अमजद खान
मुंब्रा रेल्वे स्थानकाच्या दरम्यान रेल्वेच्या चालत्या गाडीतून पडून चार जणांचा मृत्यू झाला. तर काही प्रवासी गंभीर जखमी झाले. मात्र रेल्वेला मृत्यूमुखी पडलेले आणि जखमी झालेल्यां विषयी जरा देखील सहानुभूती नाही असा संताप श्रीराम वैद्य यांनी व्यक्त केला आहे. रेल्वेच्या संवेदनशून्य कारभाराचा फटका स्वत: त्यांना बसला आहे. त्यांच्या मुलीचा रेल्वेच्या धावत्या गाडीतून पडून अपघात झाला होता. त्यात ती गंभीर जखमी झाली. गेल्या 7 वर्षापासून ती उपचार घेत आहे. तिला रेल्वेकडून एक पैशाची मदत मिळाली नाही. तिच्या उपचारावर वैद्य यांनी आत्तापर्यंत 42 लाख रुपयांचा खर्च केला आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
श्रीराम वैद्य हे एका खाजगी कंपनीत काम करीत होते. आता ते सेवानिवृत्त आहेत. ते या पूर्वी विक्रोळीत राहत होते. त्यांना दोन मुली, मुलगा आणि पत्नी असा परिवार आहे. सध्या ते डोंबिवलीतील गरीबाचा वाडा रोड येथील वसंत हेरीटेज इमारतीच्या पाचवा मजल्यावर राहतात. त्यांची मुलगी तेजश्री हिने रुईया कॉलेजमधून पदवीचे शिक्षण घेतले आहे. त्यानंतर ती साठे कॉलेजतून डबल ग्रज्युएटचे शिक्षण घेत होती. ती डबल ग्रज्युएटच्या दुसऱ्या वर्षाला होती. तिची परीक्षा चर्चगेटच्या के.सी.कॉलेजमध्ये होती.
परीक्षेला जाण्यासाठी 19 एप्रिल 2018 रोजी सकाळी मुंबईला फास्ट ट्रेनने निघाली होती. गाडीला गर्दी होती. त्यावेळी सायन रेल्वे स्थानकादरम्यान तेजश्री गाडीतून पडली. दोन तास ती रेल्वेच्या नाल्यात पडून होती. पुढे तिला उपचारासाठी मुंबईच्या रुग्णालयात दाखल केले. तीन महिने तिच्यावर उपचार सुरु होते. तिच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने ती कोमात गेली होती. ती कोमातून बाहेर आली असली तरी ती नीट बोलू शकत नाही. आधाराशिवाय चालू शकत नाही. गेली सहा वर्षे तिच्यावर उपचार सुरू आहेत. त्यासाठी 42 लाख रुपये खर्च केले आहेत असं वैद्य सांगतात.
या दुर्घटनेनंतर रेल्वेने आमची साधी विचारपूस केली नाही. उपचारासाठी खर्च दिला नाही. आम्ही जेव्हा रेल्वेला सांगितले तेव्हा आमचीच उलटपक्षी तपासणी केली. नको ते प्रश्न विचारले. गर्दीतून प्रवास करण्याची गरज काय होती. तुमच्या मुलीचे घरात भांडण झाले होते का? तुमच्या मुलीचे बाहेर काही प्रेम प्रकरण होते का? अशा प्रश्नांची सरबत्ती करुन आम्हाला गप्प केले. अखेरी मुंबई रेल्वे अपघात न्याय प्राधिकरणाकडे नुकसान भरपाईचा दावा दाखल केला आहे. आठ लाख रुपये नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी केली आहे. रेल्वेत हा दावा न्यायप्रविष्ट असला तरी त्या दरम्यान मुलीच्या उपचारावर झालेला खर्च हा 42 लाख रुपये इतका आहे. रेल्वेने किमान निम्मा खर्च तरी द्यावा अशी आमची आपेक्षा आहे असं ते म्हणाले. मुंब्रा इथं आज ही एक अपघात झाला आहे. त्यातील जखमींचीही अशीच फरफट होईल, या पार्श्वभूमीवर वैद्य बोलत होते.