सौरभ वाघमारे, प्रतिनिधी
Delhi Bomb Blast Solapur And Mumbra Connection : राजधानी दिल्लीच्या लाल किल्ल्याजवळ सोमवारी 10 नोव्हेंबरला एका आय-20 कारमध्ये मोठा स्फोट झाला होता. या स्फोटात जवळपास 13 लोकांचा मृत्यू झाला, तर 20 हून अधिक जण जखमी झाले. दिल्ली स्फोट प्रकरणी तपास यंत्रणांकडून कसून तपास केला जात आहे. अशातच पुण्यातील दहशतवाद विरोधी पथकाने (ATS) सोलापूरमध्ये मोठी कारवाई केली आहे. पुण्यातील एटीएसची टीम गेल्या काही दिवसांपासून सोलापूरात तळ ठोकून होती. अशातच तपासादरम्यान त्यांनी सोलापूरचा आयटी इंजिनिअर जुबेर हंगरगेकरला अटक केली आहे. दिल्ली बॉम्बस्फोटाशी संबंधीत चौकशी करण्यासाठी जुबेरला ताब्यात घेण्यात आलं आहे. तसच जुबेरच्या आणखी एक सोलापूरचा आयटी इंजिनिअर मित्राला एटीएसने ताब्यात घेतलं आहे.
अल-कायदा संबंधित साहित्य, कागदपत्रे आणि...
मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील एटीएसचे पथक सोलापूरमध्ये तपास करत होते. दिल्ली स्फोट प्रकरणात चौकशी करण्यासाठी या पथकाने धडक कारवाई करत आरोपी जुबेर हंगरगेकरला अटक केलीय. जुबेरकडे असलेले अल-कायदा संबंधित साहित्य, कागदपत्रे आणि संपर्क क्रमांकाबाबतचा डेटा जप्त करण्यात आला आहे. दिल्ली बॉम्बस्फोटानंतर मुंब्रा आणि कोंढवा येथे जुबेरच्या संपर्कातील दोघांना एटीएसने ताब्यात घेतले होते.
नक्की वाचा >> CCTV Video: कल्याणमधील प्रसिद्ध बिल्डरला ठार मारण्याची धमकी, शिवसेनेच्या माजी नगरसेवकाच्या मुलासह 7 जणांवर...
जुबेर सोलापूरमध्ये होता मुक्कामी
18-20 ऑक्टोबरला जुबेर सोलापूरमध्ये राहिला होता. त्याआधी त्याने चेन्नई दौरा केला होता. दरम्यान, जुबेरने सोलापूरमध्ये अनेकांशी संपर्क साधल्याचं उघडकीस आलंय, त्यामुळे एटीएसने काही जणांची चौकशी सुरु आहे. यापूर्वीही एटीएसच्या पथकाने सोलापूरात तपास केला होता. एका आरोपीला पुण्यात चौकशीसाठी नेण्यात आलं होतं. दरम्यान, जुबेर न्यायालयीन कोठडीत असून, एटीएसचे पथक सर्व बाजूंनी सखोल तपास करत आहेत.