Ganesh Chaturthi Pune Metro Timings: गणेशोत्सवानिमित्त पुणे मेट्रोने प्रवाशांच्या सोयीसाठी आपल्या वेळापत्रकात बदल केला आहे. बाप्पाच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना रात्री उशिरापर्यंत प्रवास करता यावा यासाठी मेट्रोने विशेष सेवा जाहीर केली आहे. 30 ऑगस्ट ते 6 सप्टेंबर 2025 या कालावधीत पुणे मेट्रो सकाळी 6.00 ते मध्यरात्री 2.00 वाजेपर्यंत धावणार आहे. ही सेवा विशेष वेळापत्रकानुसार असणार आहे. पुणे मेट्रोच्या या निर्णयामुळे भाविकांना बाप्पाचे दर्शन घेणे अधिक सोयीचे होणार आहे.
नक्की वाचा: पुणेकरांसाठी Good News! मेट्रोच्या फेऱ्या वाढणार, दर 6 मिनिटांनी धावणार
यंदाच्या गणेश चतुर्थीपासून म्हणजे 26, 27 आणि 29 ऑगस्ट 2025 या दिवसांसाठी मेट्रोची नियमित सेवा सकाळी 6.00 ते रात्री 12.00 वाजेपर्यंत असेल. त्यानंतर 30 ऑगस्ट ते 6 सप्टेंबर 2025 या काळात मेट्रो मध्यरात्री 2.00 वाजेपर्यंत सुरू राहील. तसेच, अनंत चतुर्दशीच्या दिवशी, 6 सप्टेंबर 2025 रोजी सकाळी 6.00 पासून; 7 सप्टेंबर 2025 च्या रात्री 12.00 वाजेपर्यंत पुणे मेट्रोची सेवा अखंडितपणे सुरू राहणार आहे. म्हणजेच पुणे मेट्रोची सेवा या काळात 41 तास अखंडपणे सुरू असेल.
नक्की वाचा: कुठेही, कितीही वेळा फिरा; फक्त 100 रुपयांत! गणेशोत्सवापूर्वी पुणे मेट्रोची भन्नाट योजना
पुणे मेट्रोने दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी, 8 सप्टेंबर 2025 पासून मेट्रोची सेवा पुन्हा नियमित वेळेनुसार सुरू होईल. बाप्पाच्या दर्शनासाठी येणाऱ्या नागरिकांनी पुणे मेट्रोचा अधिकाधिक वापर करून पर्यावरणपूरक प्रवास करावा, असे आवाहन मेट्रो प्रशासनाने केले आहे. यामुळे वाहतूक कोंडी टाळण्यासही मदत होईल. शहराच्या विविध भागातून मेट्रोच्या माध्यमातून प्रवास करणे सुरक्षित आणि सोयीचे ठरेल, असा विश्वास प्रशासनाने व्यक्त केला आहे.