MHADA News : मुंबईतील सर्वसामान्य माणसाचे स्वतःच्या हक्काच्या घराचे स्वप्न पूर्ण करणे दिवसेंदिवस अवघड होत चालले आहे. अशा परिस्थितीत गोरेगाव (पश्चिम) येथील मोतीलाल नगरच्या पुनर्विकासाचा एक महत्त्वाचा प्रकल्प चर्चेत आला आहे. म्हाडाकडून या प्रकल्पातील रहिवाशांना तब्बल 1600 स्क्वे. फुटांचे बिल्ट-अप क्षेत्र असलेले आलिशान घर मिळणार आहे. मुंबईच्या रिअल इस्टेटच्या इतिहासातील पुनर्विकास योजनेत रहिवाशांना इतके मोठे घर पहिल्यांदाच मिळत असल्याने सर्वत्र या प्रकल्पाची जोरदार चर्चा सुरू आहे.
काय आहे प्रकार?
गोरेगाव पश्चिममधील मोतीलाल नगर 1, 2, आणि 3 या चाळी आता खूपच जुन्या झाल्या आहेत. अनेक वर्षांपासून येथील 3700 पेक्षा जास्त रहिवासी नवीन घराच्या प्रतीक्षेत आहेत. म्हाडा स्वतःच हा पुनर्विकास करणार असल्याने प्रकल्पात कोणताही गैरव्यवहार किंवा फसवणूक होण्याची शक्यता नाही. ठरलेल्या वेळेत रहिवाशांना त्यांच्या हक्काचे नवीन घर मिळेल, अशी अपेक्षा आहे.
मुंबईकरांसाठी 'जॅकपॉट'
मुंबईत आज 300 ते 350 स्क्वे. फुटांचे घर विकत घेणेही सर्वसामान्यांसाठी स्वप्नवत आहे. त्यामुळेच अनेकजण विरार, कल्याण-डोंबिवली, बदलापूर-अंबरनाथ अशा उपनगरांमध्ये राहण्यास जातात. गोरेगावसारख्या प्राइम लोकेशनमध्ये सध्या 280 स्क्वे. फुटांच्या घरात राहणाऱ्या मोतीलाल नगरच्या रहिवाशांना 1600 स्क्वे. फुटांचे नवे घर मिळणे हा एक मोठा ‘जॅकपॉट' मानला जात आहे. नुकत्याच वरळी बीडीडी पुनर्विकास प्रकल्पात रहिवाशांना केवळ 500 स्क्वे. फुटांचे घर मिळाले होते, त्यामुळे मोतीलाल नगरचा प्रकल्पातील रहिवाशांना आता त्याच्या तिप्पट घर मिळणार आहे. इतकंच नाही तर
या घरात राहणाऱ्या पुढील पिढ्यांसाठीही ही एक मौल्यवान गुंतवणूक ठरणार आहे.
( नक्की वाचा : Patap Sarnaik : वाहनधारकांनो लक्ष द्या! PUC नसेल तर पेट्रोल-डिझेल मिळणार नाही, सरकारचा मोठा निर्णय )
रिअल इस्टेट क्षेत्रात खळबळ
मोतीलाल नगर एक आधुनिक टाउनशिप म्हणून विकसित होणार असल्याने रिअल इस्टेट क्षेत्रातील व्यावसायिकांचे या प्रकल्पाकडे लक्ष लागले आहे. या भागातील घरांच्या विक्री आणि भाड्याला भविष्यात चांगली किंमत मिळेल असा अंदाज आहे.
गोरेगावमधील एका अनुभवी रिअल इस्टेट एजंटनं दिलेल्या, "पुढील सहा-सात वर्षांत या 1600 स्क्वे. फुटांच्या घराला किमान 2 ते 2.5 लाख रुपये प्रति महिना भाडे मिळू शकेल. यामुळे रहिवाशांना चांगला आर्थिक फायदा होईल आणि एजंटनाही या व्यवहारातून चांगले कमिशन मिळेल."
मोतीलाल नगरमधील रहिवांशानी या निर्णयामुळे आनंद व्यक्त केलाय. येथील रहिवाशी नेहा गुप्ते यांनी सांगितलं की, "आमच्या दोन पिढ्या लहान आणि जुनाट घरांमध्ये राहिल्या आहेत. म्हाडाकडून सुसज्ज घर मिळणार असल्याने आमच्या पुढील पिढ्यांचे आयुष्य सुधारेल."
स्थानिक राजकारणाला सुरुवात
म्हाडाने पुनर्विकासाचा निर्णय घेतल्यापासून मोतीलाल नगरमध्ये अनेक स्थानिक समित्यांनी या प्रकल्पाविरोधात प्रचार सुरू केला आहे. मात्र या समित्यांमध्ये आपापसांत मतभेद आहेत, ज्यामुळे रहिवाशांचे नुकसान होत असल्याची भावना लोकांमध्ये निर्माण झाली आहे.
"आतापर्यंत आम्ही फक्त राजकारण आणि दिशाभूल पाहिली आहे. आम्हाला या सगळ्याचा कंटाळा आला आहे. हे राजकारण पुरे झाले, आता आम्हाला फक्त आमचे म्हाडाचे नवीन घर हवे आहे." अशी भावना या भागातील निवृत्त रहिवासी विजय पोवळे यांनी व्यक्त केली.