निलेश वाघ
उत्तर महाराष्ट्राचे आराध्य दैवत व देवीच्या आद्यस्वयंभु शक्तीपीठ असलेल्या नाशिकच्या सप्तशृंगगडावर शारदीय नवरात्रोत्सवाला उत्साहात प्रारंभ झाला.पहिल्याच माळेला हजारो भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. पुढील 9 दिवस गडावर विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. प्रारंभी विश्वस्त संस्थेच्या मुख्य कार्यालयात विश्वस्त संस्थेचे अध्यक्ष तथा जिल्हा न्यायाधीश अभय लाहोटी यांनी सपत्नीक भगवतीच्या अलंकारांचे पूजन केले. यानंतर विश्वस्त संस्थेच्या मुख्य कार्यालायातून देवीच्या अभूषणांची डफ,संबळ व पारंपारिक वाद्यावर पहिल्या पायरीपर्यंत सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. यावेळी बोल अंबे मात की जय, सप्तशृंगी माता की जय असा जयघोष करत सप्तशृंगी मातेचा मंदिर परिसर दणाणून गेला होता.
त्यानंतर हे अलंकार मंदिरात नेण्यात आले. दरम्यान पंचामृताने देवीच्या उत्सव मूर्तीवर अभिषेक करण्यात आला. पहिल्या माळेला श्रीभगवतीस पांढऱ्या रंगाचे भरजरीचे पैठणी महावस्त्र नेसविण्यात आले. सांजशृंगारानंतर श्री भगवतीस अलंकार परिधान करण्यात आले. त्यात डायमंड जडीत सोन्याचे मंगळसुत्र, सोन्याचे पुतळ्यांचे गाठले, सोन्याचा मयुर हार, सोन्याचा गुलाब हार, सोन्याचे कर्णफुले, सोन्याची नथ, सोन्याचे पाऊल, चांदीचा कमरपउटा, चांदीचा मुगुट आदी अलंकारांचा समावेश आहे. आजची पंचामृत महापूजा प्रधान व जिल्हा सत्र न्यायाधीश श्रीचंद जगमलानी यांनी केली.
तसेच प्रधान व जिल्हा सत्र न्यायाधीश श्रीचंद जगमलानी, विश्वस्त संस्थेचे अध्यक्ष अभय लाहोटी यांच्या हस्ते श्री भगवती मंदिरात घटस्थापना करण्यात आली. याप्रसंगी पोलिस आयुक्त संदिप कर्णिक, ट्रस्टचे विश्वस्त उपस्थित होते. नवरात्रोत्सवानिमित्त महाराष्ट्र राज्यासह, गुजरात,मध्यप्रदेश राज्यातील लाखो भाविक दर्शनासाठी हजेरी लावतात. तर अनेक भाविक या ठिकाणी घट बसतात. भाविकांची गर्दी लक्षात घेता देवी मंदिर ट्रस्टच्यावतीने मंदिर भाविकांसाठी 24 तास खुले राहणार आहे.
अन्नपूर्णा प्रसादालयात भाविकांसाठी मोफत महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. भाविकांची निवासासाठी गैरसोय होवू नये म्हणून त्यादृष्टीने शिवालय परिसरात वॉटरप्रूफ निवाराशेड उभारण्यात आलेला आहे. पोलिस प्रशासनाच्यावतीने चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. नवरात्रोत्सव काळात खासगी वाहनानासाठी घाट रस्ता बंद करण्यात आला आहे. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्यावतीने विशेष बससेवा सुरू करण्यात आली. तर आबालवृद्ध व अपंग व्यक्तीला आदिमायेचे दर्शन सुकर व्हावे यासाठी फनिक्युलर ट्रॉली व रोपवे देखील 24 तास सुरू राहणार आहे. रोपवे व्यवस्थापनाच्यावतीने जय्यत तयारी करण्यात आली आहे.