Navi Mumbai: भामटा एक महिला अनेक! मेट्रोमोनीयल साईटवर भयंकर कांड, शरिरसंबंध, पैशांची लूट अन् बरचं काही

नवी मुंबई, ठाणे, मुंबई व पुणे आयुक्तालयांत आरोपीविरोधात विविध गुन्हे दाखल आहेत.

जाहिरात
Read Time: 3 mins
वाचा
Summary is AI-generated, newsroom-reviewed
  • बनावट प्रोफाईल तयार करून ISRO सायंटिस्ट असल्याचा खोटा दावा केला होता
  • आरोपीने महिलांना लग्नाचे आमिष दाखवून आर्थिक फसवणूक व लैंगिक शोषण केल्याचे उघड झाले
  • नवी मुंबई पोलिसांनी आरोपी आदर्श प्रशांत म्हात्रे याला 20 फेब्रुवारीला अटक केली आहे
आमच्या एआय सारांशामुळे मदत मिळाली?
आम्हाला नक्की कळवा.
नवी मुंबई:

राहुल कांबळे 

मेट्रोमोनीयल साईटवर बनावट प्रोफाईल तयार करून स्वतःला Indian Space Research Organisation (ISRO) मधील सायंटिस्ट असल्याचं भासवलं. ऐवढच नाही तर भारत सरकारच्या PWD विभागातील अधिकारी असल्याचे काहींना सांगितलं. यातून या भामट्याने उच्चशिक्षित महिलांना लग्नाचे आमिष दाखवले. त्यावर तो थांबला नाही, तर त्याने त्या महिलांचे लैंगिक शोषण ही केले. आर्थिक फसवणूक ही केली. त्या आरोपीला आता नवी मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणातील 5 गुन्हे उघडकीस आले आहेत. त्याच्याकडून  89 लाख 40 हजार रुपयांची रक्कम हस्तगत करण्यात आली आहे. हे प्रकरण उघड झाल्यानंतर सर्वच जण हादरून गेले आहेत. 

रबाळे पोलीस ठाण्यात या बाबत गुन्हा दाखल करण्यात आला होता. आरोपीने “स्वप्निल वारूळे” या खोट्या नावाने Shaadi.com या साईटवरून तक्रारदार महिलेशी ओळख वाढवली. स्वतः ISRO मध्ये सायंटिस्ट असल्याचे त्याने तिला सांगितले. त्यातून तिचा विश्वास संपादन केला. पुढे लग्नाचे आश्वासन ही त्याने दिले. त्याचा गैरफायदा घेत त्या महिले सोबत त्याने  शारीरिक संबंध प्रस्थापित केले. त्यानंतर गुजरातमध्ये जमीन खरेदीसाठी पैशांची गरज असल्याचे सांगून फिर्यादीला ‘Pre-Approved Personal Loan' काढण्यास भाग पाडले. ते तिने काढले आणि आरोपीला देवू केले. पुढे आपली फसवणूक झाल्याचे तिला समजले. तक्रारी नंतर  तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आरोपीची खरी ओळख पटली. 

त्याचे नाव आदर्श प्रशांत म्हात्रे आहे. तो 34 वर्षांचा असून अलिबागचा रहिवाशी आहे. त्याला 20 फेब्रुवारी रोजी अटक करण्यात आली. त्याला मदत करणारा प्रेम किरण म्हात्रे या तरुणाला ही अटक करण्यात आली आहे. तो पनवेलचा रहिवाशी आहे. या दोघांना 4 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. तपासात आरोपीने ISRO सायंटिस्ट व PWD अधिकारी अशी बनावट ओळखपत्रे, आधारकार्ड तयार केल्याचे उघड झाले. पंचतारांकित हॉटेलमधील फोटो, महागडी मर्सिडीज कारसोबतचे फोटो, उच्चशिक्षित कुटुंब असल्याचा बनाव करून प्रोफाईल आकर्षक बनवण्यात येत होता. 

त्याने Jeevansathi.com, BharatMatrimony, MarathiShaadi.com तसेच टिंडर यांसारख्या प्लॅटफॉर्मवरून तो महिला इंजिनियर, डॉक्टर, बँक अधिकारी, सरकारी सेवेत असलेल्या तसेच विधवा व उच्च उत्पन्न गटातील महिलांना टार्गेट करत होता. नवी मुंबई आयुक्तालयातील एका प्रकरणात फिर्यादी व इतर चार महिलांची एकूण 96 लाख 97 हजार रुपयांची फसवणूक झाल्याचे निष्पन्न झाले आहे. आरोपीने गोव्यातील कॅसिनोमध्ये ‘प्राईम मेंबरशिप' घेतली होती. गोवा राज्यातील कॅसिनोमधून 89 लाख 40 हजार रुपये हस्तगत करण्यात आले आहेत. महिलांकडून उकळलेली रक्कम पंचतारांकित हॉटेल्स व गोवा येथील कॅसिनोमध्ये उधळल्याचे तपासात समोर आले आहे. तसेच काही पीडित महिला सामाजिक बदनामीच्या भीतीने पुढे येऊन तक्रार देत नसल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. याचाच फायदा घेत आरोपीने अनेक महिलांना गंडा घातल्याचे उघड झाले आहे.

Advertisement

नवी मुंबई, ठाणे, मुंबई व पुणे आयुक्तालयांत आरोपीविरोधात विविध गुन्हे दाखल आहेत. पनवेल शहर, मानपाडा, वडाळा, येरवडा आदी पोलीस ठाण्यांमध्ये फसवणूक व आयटी अॅक्ट अंतर्गत गुन्हे नोंद आहेत. आरोपीने स्वप्निल वारूळे, हेमंत गायकर, रुद्रेश गोधळी, जयेश सोनावणे, जयेश नाईक, आदित्य म्हात्रे, तन्मय म्हात्रे आदी विविध बनावट नावे वापरल्याचे तपासात समोर आले आहे. नवी मुंबई पोलिसांनी महिलांना आवाहन केले आहे की, ऑनलाईन मेट्रोमोनीयल साईटवर ओळख झालेल्या व्यक्तीच्या बोलण्यावर सहज विश्वास ठेवू नये. संबंधित व्यक्तीची नोकरी, उत्पन्न, ओळखपत्र यांची खातरजमा करावी. लग्नाचे आमिष दाखवून कर्ज काढण्यास किंवा पैसे देण्यास भाग पाडले जात असल्यास त्वरित जवळच्या पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करावी.