Mumbai Heatwave: वर्सोवा बीचवर मोठ्या संख्येने लोक रात्रीच्या वेळी वाळूवर झोपलेले दिसत आहेत.
मुंबई:
Mumbai Heatwave: जून महिना संपत आला तरी उन्हाचा तडाखा आणि असह्य उकाड्यामुळे मुंबईकर हैराण आहेत. मुंबईत तापमान 33 अंश सेल्सिअसच्या आसपास असले तरी हवेतील प्रचंड दमटपणामुळे दिवस असो वा रात्र, नागरिकांचा त्रास कायम आहे. एसी आणि फॅन असूनही घरात बसणे अवघड झाले आहे, तर दुसरीकडे झोपडपट्ट्यांमध्ये किंवा रस्त्यांच्या कडेला राहणाऱ्या लोकांचे हाल अत्यंत बिकट झाले आहेत. या असह्य उष्णतेतून सुटका करून घेण्यासाठी आणि सुखाची झोप मिळवण्यासाठी या नागरिकांनी आता एक अनोखा पर्याय शोधून काढला आहे.
थंड हवेसाठी समुद्रकिनाऱ्याचा आसरा
रात्रीच्या वेळी घरात होणाऱ्या प्रचंड उकाड्यापासून वाचण्यासाठी मुंबईकर थेट समुद्रकिनाऱ्याचा रस्ता धरला आहे. दररोज संध्याकाळ होताच अनेक जण डोक्याखाली घ्यायला उशी आणि अंथरण्यासाठी चादर घेऊन समुद्रकिनाऱ्यावर पोहोचत आहेत. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये वर्सोवा बीचवर मोठ्या संख्येने लोक रात्रीच्या वेळी वाळूवर झोपलेले दिसत आहेत.
या उन्हाळ्याचा मुकाबला करण्यासाठी मुंबईकरांनी शोधलेला हा अनोखा जुगाड सध्या चांगलाच चर्चेत आला आहे. समुद्रकिनाऱ्यावर रात्री झोपणाऱ्यांमध्ये प्रामुख्याने पुरुषांचा समावेश जास्त आहे.
( नक्की वाचा : Monsoon Update: काय आहे सोमाली जेट ज्याच्यामुळे महाराष्ट्रात मान्सून रखडला? वाचा सविस्तर रिपोर्टरात्रीच्या वेळी समुद्रकिनाऱ्यावर झोपणाऱ्या एका तरुणाने सांगितले की, घरात प्रचंड उष्णता जाणवत असल्यामुळे ते सर्वजण बीचवर येतात. तिथे समुद्राच्या पाण्यामुळे रात्रीच्या वेळी अतिशय थंड आणि आल्हाददायक वारे वाहत असतात. त्यामुळे उन्हाळ्याच्या दिवसांत अनेक जण येथेच येऊन झोपतात. मात्र, एकदा का पावसाळा सुरू झाला की इथे कोणीही फिरकत नाही, असेही त्याने स्पष्ट केले.
उकाड्यात झोपणे आरोग्यासाठी घातक
समुद्रकिनाऱ्यावरील थंड वारे तात्पुरता आराम देत असले तरी हवामान आणि आरोग्य तज्ज्ञांनी या परिस्थितीवर चिंता व्यक्त केली आहे. तज्ज्ञांच्या मते, जास्त उष्णतेमध्ये आणि उकाड्यात झोपणे आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते. रात्रीच्या वेळी जर शरीराला पुरेशी थंड हवा मिळाली नाही, तर हीट स्ट्रेसचा (उष्णतेचा ताण) धोका मोठ्या प्रमाणात वाढतो. याचा सर्वाधिक फटका बाहेर उन्हात काम करणारे मजूर, लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांना बसण्याची शक्यता असते. त्यामुळे सध्या मुंबईकर केवळ मान्सूनच्या आगमनाची वाट पाहत असून, पाऊस कधी पडेल आणि या उकाड्यापासून कधी सुटका होईल, याकडे सर्वांचे डोळे लागले आहेत.