राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे नेते आणि माजी मंत्री बाबा सिद्दीकी (Baba Siddique) यांची गेल्या आठवड्यात गोळी मारुन हत्या करण्यात आली. या हत्येनंतर त्यांचा मुलगा आणि वांद्रे पूर्वचे आमदार झीशान सिद्दीकीनं पहिली प्रतिक्रिया दिली आहे. माझ्या वडिलांच्या मृत्यूचं राजकारण करु नका, तसंच त्यांचा मृत्यू व्यर्थ जाऊ नये असं आवाहन झीशाननं केलं आहे.
झीशान सिद्दीकीनं गुरुवारी (17 ऑक्टोबर) रोजी सोशल मीडिया नेटवर्क एक्सवर केलेल्या पोस्टमध्ये लिहिलं आहे, 'माझ्या वडिलांनी गरीब, निर्दो, व्यक्तींच्या आयुष्याचं रक्षण आणि त्यांचं घर वाचवण्यासाठी स्वत:चा जीव दिला. आज माझ्या कुटुंबाला हादरा बसला आहे. पण, त्यांच्या मृत्यूचं राजकारण करु नये. त्याचबरोबर ते व्यर्थही जाऊ नये. मला न्याय हवा आहे. माझ्या कुटुंबाला न्याय हवाय.'
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
बाबा सिद्दीकी 66 वर्षांचे होते. त्यांची दसऱ्याच्या रात्री (13 ऑक्टोबर 2024) रात्री 9.30 वाजता तीन जणांनी गोळ्या घालून हत्या केली. वांद्रे पूर्व भागातील झीशान सिद्दीच्या कार्यलयातून बाहेर पडत असताना त्यांच्यावर गोळीबार झाला. त्यांच्यावर एकूण सहा गोळ्या झाडण्यात आल्या अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. त्यापैकी चार गोळ्या त्यांना लागल्या. तर एक गोळी त्यांच्या सहकाऱ्याच्या पायाला लागली. सिद्दीकी यांना लिलावती हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं. तिथं त्यांना मृत घोषित करण्यात आलं.
त्यांच्यावर हल्ला करणारे दोन शूटर गुरमेल बलजीत सिंह (हरियाणा) आणि धर्मराज कश्यप (उत्तर प्रदेश) यांना तातडीनं अटक करण्यात आली होती. तर तिसरा आरोपी शिव कुमार गौतम (उत्तर प्रदेश) अद्याप फरार आहे.
पोलिसांच्या सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार गुजरातमधील साबरमती जेलमध्ये बंद असलेला गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईसाठी काम करत असल्याची माहिती संशयित आरोपींनी केली आहे. सोशल मीडियावर रविवारी करण्यात आलेल्या एका फेसबुक पोस्टमध्येही हा दावा करण्यात आला होता. शुबू या हँडलवरुन ही पोस्ट करण्यात आली होती. बिश्नोई गँगचा मेंबर शुभम लोणकरनं ही पोस्ट केल्याचा दावा करण्यात येत आहे. त्यानं ही हत्याची जबाबदारी घेतली आहे.
( नक्की वाचा : मैत्री केली, बिस्कीट दिले आणि कल्याण रेल्वे स्टेशनवर भयंकर घडले! )
शुभमचा भाऊ प्रवीण लोणकरनं ही पोस्ट शेअर केली होती, अशी माहिती पोलिसांनी दिली. त्याला पुण्यातून अटक करण्यात आली आहे. या प्रकरणात मंगळवारी उत्तर प्रदेशातील बहाराइचमधून हरिशकुमार बालकराम या 23 वर्षांच्या संशयित आरोपीला अटक करण्यात आली आहे. बालकराम पुण्यात भंगारचं काम करत होता. तो बाबा सिद्दीकी यांची हत्या रचण्यात आलेल्या कटामध्ये त्याचा सहभाग होता, अशी माहिती तपास अधिकाऱ्यांनी दिली आहे. तिन्ही शूटर्सचा कथित हँडलर मोहम्मद झीशान अख्तर अद्याप फरार आहे.