Passenger Falls from Local Train: पश्चिम रेल्वेच्या वैतरणा खाडी पुलावर काळजाचा ठोका चुकवणारी एक घटना समोर आली आहे. धावत्या लोकल ट्रेनमधून प्रवास करताना 25 वर्षीय तरुण अचानक तोल जाऊन थेट खाडीच्या पात्रात कोसळला. सुदैवाने, रेल्वे कर्मचारी आणि गावातील तरुणांच्या प्रसंगावधानामुळे या तरुणाचे प्राण वाचले आहेत. रात्रीच्या अंधारात मृत्यूशी झुंज देणाऱ्या या तरुणासाठी हे सर्वजण देवदूत ठरले असून त्यांच्या या धाडसाचे सध्या सर्वत्र कौतुक केले जात आहे.
रात्रीची गस्त आणि तो मदतीचा आवाज
ही थरारक घटना मंगळवारी, 10 फेब्रुवारी रोजी रात्री 10 ते 11 वाजण्याच्या सुमारास घडली. बोईसरचा रहिवासी असलेला उदय मंगेश वांगड हा तरुण लोकलने बोरिवलीच्या दिशेने जात होता. वैतरणा खाडीवरील पुलावरून ट्रेन जात असताना अचानक त्याचा हात सुटला आणि तो खाली कोसळला. त्याच वेळी रेल्वेच्या इंजिनिअरिंग विभागातील ट्रॅक मेंटेनर आणि ब्रिज गार्ड रमेश सिंह हे पुलावर गस्त घालत होते.
शांत रात्री त्यांना पुलाच्या खालून कोणाचे तरी ओरडण्याचे आवाज ऐकू आले. त्यांनी बारकाईने पाहिले असता, पुलाच्या 20 पिलरपैकी साधारण 10 व्या पिलरच्या खाचांना पकडून एक तरुण मदतीसाठी याचना करत असल्याचे त्यांच्या लक्षात आले.
काळ बनून आलेली ओहटी आणि जीव वाचवणारी बोट
रमेश सिंह यांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखून त्वरित रेल्वेच्या इतर कर्मचाऱ्यांना माहिती दिली. त्यांनी तातडीने वाढीव गावातील त्यांचे परिचयाचे आणि शिवसेना (शिंदे गट) शाखाप्रमुख गुरु पाटील यांच्याशी संपर्क साधला. माहिती मिळताच गुरु पाटील यांनी वेळ न घालवता उपशाखाप्रमुख साई पाटील यांना सोबत घेतले आणि आपली बोट घेऊन खाडीच्या पात्रात शिरले.
सुदैवाने त्यावेळी समुद्राला ओहटी असल्याने पाण्याचा वेग कमी होता, त्यामुळे उदय पिलरला घट्ट पकडून राहू शकला. या तिघांनी मिळून मोठ्या शिताफीने उदयला बोटीत घेतले आणि सुरक्षितपणे बाहेर काढले.
( नक्की वाचा : Pune News: आता थेट उड्डाणपुलावरून धावणार पुणे मेट्रो; नगर रोडचा प्रवास होणार सुसाट! वाचा सर्व माहिती )
आईच्या डोळ्यात आनंदाश्रू
खाडीतून बाहेर काढल्यानंतर उदयला वैतरणा रेल्वे स्थानकातील स्टेशन मास्टरच्या केबिनमध्ये नेण्यात आले. तेथे त्याच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले आणि सकाळी त्याला सुखरूप घरी सोडण्यात आले. आपल्या मुलाला मृत्यूच्या दाढेतून बाहेर काढणाऱ्या या देवदूतांबद्दल कृतज्ञता व्यक्त करताना उदयच्या आईला आपले अश्रू अनावर झाले.
माझ्या मुलाचे प्राण वाचवणाऱ्या या सर्वांना भेटून मला त्यांचे आभार मानायचे आहेत, अशी भावना त्यांनी 'NDTV मराठी'शी बोलताना व्यक्त केली. रमेश सिंह, गुरु पाटील आणि साई पाटील यांनी दाखवलेल्या या समयसूचकतेमुळे एका कुटुंबाचा आधार वाचला आहे.