मुंबईत पावसाचा विक्रम! फक्त 3 दिवसांत पडला अर्ध्या महिन्याचा पाऊस, पुढील 24 तासासाठी रेड अलर्ट

Mumbai Rain Record: पश्चिम उपनगरात सर्वाधिक 361 मिमी पाऊस चिंचोली अग्निशमन केंद्रात नोंदवला गेला.

जाहिरात
Read Time: 3 mins
मुंबई:

मुंबईत गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागाने जारी केलेल्या अहवालानुसार , 17 ऑगस्ट 2025 सकाळी 8:30 ते 19 ऑगस्ट 2025 दुपारी 2:30 या 54 तासांच्या कालावधीत शहरात विक्रमी पाऊस झाला आहे. विशेष म्हणजे, या काळात कुलाबा येथे ऑगस्ट महिन्याच्या एकूण सरासरी पावसाच्या 37% (179 मिमी) तर सांताक्रुझ येथे 86% (489 मिमी) पाऊस नोंदवण्यात आला आहे.

नक्की वाचा: राज्य आपत्कालीन नियंत्रण कक्षात मंत्र्यांची गर्दी, काय आदेश दिले?

मुंबईत गेल्या 24 तासांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे शहराचे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. मुंबई महानगरपालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागाने दिलेल्या माहितीनुसार, 19 ऑगस्ट 2025 रोजी पहाटे 4 ते दुपारी 3 या 11 तासांच्या कालावधीत शहराच्या अनेक भागांमध्ये अतिवृष्टीची नोंद झाली आहे. हवामान विभागाने पुढील 24 तासांसाठी 'रेड अलर्ट' जारी केला असून, मुंबई आणि उपनगरात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे. यासोबतच 45 ते 50 किमी प्रतितास वेगाने वारे वाहण्याचाही अंदाज आहे.

24 तासांत अनेक ठिकाणी 200 मिमीपेक्षा जास्त पाऊस

18 ऑगस्ट 2025 सकाळी 8:30 पासून ते 19 ऑगस्ट 2025 सकाळी 8:30 पर्यंतच्या 24 तासांमध्ये मुंबईत अनेक ठिकाणी विक्रमी पाऊस झाला. पश्चिम उपनगरात सर्वाधिक 361 मिमी पाऊस चिंचोली अग्निशमन केंद्रात नोंदवला गेला. पूर्व उपनगरांमध्ये चेंबूर अग्निशमन केंद्रात 297 मिमी आणि शहरात प.ज.वा. वर्कशॉप, दादर येथे 300 मिमी पाऊस पडला. 19 ऑगस्ट रोजी सकाळी 4 ते दुपारी 3 या 11 तासांतही पावसाची तीव्रता कायम होती. या कालावधीत पूर्व उपनगरात विक्रोळी पश्चिम येथील इमारत प्रस्ताव कार्यालयात 268 मिमी, पश्चिम उपनगरात मरोळ अग्निशमन केंद्रात 262 मिमी आणि शहरात फ्रॉसबेरी जलाशय येथे 220 मिमी पाऊस नोंदवला गेला. सांताक्रुझ वेधशाळेत 24 तासांत 238.2 मिमी पाऊस झाला आहे.  

नक्की वाचा: मुसळधार पावसामुळे मुंबई-गोवा महामार्ग बंद! 'या' मार्गाचा करा वापर

ऑगस्ट महिन्यात कुलाबा इथे सरासरी 482 मिलीमीटर पाऊस पडतो, तर सांताक्रूझ इथे 566.4 मिलीमीटर पाऊस पडतो. 17 ऑगस्ट सकाळी 8:30 ते 19 ऑगस्ट दुपारी 2:30 या 54 तासांत कुलाबा येथे ऑगस्ट महिन्याच्या सरासरीच्या 37% (179 मिमी) तर सांताक्रुझ येथे 86% (489 मिमी) पाऊस नोंदवला गेला आहे. मुंबई महापालिकेने जारी केलेल्या माहितीनुसार मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमधील एकूण पाणीसाठा हा 92.42 टक्के इतका झाला आहे. 

Advertisement

मध्य रेल्वे कोलमडली, प्रवाशांची वाट लागली

मुसळधार पावसामुळे मुंबईची रेल्वे आणि रस्ते वाहतूक ठप्प झाली आहे. मध्य रेल्वेची वाहतूक सीएसटी ते ठाणे दरम्यान मेन लाईनवर आणि सीएसटी ते मानखुर्द दरम्यान हार्बर रेल्वेवर बंद आहे. पश्चिम रेल्वेची वाहतूक मात्र सुरळीत सुरू आहे. बीईएसटीच्या बसेस 28 ठिकाणी पर्यायी मार्गाने वळवण्यात आल्या आहेत. मध्य रेल्वेच्या विविध स्थानकांवर अडकलेल्या प्रवाशांसाठी महानगरपालिकेने पाणी, चहा आणि बिस्किटांची व्यवस्था केली आहे.

मिठी नदीच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ

पावसाच्या काळात आपत्ती व्यवस्थापन विभागाला 19 ऑगस्ट रोजी पहाटे 4 ते दुपारी 3 या वेळेत 64 तक्रारी मिळाल्या आहेत, ज्यात शॉर्ट सर्किट, घर कोसळणे आणि झाडे/फांद्या पडणे यांचा समावेश आहे. यामध्ये सर्वाधिक 29 तक्रारी पश्चिम उपनगरातून झाड पडण्याबद्दल आहेत.मिठी नदीची पातळी 3.9 मीटरपर्यंत वाढल्यामुळे कुर्ला येथील क्रांतीनगर परिसरातील 350 नागरिकांना मगनदास मथुराम मनपा शाळेत स्थलांतरित करण्यात आले आहे. त्यांना भोजन आणि वैद्यकीय सुविधा पुरविल्या जात आहेत. संभाव्य भूस्खलनाच्या धोक्यामुळे विक्रोळीतील सुर्यानगर आणि भांडूपमधील खिंडीपाडा येथील रहिवाशांना सुरक्षितस्थळी हलवण्यात आले आहे.
 

Advertisement
Topics mentioned in this article