देशातील सर्वच महानगरामध्ये डेटिंग अॅप्सचा वापर वाढत चाललाय. या माध्यमातून प्रेमाचा शोध घेणाऱ्यांची फसवणूक देखील होत असते. एक पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतीय. त्यामध्ये एका महिलेनं मुंबईत डेटिंगच्या नावाखाली सुरु असलेल्या घोटाळ्याचा पर्दाफाश केला आहे.
या महिलेनं सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर लिहिलेल्या माहितीनुसार, अंधेरी वेस्टमधील द गॉडफादर क्लबमध्ये डेटिंग अॅपच्या माध्यमातून मुली मुलांना बोलवतात. तिथं त्यांना ड्रिंक्स आणि अन्य गोष्टींसाठी 23 ते 61 हजार रुपये चार्ज केले जातात. ही पोस्ट चांगलीच व्हायरल झाली असून त्यामध्ये अनेक युझर्सनी त्यांचे अनुभव शेअर केले आहेत.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
दीपिका भारद्वाज या महिलेनं या घोटाळ्याी माहिती दिलीय. तिनं 4 बिलांचे फोटो शेअर केली आहेत. ही सर्व बिलं अंधेरी वेस्टच्या 'द गॉडफादर क्लब'ची आहेत. यामधील पहिलं बिल 22 हजार 82 रुपये , दूसरं बिल 35 हजार 949 रुपये, तिसरं बिल 48 हजार 99 रुपये आणि चौथं बिल 61 हजार 743 रुपये इतकं दिसत आहे.
या घोटाळ्यात फसलेल्या 12 व्यक्ती आपल्या संपर्कात असल्याचं दीपिकाय यांनी सांगितलं आहे. टिंडर, बम्बल डेटिंग अॅपच्या माध्यमातून पुरुषांच्या भोवती जाळं विणलं जातं. त्या जाळ्यात अडकलेल्या व्यक्तींकडून मोठी रक्कम वसूल केली जाते. यामधील 3 मुलं एकाच मुलीच्या जाळ्यात अडकले असल्याची माहितीही त्यांनी दिलीय.
( Video : महिलेनं घटस्फोटाच्या वेळी मागितली महिना 6 लाखांची पोटगी! न्यायाधीश म्हणाल्या, 'स्वत: कमव' )
काय आहे काम करण्याची पद्धत?
दीपिका यांनी काही स्क्रीनशॉट शेअर करत हा सर्व धंदा कसा चालतो हे सांगितलंय. सर्वात प्रथम डेटिंग अॅपच्या माध्यमातून मुलांशी संपर्क केला जातो. त्यानंतर त्यांना लवकरात लवकर भेटण्यासाठी आग्रह केला जातो. पिझ्झा एक्स्प्रेस किंवा मेट्रो या भेटीचं ठिकाण असतं.
त्या ठिकाणी भेटायला आलेल्या महिला पुरुषांना 'द गॉडफादर क्लब'मध्ये जाण्याचा हट्ट करतात. त्या क्लबमध्ये गेल्यावर ड्रिंक, हुक्का, फायरशॉट अशा वेगवेगळ्या प्रकारच्या ऑर्डर दिल्या जातात. विशेष म्हणजे यामध्ये मुलांना मेनू कार्ड दाखवलं जात नाही. काही तासांमध्येच हजारोंच बिल होतं. त्यानंतर त्या मुली फरार होतात. मुलांनी पेमेंट केलं नाही तर कॉर्नरवर उभे असलेले बाऊन्सर सज्ज असतात.
मी आजपर्यंत अनेक क्लबचा पर्दाफाश केला आहे. पण हा क्लब सर्वांचा बाप आहे, असं दीपिका यांनी सांगितलं. रोज किमान 10 जणांना इथं फसवलं जातं. अनेकांनी याबाबत सायबर गुन्हे खात्याकडं तक्रार केली आहे. फोन करुन घटनास्थळावर पोलिसांना बोलावलंय, तरीही हे प्रकार सुरु आहेत असं दीपिका यांनी सांगितलं.
वांद्रे पोलिसांच्या नाकाखाली हे सर्व प्रकार सुरु आहेत. याबाबत अनेकदा औपचारिक तक्रार करुनही कोणती कारवाई झाली नसल्याचा दावा दीपिका यांनी केला आहे.