BMC Jobs : मुंबई महानगरपालिकेतील ‘कार्यकारी सहायक' (लिपिक) पदासाठी रिक्त पदे सरळसेवेने भरण्यासाठी दिनांक 20 ऑगस्ट 2024 पासून ऑनलाईन अर्ज भरती प्रक्रिया सुरु करण्यात आली होती. या भरती प्रक्रियेमधील अनेकांनी हरकत घेतलेली एक अट अखेर रद्द करण्यात आली आहे.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
या भरतीसाठी 'माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा (दहावी) व पदवी परीक्षेत प्रथम प्रयत्नात उत्तीर्ण' ही शैक्षणिक अट लागू होती. ही अट रद्द करण्याची सूचना आणि मागणी विविध स्तरांवरुन करण्यात आली होती. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही तशी सूचना घेतली होती. महापालिकेनं त्यावर सकारात्मक निर्णय घेत, प्रथम प्रयत्नात' ही अट रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. पर्यायाने आता नव्याने जाहिरात प्रसिद्ध करुन येत्या पंधरा दिवसांच्या आत भरती प्रक्रिया पुन्हा सुरु करण्यात येणार आहे.
( नक्की वाचा : रेल्वेत होणार 14 हजार जागांची भरती, कशी मिळवणार नोकरी? A to Z माहिती )
त्याचबरोबर, सदर शैक्षणिक अर्हतेमध्ये आवश्यक ती सुधारणा करण्याची प्रशासकीय कार्यवाही युद्ध पातळीवर सुरु करण्यात आली आहे. सुधारित शैक्षणिक अर्हता निश्चित करुन, ‘कार्यकारी सहायक' पद भरतीची जाहिरात नव्याने आणि लवकरात लवकर प्रसिद्ध केली जाईल. जाहिरात प्रसिद्ध होवून येत्या पंधरा दिवसांच्या आत ही भरती प्रक्रिया पुन्हा सुरु केली जाणार आहे. विशेष म्हणजे, सध्या अर्ज केलेल्या उमेदवारांनी नव्याने अर्ज करण्याची आवश्यकता नाही, कारण त्यांचे अर्ज पुढील भरती प्रक्रियेत ग्राह्य धरले जाणार आहेत. महानगरपालिका प्रशासनाच्या या निर्णयामुळे लाखो उमेदवारांना दिलासा मिळाला असून त्यांना या भरती प्रक्रियेत सहभागी होण्याची संधी मिळणार आहे.
महानगरपालिकेत ‘कार्यकारी सहायक' (लिपिक) संवर्गातील 1 हजार 846 जागा सरळसेवेने भरण्यासाठी प्रक्रिया सुरु करण्यात आली होती. या जागांसाठी अर्हताप्राप्त उमेदवारांकडून दिनांक 20 ऑगस्ट 2024 पासून ऑनलाईन अर्ज मागविण्यास प्रारंभ करण्यात आला होता. तर, 9 सप्टेंबर 2024 ही अर्ज करण्याची अंतिम तारीख होती.