मुंबई ते अहमदाबाद या बुलेट ट्रेन मार्गावर ठाणे जिल्ह्यातले म्हातार्डी हे रेल्वे स्थानक आहे. हे स्थानक ठाणे, कोपर रेल्वे स्थानक तसेच तळोजा मेट्रोला कसे व्यवस्थित जोडता येईल हे पाहण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. आज एमएसआरडीसी कार्यालयात झालेल्या बैठकीस उपमुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव नवीन सोना, महारेल तसेच हायस्पीड रेल्वेचे अधिकारी देखील उपस्थित होते.
ठाणे जिल्ह्यात बुलेट ट्रेनचे स्थानक दिवाजवळ म्हातार्डी येथे उभारले जात आहे. मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन मार्गावरील हे महत्त्वाचे जंक्शन असेल. पुढे चालून हे स्टेशन एकात्मिक वाहतूक केंद्र बनेल. हे स्थानक बुलेट ट्रेनसह रेल्वे, मेट्रो, बस आणि महामार्ग यांना जोडेल. महारेलने यासंदर्भात एक विस्तृत आरेखनाचे सादरीकरण केले आहे. यामध्ये म्हातार्डी स्थानक हे ठाणे रेल्वे स्थानक, कोपर तसेच तळोजा मेट्रो यांना कसे जोडता येऊ शकेल याचे संकल्पचित्र होते.
नक्की वाचा - Ladki Bahin Yojana: E- KYC, OTP ची चिंता मिटणार, पण 'या' लाडक्या बहिणींचे टेन्शन वाढणार
यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यासंदर्भात हायस्पीड रेल्वे प्रधिकरणास हा प्रस्ताव त्यांच्या माध्यमातून राबवता कसा येईल हे पाहण्याच्या सूचना दिल्या आहेत. हायस्पीड रेल्वे प्राधिकरणाने यावर सकारात्मक भूमिका घेतली आहे. शिवाय हा प्रस्ताव रेल्वे मंत्रालयाला पाठवण्यास मान्यता दिली आहे. अशा रीतीने हे बुलेट ट्रेन स्थानक जोडले गेल्यास ठाणे रेल्वे स्थानक, कोपर तसेच नवी मुंबईतील तळोजा येथील मेट्रो स्थानक येथून प्रवाशांना सहजपणे म्हातार्डी येथे येता येईल.
बुलेट ट्रेनचे काम सध्या प्रगतीपथावर आहे. मुंबईत ते अहमदाबाद दरम्यान ही देशातील पहिली बुलेट ट्रेन धावणार आहे. या बुलेट ट्रेनमुळे मुंबई आणि अहमदाबाद मधील अंतर कमी होणार आहे. शिवाय जलदगतीने प्रवास ही होणार आहे. मुंबईतून अहमदाबाद आणि अहमदाबादहून मुंबईला एका दिवसात येता जाता येणार आहे. काही तासात हा प्रवास पूर्ण होणार आहे. हा एक महत्वकांक्षी प्रकल्प आहे. जपानच्या मदतीने तो केला जात आहे. आता ही बुलेट ट्रेन कधी धावणार याकडे देशवासीयांचे लक्ष लागले आहे.