पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (PMRDA) हिंजवडी ते शिवाजीनगर या मेट्रो लाईन 3 ची दुसरी यशस्वी चाचणी घेतली आहे. शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेसाठी हा एक महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे. या महिन्याच्या सुरुवातीला, 23.3 किलोमीटर लांबीच्या पूर्णपणे उन्नत मार्गावर, मान डेपो ते पीएमआर-4 स्टेशन दरम्यान पहिली चाचणी घेण्यात आली होती. आता दुसरी चाचणी मान डेपो ते हिंजवडी फेज 2 दरम्यान सुमारे 40 किमी प्रतितास वेगाने पार पडली. या प्रकल्पाचे जवळपास 87% काम पूर्ण झाले आहे. ही दुसरी चाचणी आगामी मेट्रो लाईनची कार्यक्षमता, सुरक्षितता आणि क्षमता दर्शवते.
मेट्रो लाईन 3 ही पुणेकरांसाठी महत्वाची मानली जाते. दैनंदिन प्रवाशांसाठी, विशेषतः हिंजवडी आयटी पार्कमध्ये काम करणाऱ्यांसाठी, एक क्रांतीकारी प्रकल्प ठरेल अशी अपेक्षा आहे. ही मेट्रो कार्यान्वित झाल्यावर, हा मार्ग वेगवान, अधिक विश्वसनीय आणि पर्यावरणपूरक वाहतुकीचा पर्याय उपलब्ध करून देणार आहे. ज्यामुळे पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होणार आहे.
पुणे मेट्रो लाईन ३ ची प्रमुख वैशिष्ट्ये
- मार्ग: हिंजवडी ते शिवाजीनगर
- एकूण लांबी: 23.3 किमी (पूर्णपणे उन्नत)
- स्थानके: 23 ज्यात महत्त्वाच्या इंटरचेंज स्थानकांचा समावेश आहे
- गाडीची क्षमता: 1,000 प्रवासी प्रति 3-कोच, वातानुकूलित ट्रेन
- कमाल वेग: 80 किमी प्रतितास पर्यंत
- मार्ग पूर्ण होणार: मार्च 2026
सार्वजनिक-खाजगी भागीदारीतून (PPP) उभारणी
PMRDA आणि पुणे आयटी सिटी मेट्रो रेल लिमिटेड (PITCRL) यांच्या सार्वजनिक-खाजगी भागीदारी (PPP) मॉडेल अंतर्गत हा प्रकल्प राबविण्यात येत आहे. 25 नोव्हेंबर 2024 रोजी बांधकाम सुरू झाल्यापासून या प्रकल्पाने वेगाने प्रगती केली आहे. PMRDA च्या एका अधिकाऱ्याने सांगितले, "ही यशस्वी चाचणी आमच्या टीमच्या वचनबद्धतेचे प्रतीक आहे. मेट्रो लाईन 3 पुणे, विशेषतः हिंजवडी परिसरातील वाहतूक कोंडी कमी करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावणार आहे.
नक्की वाचा - Javed Sheikh: काम ड्राव्हरचं, घर पत्र्याचं, तरही 500 कोटीचा मालक, कोण आहे जावेद शेख?
सप्टेंबरमध्ये अंशतः सुरू होण्याची शक्यता
हिंजवडीतील मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते. त्यामुळे पुणेकरांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे. त्यामुळे सप्टेंबर 2025 पर्यंत मेगापोलिस सर्कल ते बालेवाडी फाटा पर्यंतचा 13 किलोमीटरचा टप्पा सुरू करण्याची PMRDA ची योजना आहे असं सुत्रांनी सांगितलं. जर ही मेट्रो लाईन सुरू झाली तर प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. या मेट्रो लाईनचे बांधकाम अंतिम टप्प्यात पोहोचले आहे. त्यामुळे पुणेकरांचा आता अधिक वेगवान आणि सुरक्षित प्रवासाचा मार्ग मोकळा होणार आहे.