Mumbai Local Update: मुंबईकरांच्या प्रवासाचा चेहरामोहरा बदलणारी नवी लोकल आता एका महत्त्वाच्या टप्प्यावर आली आहे. मुंबईच्या रुळांवर धावण्यापूर्वी या स्वयंचलित दरवाजांच्या साध्या लोकलची सध्या उत्तर प्रदेशमध्ये सुरु आहे. सुरक्षिततेच्या दृष्टीने हा देशातील पहिलाच प्रयोग असून, यामुळे लोकल प्रवासातील अपघात शून्यावर आणण्याचे मोठे उद्दिष्ट रेल्वेने ठेवले आहे.
उत्तर भारतामध्ये चाचणी का?
मुंबई उपनगरी रेल्वे मार्गावर चोवीस तास गाड्यांची प्रचंड वर्दळ असते. अशा गजबजलेल्या मार्गावर नव्या तंत्रज्ञानाची सखोल चाचणी करणे रेल्वे प्रशासनासाठी मोठे आव्हान होते. रात्रीच्या मर्यादित वेळेत सर्व तांत्रिक बाबी तपासून पाहणे कठीण जात असल्याने,
रेल्वेने या लोकलचा दुसरा रेक थेट झाशी विभागातील खजुराहो-महोबा या 63.27 किलोमीटरच्या मार्गावर पाठवला आहे. हा मार्ग तुलनेने कमी वाहतुकीचा असल्याने तिथे तांत्रिक निरीक्षणे विनाअडथळा नोंदवणे शक्य होत आहे.
( नक्की वाचा : Mumbai-Nashik Local : 18 बोगदे, सह्याद्रीच्या रांगा आणि 3 प्रमुख स्टेशन; मुंबई-नाशिक लोकल कशी धावणार? वाचा )
बंद दरवाजांमधील हवेचे गणित
एसी लोकलप्रमाणेच या साध्या लोकलचे दरवाजेही स्वयंचलित स्लायडिंग पद्धतीचे असतील. मात्र, साध्या लोकलमध्ये हवा खेळती राहणे हे सर्वात मोठे आव्हान असते. यासाठी चेन्नईच्या आयसीएफ कारखान्यात तयार करण्यात आलेल्या या रेकमध्ये व्हेंटिलेशनची विशेष सोय करण्यात आली आहे.
छतावरील ब्लोअर्सद्वारे मिळणारी फोर्ड व्हेंटिलेशन सिस्टिम, खास डिझाइन केलेले लूव्हर दरवाजे आणि मोठ्या खिडक्या यांमधून प्रवाशांना गुदमरल्यासारखे वाटणार नाही ना, याची कसून चाचणी सध्या सुरू आहे.
( नक्की वाचा : Kalyan News: 15 मिनिटांत ऐरोली आणि थेट तळोजा मेट्रो! कल्याणकरांच्या प्रवासाचा 'कायापालट' करणारा 'मेगा प्लॅन' )
सुरक्षेसाठी महत्त्वाचे बदल
या नव्या लोकलचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे तिची इंटरलॉकिंग सुरक्षा प्रणाली. लोकलचे सर्व दरवाजे पूर्णपणे बंद होत नाहीत, तोपर्यंत ती सुरूच होणार नाही. मुंबईतील गर्दीच्या वेळी प्लॅटफॉर्मवर होणारी धावपळ, प्रवाशांच्या चढण्या-उतरण्याच्या सवयी आणि दरवाजा उघडण्यासाठी लागणारा वेळ या सर्वांचा ताळमेळ या चाचणीत बसवला जात आहे. यामुळे धावत्या लोकलमधून पडण्याच्या अपघातांना लगाम बसणार आहे.
पावसाळ्याची पूर्वतयारी
मुंबईचा पाऊस लक्षात घेता या लोकलमध्ये अँटी-वॉटर इन्ग्रेस प्रणाली देण्यात आली आहे. मुसळधार पावसात रेल्वे रुळांवर पाणी साचले तरी डब्यांमध्ये पाणी शिरणार नाही, याची खात्री या चाचणी दरम्यान केली जात आहे. उत्तर प्रदेशातील सर्व टप्प्यांतील चाचण्या यशस्वी झाल्यानंतर हा रेक पुन्हा मुंबईत आणला जाईल. तिथे अंतिम चाचण्या पार पडल्यावर ही लोकल मुंबईकरांच्या सेवेत दाखल करण्याबाबतचा अंतिम निर्णय घेतला जाणार आहे.