मेहबुब जमादार, प्रतिनिधी
Mumbai Pune Express Way Accident : कोचीहून गुजरातकडे 21 टन प्रोपिलीन (Propylene) गॅस वाहून नेणाऱ्या टँकरचा (NL.01 AF.5040) बोरघाट परिसरात अचानक ब्रेक फेल झाला. बोरघाट पोलीस टॅप जवळ आज सकाळी 10 वाजताच्या सुमारास ही घटना घडली. ब्रेक फेल झाल्याचं चालकाच्या लक्षात येताच त्याने प्रसंगावधान राखत रस्त्याच्या कडेला असलेल्या आरसीसी रिटेनिंग वॉलला जोरदार धडक दिली आणि टँकरचा वेग नियंत्रणाल आणला. चालकाच्या सतर्कतेमुळं या एक्स्प्रेस वेवर मोठा अपघात टळला.
घटनेची माहिती मिळताच महामार्ग वाहतूक पोलीस बोरघाट,आयआरबीची पेट्रोलिंग टीम,देवदूत यंत्रणेची फायर ब्रिगेड,डेल्टा फोर्स,महाराष्ट्र सुरक्षा बलचे जवान तसेच हेल्प फाउंडेशनची टीम आणि पेट्रोलिंग वाहनांचा ताफा घटनास्थळी दाखल झाला. सुरक्षेच्या कारणास्तव मुंबईकडे जाणारी वाहतूक काही काळ पूर्णतः बंद ठेवण्यात आली होती.
क्रेनच्या साहाय्याने टँकर घटनास्थळावरून बाहेर काढला
हेल्प फाउंडेशनचे केमिकल एक्सपर्ट धनंजय गीध यांनी टँकरची तांत्रिक स्थिती,दाब,गळतीचा धोका आदी बाबींची तपासणी करून सुरक्षिततेबाबत माहिती घेतली. क्रेन आणि पुलरच्या सहाय्याने टँकर घटनास्थळावरून जवळपास 2 किलोमीटर अंतरावर असलेल्या एका मोकळ्या जागी हलवण्यात आला. खोपोली पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सचिन हिरे आणि महामार्ग वाहतूक पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वप्निल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही प्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण झाली.
नक्की वाचा >> Pune News : पुण्यावर मोठं संकट? स्थानिकांसह प्रवाशांनी राहा अलर्ट, 'या' भागात नागरिकांची पळापळ; Video व्हायरल
आरटीओ अधिकारी रावते यांनी वाहनाची तांत्रिक तपासणी केली. खोपोली पोलीस स्टेशन मध्ये या अपघाताची नोंद करण्यात आली आहे. टँकर ओढणारे वाहन पूर्णतः निकामी झाले असून दुसऱ्या वाहनाच्या साहाय्याने टँकर गुजरातकडे रवाना करण्यात येणार आहे.काही दिवसांपूर्वीच प्रोपिलीन गॅस वाहतूक करणाऱ्या टँकरच्या अपघात झाला होता. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नव्हती. पंरतु, मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर तब्बल 32 तास मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. यामुळे प्रवाशांचे आतोनात हाल झाले होते.
ही घटना ताजी असतानाच पुन्हा एकदा प्रोपोलिन गॅस टँकरचा अपघात झाल्याने प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे. उतारावर ब्रेक फेल झाल्यानंतर वाहन अनियंत्रित झाले असते तर मोठ्या प्रमाणावर जीवितहानी आणि पर्यावरणीय नुकसान होण्याची शक्यता होती. या पार्श्वभूमीवर धोकादायक रसायनांची वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कडक तपासणी,नियमित फिटनेस चाचण्या आणि संबंधित कंपन्यांनी विशेष सुरक्षा उपाययोजना तातडीने राबविण्याची गरज आहे.