पनवेल महापालिकेकडून नागरिकांना मालमत्ता कराची बिले पाठवण्यात आली आहेत. यात अनेक चुका असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. याचा सर्वाधिक फटका हा सिडकोच्या नवीन झालेल्या वसाहतींना बसत आहे. त्या पैकीच एक सिडकोचे हंसध्वनी गृहसंकुल आहे. इथल्या रहिवाशांनी या विरोधात थेट पनवेल महापालिकेचे कार्यालय गाठले. तिथे महापालिकेचे आयुक्त मंगेश चितळे यांची भेट घेतली. या भेटीत ज्या पद्धतीने मालमत्ता कर आकारला गेला आहे. त्यात कोणत्या त्रुटी आहेत हे रहिवाशांनी दाखवून दिले. त्यानंतर आयुक्तांनीही योग्य ती कारवाई करणार असल्याचे आश्वासन दिले आहे.
('NDTV मराठी'चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
हंसध्वनी गृहसंकुलातील सर्व सदनिकांतील क्षेत्रफळाची सूची क्रमांक 2 नुसार फेरमोजणी करून द्यावी अशी मागणी रहिवाशांनी केली आहे. शिवाय सिडको कडून सदनिका धारकांना प्रत्यक्षात ताबा मिळालेल्या दिनांक पासून मालमत्ता कर लागू करण्यात यावा असेही आयुक्तांना सांगण्यात आले. त्याच बरोबर एप्रिल 2021 पासून ते मार्च 2025 पर्यंतचे एकत्रित बिल देऊन त्यावरती दंड 3500 रुपये ते 4500 रुपयेपर्यंत लावण्यात आलेला आहे. हा दंड माफ करण्यात यावा अशीही मागणी करण्यात आली आहे. सर्व सदनिका व गाळेधारकांची नावे निशुल्कपणे मालमत्ता करांच्या बिलावरती भोगवटा धारक म्हणून नोंदवण्यात यावीत ही त्यातली महत्वाची मागणीही केली आहे.
ट्रेंडिंग बातमी - 'राजकारणात एक तर मी राहीन, नाहीतर फडणवीस राहतील'
यावर पनवेल महापालिकेच आयुक्त मंगेश चितळे यांनी रहिवाशांना आश्वास दिले आहे. हंसध्वनी गृहसंकुलातील सर्व सदनिका धारकांच्या क्षेत्रफळाची फेरमोजणी योग्य प्रकारे करून मालमत्ता कर बिलावर दुरुस्ती करण्यात येईल असे त्यांनी सांगितले. त्याच बरोबर सदनिका धारकाने आपल्या सदनिकेचा प्रत्यक्ष ताबा घेतलेल्या दिनांका संदर्भात सिडको अधिकाऱ्यांशी चर्चा करून मालमत्ता कर बिलात योग्य ती दुरुस्ती करण्यात येईल. त्याच बरोबर भविष्यात पनवेल महानगरपालिकेची मालमत्ता कर दंडा संदर्भात कोणती योजना लागू करण्यात आली तर दंड माफ करून देण्यात येऊ शकेल. शिवाय ज्यांनी मालमत्ता कर बिल भरलेले आहेत. अशा योजनेच्या वेळेस त्यांची रक्कम रिफंड अथवा पुढील बिलामध्ये ऍडजेस्टमेंट करण्यात येईल असे आश्वास चितळे यांनी दिले आहे.
ट्रेंडिंग बातमी - ठाकरेंची मराठा आरक्षणावर रोख 'ठोक' भूमिका, कोणाची पंचाईत होणार?
या वसाहतीमध्ये आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील नागरिक मोठ्या प्रमाणात आहेत. त्यात कामगार, रिक्षा चालक, भाजीवाले ,माथाडी कामगार यांचा समावेश आहे. हंसध्वनी प्रमाणेच पनवेलमध्ये राहाणाऱ्या अनेक नागरिकांना अशाच पद्धतीचा मालमत्ता कर आकारण्यात आल्याच्या अनेक तक्रारी आहेत. त्यामुळे यातून मार्ग काढण्याचे आव्हान पनवेल महापालिके समोर आहे. दरम्यान हा प्रश्न मार्गा लागावा यासाठी नागरिकांच्या वतीने सतीश पाटील, राहुल जगधने, सुरेश पाटील, शशिकांत वाघमारे, सुनील मासाळ यांच्या शिष्टमंडळाने भेट घेतली.