अविनाश पवार, प्रतिनिधी
Pune chakan traffic : पुण्याजवळचं चाकण हे अनेक ॲटोमोबाईल उद्योगांचं केंद्र आहे. गेल्या काही काळापासून या भागात वाहतूक कोंडीची समस्या नेहमीची बनलीय. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही या मुद्याची गंभीर दखल घेत एका बैठकीत ही कोंडी सोडवण्याबाबत निर्देश दिले होते. चाकणमधील आधीच गंभीर असलेली वाहतूक कोंडी आज (बुधवार, 13 ऑगस्ट) आणखी तीव्र बनली. पोलिसांची टोईंग व्हॅनच या वाहतूक कोंडीला कारणीभूत ठरली.
एका नागरिकाने मोबाईलवर रेकॉर्ड केलेल्या व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसते की, टोइंग व्हॅनच्या कारवाईमुळे मुख्य रस्त्यावर मोठी वाहतूक कोंडी झाली. या घटनेवर त्या नागरिकाने संतप्त प्रतिक्रिया देत पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
गेल्या काही दिवसांपासून चाकणमधील ट्रॅफिक समस्या अधिकच तीव्र होत असून, याचा थेट परिणाम इथल्या ॲटोमोबाईल उद्योगावर होत आहे. अनेक नागरिकांच्या जीवितालाही यामुळे धोका निर्माण झाला आहे. तरीही समस्येवर ठोस उपाययोजना दिसत नसल्याची तक्रार स्थानिकांनी केलीय.
( नक्की वाचा : Pune News : चाकण भागातील वाहतूक कोंडी कशी दूर होणार? अजित पवारांनी सांगितला उपाय )
अजित पवारांनी दिले होते निर्देश
चाकणसह परिसरात येणाऱ्या अवजड वाहनांची संख्या अधिक असल्याने वाहतूक कोंडी होते. त्यामुळे अशा वाहनांवर ठराविक वेळेची बंधने घालत एमआयडीसी भागात ट्रॅक टर्मिनल सुरू करण्यावर भर देत वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्यासाठी आरटीओ यांच्यासह पोलीस यंत्रणेने संयुक्तपणे नियोजन करणे अपेक्षित आहे. यासह कचऱ्याची समस्या निकाली काढत या भागातील अतिक्रमणे तातडीने काढावी. रस्ते विकसित करताना जर कोणी चुकीची भूमिका घेत असेल तर त्यांच्यावर नियमानुसार गुन्हे दाखल करण्याचे निर्देश अजित पवार यांनी दिले आहेत.
उपमुख्यमंत्र्यांनी नुकतीच पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या आकुर्डी येथील मुख्यालयात त्यांनी चाकण भागातील वाहतूक कोंडी दूर करण्याच्या अनुषंगााने पाहणी केल्यानंतर आढावा बैठक घेतली, त्यावेळी त्यांनी हे निर्देश दिले.