Ambernath News: अंबरनाथ नगर परिषदेत नवा ट्विस्ट, शिवसेनेची भाजपला युतीची साद! पुढे काय होणार?

Ambernath News: अंबरनाथ नगर परिषदेत शिवसेना शिंदे गट राष्ट्रवादी अजित पवार गटाला मान्यता मिळाल्यानंतर शिवसेनेकडून भाजपाला युतीसाठी ऑफर देण्यात आली आहे.

जाहिरात
Read Time: 3 mins
Ambernath News: येणाऱ्या काही दिवसांत अंबरनाथमधील हे सत्तानाट्य आणखी रंगण्याची चिन्हे आहेत.
अंबरनाथ:

Ambernath News: अंबरनाथ नगर परिषदेत शिवसेना शिंदे गट राष्ट्रवादी अजित पवार गटाला मान्यता मिळाल्यानंतर शिवसेनेकडून भाजपाला युतीसाठी ऑफर देण्यात आली आहे.  जिल्हाधिकाऱ्यांनी शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या युतीला अधिकृत मान्यता दिली. त्यानंतर आता अंबरनाथमधील सत्तेची समीकरणे पूर्णपणे बदलली आहेत. या नव्या घडामोडींनंतर शिवसेनेने आता भाजपाला युतीसाठी खुली ऑफर दिली असून, यामुळे शहरातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.

नव्या आघाडीची सरशी आणि राजकीय पेच

अंबरनाथ नगरपरिषदेच्या निवडणुकीत शिवसेना शिंदे गट आणि भाजपने स्वतंत्रपणे नशीब आजमावले होते. या निवडणुकीत नगराध्यक्ष पदावर भाजपचा उमेदवार विजयी झाला असला, तरी सभागृहातील संख्याबळाचा विचार करता पारडे शिवसेना शिंदे गटाच्या बाजूने झुकलेले दिसते. 

Advertisement

शिवसेनेने राष्ट्रवादी काँग्रेससोबत (अजित पवार गट) हातमिळवणी केली असून, या आघाडीला आता प्रशासकीय स्तरावर अधिकृत गटाची मान्यता मिळाली आहे. या नव्या आघाडीमुळे नगर परिषदेतील सत्तेचे केंद्र शिवसेनेकडे सरकल्याचे चित्र आहे.

( नक्की वाचा : पुन्हा तेच दिवस येणार? पेट्रोलचे दर आणि PM मोदींचे आवाहन; भारत 'WFH 2.0' साठी खरंच तयार आहे का? )
 

शिवसेनेचे भाजपाला युतीसाठी आवाहन

जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्णयानंतर आता शिवसेना शिंदे गटाने भाजपाला सत्तेत सहभागी होण्यासाठी साद घातली आहे. शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आणि प्रलंबित कामे मार्गी लावण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन काम करण्याची गरज असल्याचे मत स्थानिक शिवसेना नेत्यांनी व्यक्त केले आहे. मात्र, ही ऑफर म्हणजे राजकीय गरज आहे की केवळ रणनीती, याबाबत तर्कवितर्क लावले जात आहेत.

जुने वाद आणि मतभेद ठरणार अडथळा?

गेल्या काही काळापासून अंबरनाथमध्ये शिवसेना आणि भाजप या दोन्ही मित्रपक्षांमध्ये विविध मुद्द्यांवरून तीव्र मतभेद समोर आले आहेत. निवडणुकीदरम्यान आणि त्यानंतरही अनेक विषयांवर दोन्ही पक्षांचे नेते एकमेकांसमोर उभे ठाकल्याचे पाहायला मिळाले होते. विकासकामांचे श्रेय घेण्यावरून आणि स्थानिक वर्चस्वावरून झालेले हे उघड वाद पाहता, भाजप शिवसेनेची ही ऑफर स्वीकारणार का, हा मोठा प्रश्न आहे.

( नक्की वाचा : Pune News: आई-वडिलांचं मौन मुलीच्या जीवावर बेतलं; पुण्यात 18 वर्षांच्या श्रुतीचा भयंकर शेवट ! नेमकं काय घडलं? )

भाजपाची भूमिका काय?

शिवसेनेच्या या अनपेक्षित प्रस्तावावर भाजपने अद्याप आपली भूमिका स्पष्ट केलेली नाही. जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्णयाचा अभ्यास करून भाजप आपली पुढील रणनीती ठरवणार असल्याचे समजते. शिवसेनेसोबत सत्तेत सहभागी व्हायचे की विरोधी बाकावर बसून आपली ताकद वाढवायची, या द्विधा मनस्थितीत सध्या भाजपचे स्थानिक नेतृत्व दिसत आहे.

Advertisement

पुढील काळ सत्तानाट्याचा ठरणार

स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ही बदलती समीकरणे आगामी कालावधीसाठी महत्त्वाची आहेत. अंबरनाथमध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादीची युती भक्कम झाली असली, तरी भाजपला सोबत घेण्यात त्यांना यश येते का, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल. येणाऱ्या काही दिवसांत अंबरनाथमधील हे सत्तानाट्य आणखी रंगण्याची चिन्हे असून, भाजपच्या भूमिकेकडे संपूर्ण राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

Topics mentioned in this article