मेहबूब जमादार, प्रतिनिधी
Mumbai Pune Express Way Accident : मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर शनिवारी दुपारी एक भीषण रस्ते अपघात झाला. एका अनियंत्रित ट्रक कंटेनरने अनेक वाहनांना धडक दिली. धडक इतकी जोरदार होती की अनेक वाहनांचे अक्षरशः तुकडे झाले. या अपघातात 15 ते 20 वाहनांचे नुकसान झाले आहे. यात BMW आणि मर्सिडीज सारख्या महागड्या गाड्यांचाही समावेश आहे. या अपघातात एका महिलेचा मृत्यू झाला असून, 19 जण जखमी झाले आहेत.
कसा झाला अपघात?
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, रायगड जिल्ह्यातील खोपोली येथे मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर एका कंटेनरचे ब्रेक निकामी झाले होते. हा कंटेनर पुणे येथून मुंबईकडे जात होता. उतारावर ब्रेक निकामी झाल्यामुळे ड्रायव्हरचे कंटेनरवरील नियंत्रण सुटले. कंटेनर भरधाव वेगाने पुढे सरकत गेला आणि अनेक वाहनांना जोरदार धडक दिली.
या अपघातात 15 ते 20 वाहनांची एकमेकांना धडक बसल्याचे सांगितले जात आहे. अनेक वाहनांचे अक्षरशः तुकडे झाले, तर अनेक मोठी वाहनेही मोठ्या प्रमाणात खराब झाली. घटनास्थळी एकच आरडाओरडा सुरू झाला. अपघाताची माहिती मिळताच पोलीस आणि मदत व बचाव पथके घटनास्थळी पोहोचले आणि जखमींना बाहेर काढून रुग्णालयात दाखल केले.
(नक्की वाचा : Navi Mumbai : खारघर पांडवकडा धबधब्यावर जीवघेणा थरार, अग्निशमन दलानं वाचवले तरुणाचे प्राण )
अपघातामुळे वाहतूक कोंडी
या अपघातामुळे एक्सप्रेसवेवर मोठी वाहतूक कोंडी झाली. हा अपघात खोपोली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील न्यू टनेल आणि फूड मॉल हॉटेलदरम्यान घडला. हा परिसर रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यात येतो. हा अपघात पुणे येथून मुंबईकडे जाणाऱ्या लेनवर झाला, त्यामुळे अनेक किलोमीटरपर्यंत वाहतूक कोंडी झाली.
अधिकाऱ्यांनी सांगितले की, कंटेनर ट्रेलर ट्रकचे ब्रेक निकामी झाल्यानंतर चालकाचे त्यावर नियंत्रण राहिले नाही. त्याने BMW आणि मर्सिडीज सारख्या लक्झरी गाड्यांसह किमान 20 गाड्यांना धडक दिली. यामुळे 19 जणांना गंभीर दुखापती झाल्या आहेत. त्यांना नवी मुंबईतील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. एका महिलेचा मृत्यू झाला आहे.
ड्रायव्हरला अटक
अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, चालकाला खोपोली पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. वैद्यकीय तपासणीत असे दिसून आले की, घटनेच्या वेळी त्याने दारू प्यायली नव्हती. गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील कारवाई सुरू आहे.
या अपघातामुळे मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवरील सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.