New Bike Prices After GST Cut: नवरात्र, दसरा आणि दिवाळीनिमित्तानं दुचाकी खरेदी करणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे! 22 सप्टेंबरपासून दुचाकींच्या किंमती मोठ्या प्रमाणात कमी होणार आहेत. केंद्र सरकारने गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स (GST) च्या दरांमध्ये कपात करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. यामुळे रॉयल एनफिल्ड, हिरो, होंडा, टीव्हीएस आणि बजाज सारख्या लोकप्रिय कंपन्यांच्या बाईक्स आता अधिक स्वस्त होतील. अनेक कंपन्यांनी जीएसटी कपातीचा फायदा थेट ग्राहकांपर्यंत पोहोचवण्याची घोषणा केली आहे, ज्यामुळे सणासुदीच्या काळात बाईक विक्रीला मोठी चालना मिळण्याची अपेक्षा आहे.
नव्या नियमांनुसार, आता 5 आणि 18 टक्के अशा दोनच दरात जीएसटी लागू होणार आहे. यापूर्वी 5, 12, 18 आणि 28 टक्के असे चार दर होते. 28 टक्के दरातील वस्तूंचा समावेश आता 18 टक्क्यांमध्ये करण्यात आला आहे. यामुळे 350 सीसी पेक्षा कमी इंजिन क्षमता असलेल्या दुचाकींच्या किंमती मोठ्या प्रमाणात कमी होतील.
बुलेट, पल्सर, अपाचे होणार स्वस्त
जीएसटी कपातीनंतर रॉयल एनफिल्ड, बजाज, टीव्हीएस, यामाहा आणि होंडा यांसारख्या कंपन्यांच्या लोकप्रिय मॉडेल्सच्या किंमती कमी होणार आहेत. रॉयल एनफिल्डने 350 सीसी सिरीजच्या बाईक्सची किंमत रु. 22,000 पर्यंत कमी करण्याची घोषणा केली आहे. यामध्ये क्लासिक 350, बुलेट 350, मेटियोर 350, हंटर 350 आणि गोअन क्लासिक 350 या मॉडेल्सचा समावेश आहे.
पशुपती मोटर्सचे डीलर सतवीर सिंह यांच्या मते, या बदलामुळे 22 सप्टेंबरनंतर दुचाकींच्या विक्रीत लक्षणीय वाढ होण्याची अपेक्षा आहे. ते म्हणाले की, "आमच्याकडे बुकिंग खूप वाढल्या आहेत आणि प्रत्येक ग्राहकाला 22 सप्टेंबरनंतरच डिलिव्हरी हवी आहे." या सणासुदीच्या हंगामात दुचाकींची विक्री दुप्पट होण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली.
( नक्की वाचा : UPI Cash Withdrawal : ATM विसरा! फक्त यूपीआयने मिळेल रोख रक्कम, QR कोडनं काढा पैसे, जाणून घ्या संपूर्ण पद्धत )
कोणत्या कंपनीच्या बाईक किती रुपयांनी स्वस्त होणार?
कंपन्यांनी दिलेल्या माहितीनुसार, विविध बाईक्सच्या किंमतींमध्ये खालीलप्रमाणे कपात अपेक्षित आहे:
रॉयल एनफिल्ड (Royal Enfield):
क्लासिक 350: - 19,726 रुपये
बुलेट 350: - 17,663 रुपये
हंटर 350: - 17,675 रुपये
मेटियोर 350: - 20,827 रुपये
रॉयल एनफिल्डच्या 350 सीसी सिरीजची किंमत 22,000 रुपयांपर्यंत कमी होणार.
बजाज (Bajaj):
बजाजच्या दुचाकींच्या किमती 20,000 रुपयांपर्यंत तर तिचाकींच्या किमती 24,000 रुपयांपर्यंत कमी होतील.
प्लॅटिना 100: - 7,062 रुपये
पल्सर 125: - 8,518 रुपये
पल्सर 150: - 11,374 रुपये
हिरो (Hero):
स्प्लेंडर प्लस: - 8,022 रुपये
एचएफ डिलक्स: - 6,581 रुपये
एक्सट्रीम 125आर: - 9,913 रुपये
होंडा (Honda):
शाइन 100: - 6,887 रुपये
शाइन 125: - 9,034 रुपये
यामाहा (Yamaha):
यामाहा मोटर इंडियाने आर15, एमटी15, एफजी सिरीज आणि एरोक्स 155 सारख्या मॉडेल्सच्या किमतीत 17,500 रुपयांपर्यंत कपात करण्याची घोषणा केली आहे.
आर15 व्ही4: - 18,978 रुपये
एमटी 15 व्ही2.0: - 16,955 रुपये
एफझेड-एसएफआय: - 13,519 रुपये
( नक्की वाचा : New GST Rates: बाहेर जेवायला जाताय? आता तुमचा खिसा जास्त रिकामा होणार नाही! वाचा कसा होणार तुमचा फायदा )
टीव्हीएस (TVS):
टीव्हीएस मोटर कंपनीने अपाचे, रोनिन, रेडर, आणि स्पोर्ट यांसारख्या लोकप्रिय मोटरसायकल तसेच एनटॉर्क, ज्युपिटर आणि झेस्ट या स्कूटरच्या किमतीत कपात करणार असल्याची घोषणा केली आहे.
अपाचे आरटीआर 160: - 12,142 रुपये
अपाचे आरटीआर 200: - 14,862 रुपये
अपाचे आरआर 310: - 23,999 रुपये
अपाचे आरटीआर 310: - 27,800 रुपये
400 सीसीवरील बाईक्स महागणार
एकिकडे अनेक बाईक्स स्वस्त होत असताना, 350 सीसी पेक्षा जास्त इंजिन क्षमता असलेल्या काही बाईक्सची किंमत वाढणार आहे. यात रॉयल एनफिल्डच्या हिमालयन 450, गुरिल्ला 450 आणि स्क्रॅम 440 या बाईक्सचा समावेश आहे. कारण या बाईक्सवर नव्या जीएसटी दरांनुसार उच्च कर स्लॅब लागू होईल.
उद्योग क्षेत्रातील तज्ज्ञांच्या अंदाजानुसार, ही जीएसटी कपात केवळ दुचाकींच्या मागणीला चालना देणार नाही, तर सणासुदीच्या काळात नवीन बाईक खरेदी करणाऱ्या ग्राहकांनाही प्रोत्साहन देईल.