहे. शिवाय ब्लॉक काळात बोरीवली स्थानकातील फलाट क्रमांक 1 ते 4 वरून कोणतीही लोकल धावणार नाही.
हार्बर मार्गावरही मेगाब्लॉक घेण्यात आला आहे. हा ब्लॉक पनवेल आणि वाशी अप डाऊन मार्गावर असेल. त्यामुळे पनवेल ते सीएसएमटी दरम्यान सकाळी 10.33 ते दुपारी 3.49 या काळात अप हार्बर मार्गावरील सेवा बंद राहाणार आहे. तर सीएसएमटी ते पनवेल बेलापूर डाऊन हार्बर मार्गावरील सेवा सकाळी पावणे दहा ते दुपारी सव्वा तीन या वेळेत बंद ठेवण्यात येणार आहे.
ट्रेंडिंग बातमी - आधी बदलापुरात सहानुभूती मग उल्हासनगरात जाऊन हातावर मेहंदी, चाकणकरांचं चाललंय काय?
मेगाब्लॉक दरम्यान काही विशेष सेवा चालवण्यात येणार आहे. हार्बर मार्गावर सीएसएमटी ते वाशी दरम्यान काही विशेष लोकल चालवण्यात येतील. तर ठाणे ते वाशी नेरूळ या ट्रान्स हार्बर मार्गावरील सेवा सुरू राहाणार आहेत. तर बेलापूर नेरूळ आणि उरण स्थानकादरम्यान पोर्ट लाईन सेवा सुरू राहील. त्यामुळे रविवारी बाहेर पडणार असाल तर हे वेळापत्रक नक्की पाहून बाहेर पडा.