Trending News: मुंबई शहर पाण्याखाली बुडणार? मुंबईची जमीन खचतेय, धक्कादायक अहवालात अजून काय?

या शहरांतील सुमारे 19 लाख लोक अशा भागांत राहतात, जिथे जमीन दरवर्षी 4 मिमी.हून अधिक वेगाने खचत आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
AI image
मुंबई:

दरवर्षी लाखो नागरिकांचा लोंढा मुंबईत दाखल होतो. लाखो लोक अनेक स्वप्न उराशी धरून मुंबईत पोहोचतात. पण अनेकांची पोटं भरणारी, स्पप्नं पुरी करणारी मुबंईच आता शेवटची घटता मोजत आहे अशी स्थिती निर्माण झाली आहे.  फक्त मुंबईच नाही तर दिल्ली, कोलकाता, बंगळुरू अशा प्रमुख शहरांचीदेखील हीच अवस्था झाली आहे. या शहरांमधील सुमारे 878 चौरस किलो मीटर क्षेत्रफळाची जमीन सतत खचत चालली आहे. नेचर सस्टेनेबिलिटी या आंतरराष्ट्रीय विज्ञान नियतकालिकातून हा धक्क्दायक अहवाल समोर आला आहे.

2015 ते 2023 दरम्यान युरोपीयन उपग्रह सेंटिनेल 1 कडून मिळालेल्या आकडेवारीवरून हा निष्कर्ष काढण्यात आला आहे. या अभ्यासानुसार शहरातील अनेक भाग इतक्या वेगाने खचत आहेत की इमारती, रस्ते आणि जलवाहिन्यांना गंभीर धोका निर्माण झाला आहे. प्राध्यापक योगेश दूधपचारे यांनीही याला दुजोरा दिला आहे. दिल्लीतील जमिनीत सर्वाधिक हालचाल दिसून आली आहे. दिल्लीत जमीन दरवर्षी 51 मिलीमीटरपर्यंत खचत आहे. त्यानंतर चेन्नईत 31.7 मिमी., मुंबई 26.1 मिमी. कोलकाता 16.4 मिमी. आणि बंगळुरूत 6.7 मिमीपर्यंत जमीन खचत आहे.

नक्की वाचा - Shocking: सर्वाधिक आळशी लोक राहणारे जगातील देश कोणते? टॉप 10 यादीत भारताचा क्रमांक कितवा?

या शहरांतील सुमारे 19 लाख लोक अशा भागांत राहतात, जिथे जमीन दरवर्षी 4 मिमी.हून अधिक वेगाने खचत आहे. ही प्रक्रिया डोळ्यांना दिसत नाही, पण इमारतींची पायाभरणी झुकते किंवा त्यात भेगा पडतात. भूजलाचा अमर्याद उपसा हे जमीन खचण्यामागील प्रमुख कारण आहे. जमिनीखालून पाणी वेगाने काढले गेले की वरच्या मातीच्या थरांमध्ये कोरडेपणा निर्माण होतो. ते थर हळूहळू आकुंचन पावतात. उपग्रहावरून मिळालेल्या माहितीनुसार 2002 ते 2023 या काळात सर्व महानगरांतील भूजल साठ्यात मोठ्या प्रमाणात घट झाली आहे.शहरांवर वाढलेला ताण, अस्थिर जलव्यवस्थापन, अनियमित पावसाचं चक्र आणि जमिनीच्या विस्तीर्ण क्षेत्रात झालेलं काँक्रीटीकरण या संकटात अधिक भर घालत आहेत. ज्यामुळं कोट्यवधी नागरिकांचं आयुष्य संकटात असल्याचंही म्हटलं जात आहे. 

नक्की वाचा - Foreign Travel: परदेशवारी करा फक्त 1000 रूपयात! कमी बजेटमध्ये फिरण्यासाठी 'हे' 3 सुंदर देश

जगाच्या पाठीवर मुंबईसारखीच अनेक शहरं बुडण्याच्या मार्गावर आहेत. त्यात इंडोनेशियाची राजधानी जकार्ता हे शहरं सर्वात वेगाने बुडत आहे. गेल्या 25 वर्षांत जकार्ता सुमारे 16 फूट खाली बुडालं आहे.  ही समस्या सोडवली नाही, तर 2050 पर्यंत जकार्ताचे काही भाग पूर्णपणे पाण्याखाली जातील. जकार्तासोबतच न्यूयॉर्क, मेक्सिको सिटी आणि बांगलादेशची राजधानी ढाका ही शहरेही बुडण्याच्या मार्गावर आहेत. मानवाने निसर्गाशी ताळमेळ साधून जगणं आवश्यक आहे. मुंबईसह महत्त्वाच्या शहरांवर आलेल्या संकटाबाबत लोकांमध्ये जागरुकता निर्माण व्हायला हवी. निसर्गाच्या या इशाऱ्याला गांभीर्याने घेऊन त्वरित पावलं उचलली नाहीत, तर भविष्यात मुंबईला बुडण्यापासून कुणीच वाचवू शकत नाही.. 

Advertisement