Mumbai Traffic : मुंबईचा 'ट्रॅफिक जॅम' संपणार! गोरेगाव ते मुलुंड आता फक्त 25 मिनिटांत; BMC नं दिली सर्व माहिती

Goregaon Mulund Link Road:  मुंबईतील वाहतूक कोंडीमुळे हैराण झालेल्या लाखो नागरिकांसाठी एक मोठी दिलासादायक बातमी आहे.

जाहिरात
Read Time: 3 mins
Goregaon Mulund Link Road: या प्रकल्पामुळे वेळेसह इंधनाचीही बचत होणार आहे.
मुंबई:

Goregaon Mulund Link Road: मुंबईतील वाहतूक कोंडीमुळे हैराण झालेल्या लाखो नागरिकांसाठी एक मोठी दिलासादायक बातमी आहे. महत्त्वाकांक्षी गोरेगाव-मुलुंड जोड मार्ग (GMLR) प्रकल्पातील दिंडोशी न्यायालय ते दादासाहेब फाळके चित्रनगरी दरम्यानच्या उड्डाणपुलाचे बांधकामाला आता वेग आलय. मुंबई महापालिकेनं  (BMC) हा उड्डाणपूल 16 मे 2026 पर्यंत वाहतुकीसाठी खुला करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. हा प्रकल्प पूर्ण झाल्यावर मुंबईकरांना मोठा दिलासा मिळणार आहे, कारण सध्या 75 मिनिटांवरून गोरेगाव ते मुलुंड दरम्यानचा प्रवासाचा कालावधी थेट सुमारे 25 मिनिटांपर्यंत कमी होईल. यामुळे केवळ प्रवासाच्या वेळेतच बचत होणार नाही, तर इंधन वापरातही बचत होईल आणि मुंबईच्या वायू गुणवत्ता निर्देशांकात (AQI) सुधारणा होण्यासही मदत होईल, अशी अपेक्षा आहे.

कसा आहे प्रकल्प?

गोरेगाव-मुलुंड जोड मार्ग (GMLR) हा सुमारे 12.20 किलोमीटर लांबीचा प्रकल्प असून, मुंबईतील पूर्व-पश्चिम उपनगरांना जोडणारा हा चौथा प्रमुख जोडरस्ता ठरणार आहे. विशेषत: उत्तर मुंबईतील वाहतुकीसाठी याचा मोठा फायदा होणार आहे. प्रकल्पाच्या टप्पा 3 (अ) मध्ये समाविष्ट असलेल्या या उड्डाणपुलाची लांबी 1,265 मीटर असून तो सहापदरी असणार आहे. या बांधकामासाठी बॉक्स गर्डर आणि काँक्रिटचा वापर केला जात आहे. तसेच, रस्त्यावर पादचारी पूल आणि स्वयंचलित सरकता जिन्याची (Escalator) सुविधा देखील उपलब्ध करून दिली जाणार आहे. 

उड्डाणपुलाची उभारणी गोरेगाव बाजू आणि मुलुंड बाजू अशा दोन टप्प्यांत होत असून, तो दिंडोशी न्यायालयापासून सुरू होतो, रत्नागिरी जंक्शन येथे 90 अंश कोनात वळतो आणि दादासाहेब फाळके चित्रनगरी येथे उतरतो.

(नक्की वाचा : Navi Mumbai Airport: नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटलांचेच नाव! प्रकल्पग्रस्तांसाठी लढणारे 'हे' लोकनेते कोण? )
 

किती काम पूर्ण?

उड्डाणपुलाच्या बांधकामाच्या प्रगतीचा आढावा नुकताच अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प)  अभिजीत बांगर यांनी पालिका मुख्यालयात घेतला. या बैठकीत प्रमुख अभियंता (पूल) श्री. उत्तम श्रोते आणि संबंधित अधिकारी उपस्थित होते. कामाच्या प्रगतीनुसार, एकूण 31 खांबांपैकी (Piers) 27 खांबांची उभारणी यशस्वीरीत्या पूर्ण झाली आहे, तर रत्नागिरी जंक्शन येथील उर्वरित 4 खांबांचे काम प्रगतिपथावर आहे. तसेच, पुलाच्या उभारणी विभागाच्या एकूण 26 स्पॅनपैकी 12 स्पॅनचे काम पूर्ण झाले आहे, उर्वरित 14 स्पॅनचे काम 15 फेब्रुवारी 2026 पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन आहे. खांब उभारणीनंतर तुळई स्थापित करणे आणि डेक स्लॅब ओतकाम (Casting) ही कामे 15 एप्रिल 2026 पर्यंत केली जातील.

Advertisement

याव्यतिरिक्त, उड्डाणपुलाच्या दोन्ही बाजूकडील पोहोच मार्गांचे (Solid Approach) बांधकाम देखील निश्चित वेळेनुसार सुरू आहे. दिंडोशी न्यायालय बाजूकडील पोहोच मार्गाचे काम 31 जानेवारी 2026 पर्यंत, तर दादासाहेब फाळके चित्रनगरी येथील पोहोच मार्गाचे काम 30 एप्रिल 2026 पर्यंत पूर्ण केले जाईल. बांधकामानंतरची इतर अनुषंगिक कामे उर्वरित 15 दिवसांत पूर्ण करून 16 मे 2026 पर्यंत उड्डाणपूल वाहतुकीस खुला करण्याचे BMC चे ध्येय आहे.

मात्र, उड्डाणपुलाच्या दुसऱ्या टप्प्यात मुलुंड बाजूकडे काही बांधकामे बाधित होत आहेत. त्यामुळे, बाधित बांधकामांची पुनर्वसन प्रक्रिया पूर्ण करून ती जागा उपलब्ध होताच या भागातील कामाला गती दिली जाईल, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.

Advertisement