पावसाचं आजही धुमशान, शाळांना सुट्टी, मुंबई पुणे रायगडला रेड अलर्ट, आतापर्यंत 10 बळी

आज ही मुंबई, पुणे आणि रायगडला रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यामुळे मुंबई, ठाणे, पालघरमध्ये आजही शाळा महाविद्यालयांना सुट्टी देण्यात आली आहे.

Advertisement
Read Time: 3 mins
मुंबई:

पावसाने गुरूवारी पुणे, मुंबईसह मध्य महाराष्ट्रात अक्षरश: धुमाकुळ घातला होता. आज ही मुंबई, पुणे आणि रायगडला रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यामुळे मुंबई, ठाणे, पालघरमध्ये आजही शाळा महाविद्यालयांना सुट्टी देण्यात आली आहे. आता पर्यंत पावसामुळे राज्यात दहा जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. मध्य महाराष्ट्रात देशातल्या सर्वाधिक पावसाची नोंद झाली आहे. पावसाचा फटका रेल्वे वाहतूकीला बसला असून अनेक गाड्या या रद्द करण्यात आल्या आहेत. 

('NDTV मराठी'चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

मुंबईत पावसाचा रेड अलर्ट जाहीर करण्यात आला आहे. पण काही भागात रात्रीतून पावसाला उसंत होती. पुण्यातही आज पावसाचा रेड अलर्ट असेल. त्यामुळे शाळा महाविद्यालयांना सुट्टी देण्यात आली आहे. गरज असेल तरच घराबाहेर पडण्याचे आदेश देण्यात आले आहेत. रायगडला ही पावसाचा रेड अलर्ट तर रत्नागिरीला ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. त्यामुळे  शाळा-कॉलेजना सुट्टी आहे. त्याच प्रमाणे नाशिक, गडचिरोलीलाही ऑरेंज अलर्ट आहे. 

कोल्हापुरात पंचगंगा नदीच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. त्यामुळे नदीकाठावरची घरेही रिकामी केली गेली आहेत. तिथे राहणाऱ्या लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. कोयना, राधानगरीचे सहा दरवाजे उघडले आहेत. त्यानंतर पंचगंगे शेजारी राहाणाऱ्या लोकांची घरे रिकामी करण्यात आली आहेत. कोल्हापूरातही आज पावसाचा जोर कायम राहाणार आहे. त्यामुळे कोल्हापूरकरांवर पुराचा धोका कायम आहे. जिल्ह्यातले महत्वाचे मार्ग बंद आहेत. शाळा 2 दिवस बंद असतील. तर राधानगरीचे 6 दरवाजे उघडले आहे. 80 बंधारे पाण्याखाली आहेत. 40 पेक्षा जास्त मार्ग बंद आहेत. तर आता पर्यंत 500 जणांचं स्थलांतर करण्यात आले आहे.

ट्रेंडिंग बातमी - कारगिल युद्धात गमावले 2 पाय आणि 1 हात, नाशिकचे 'नायक' आजही देतायत सर्वांना प्रेरणा

 महाराष्ट्रातल्या पावसाळी धुमाकुळात आतापर्यंत 10 जणांचा मृत्यू झाला आहे. एकट्या पुण्यात पाच जणांनी जीव गमावला आहे. लाईटच्या तारांपासून सावध राहाण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मध्य महाराष्ट्रात देशातल्या सर्वाधिक पावसाची नोंद झाली आहे. ताम्हिनी घाटात 560 मि.मी. पाऊस तर महाबळेश्वर,इगतपुरीतही रेकॉर्डब्रेक पावसाची नोंद झाली आहे. पावसाने झोडपून काढल्याने हा विक्रम नोंदवला गेला आहे. 

सतत पडणाऱ्या पावसामुळे धरणंही भरू लागली आहेत. ती महाराष्ट्रासाठी दिलासा देणारी गोष्ट आहे. मुंबईला पाणी पुरवठा करणारी  विहार आणि मोडक सागर ओव्हर फ्लो झाली आहेत. तर इतर धरणातला साठा 67% वर आहे. पावसाचा परिणाम भाजीपाल्यावर ही झाला आहे. नाशिकहून मुंबई, गुजरातला जाणारा भाजीपाला 30 टक्क्यानं घटला आहे. 

Advertisement

पावसाचा फटवा वाहतूकीवरही बसला. मुंबई पुण्यातील रस्ते वाहतूक काही ठिकाणी ठप्प झाली होती. अनेक रस्त्यांवर पाणी साचले होते. मुंबई-पुणे दरम्यानच्या अनेक रेल्वे गाड्या ही रद्द करण्यात आल्या होत्या. त्यात डेक्कन, प्रगती, इंटरसिटी एक्सप्रेसचा समावेश आहे. त्याच प्रमाणे विमान सेवेवरही परिणाम झाला आहे. अलिबागमध्ये बोट भरकटली होती. पावसाचा जोर असाच कायम राहील्यास वाहतूक व्यवस्थेवर आजही परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही.  

पावसामुळे धरण भरत आहेत. त्यामुळे हतनूर धरणाचे 10 दरवाजे 2 मीटरने उघडले होते.  तापी नदी पात्रात 39 हजार क्यूसेक पाण्याचा विसर्ग केला जात आहे. तापी नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.  हतनूर धरणाचे 41 पैकी दहा दरवाजे उघडले आहेत. तर साताऱ्याचा शाहूनगर, गोडोली भागातली लाईट गायब झाली आहे. अजिंक्यतारा किल्ल्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर झाड पडले. झाड पडल्यामुळे रात्री संपूर्ण भाग अंधारात होता. साताऱ्यात पावसाचा वीज पुरवठ्याला फटका बसला आहे. 

Advertisement

आजही घाटमाथ्यावर पावसाचा जोर कायम राहील असा अंदाज आहे. भीमा, घोड, कुकडी, मीना नद्या आजही दुथडी भरुन वाहतील. भीमा, आंबेगाव, जुन्नरमध्ये दुसऱ्या दिवशीही पाऊस असणार आहे.  पुणे जिल्ह्यातल्या काही भागात आजही पाऊस पडेल असा अंदाज आहे. कृष्णेची वाटचाल आता इशारा पातळीकडे चालली आहे. कृष्णा आणि वारणेच्या पातळीत वाढ होता आहे. त्यामुळे  शिराळा, पलूस, वाळा, मिरजेत शाळा-कॉलेजना सुट्टी देण्यात आली आहे. कृष्णा, वारणा नदीकाठाला सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.