- इंदापूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे हर्षवर्धन पाटील आणि दत्ता भरणे यांनी एकत्र येण्याचा निर्णय घेण्यात आला आहे
- हा निर्णय शरद पवार, अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आला आहे
- संघर्षामुळे विकासामध्ये अडथळे निर्माण होत असल्याने सामाजिक सलोखा टिकवण्यासाठी एकत्र येण्याचा विचार केला गेला
देवा राखुंडे
एकमेकांचे राजकीय वैरी एकत्र आल्याचे चित्र इंदापूरमध्ये पाहायला मिळत आहे. त्यामुळे राजकारण कोणत्या वळणावर चाललं आहे याची चर्चा सुरू झाली आहे. इंदापुरात मंत्री दत्ता भरणे आणि हर्षवर्धन पाटील हातात हात घालून एकत्र दिसत आहेत. मात्र हे चित्र समोर येण्या आधी पडद्या मागे काय झालं? दोन्ही राष्ट्रवादी एकत्र कशा आल्या याची आतली बातमी ही हर्षवर्धन पाटील यांनी दिली आहे. हे राजकारण विकासाच्या वळणावर आलं असल्याचं ही त्यांनी सांगितलं. अजित पवारांसोबत जाण्याचा निर्णय कसा झाला? या पुढच्या काळात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का या प्रश्नांची उत्तर देत त्यांनी राजकारणात सध्या खळबळ उडवून दिली आहे.
हर्षवर्धन पाटील यांनी NDTV मराठीला दिलेल्या खास मुलाखतीत अनेक खुलासे केले आहेत. इंदापूरच्या राजकारणात हर्षवर्धन पाटील आणि दत्ता भरणे यांचा संघर्ष सर्वश्रूत आहे. पण संघर्षाच्या वळणावरून विकासाच्या वळणावर हे राजकारण आले आहे असं पाटील यांनी स्पष्ट केलं. आम्ही दोघे आता जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी एकत्र आलो आहोत. हा निर्णय शरद पवार, अजित पवार, सुप्रिया सुळे यांनी मिळून घेतला आहे. त्यांचे आदेश आले ते आम्ही मान्य केले. आमच्यातल्या संघर्षाचा त्रास कार्यकर्त्याला होतो. त्यामुळे हे कुठे तरी थांबायला पाहीजे होतं असंही ते म्हणाले.
शरद पवार हे आमचे नेते आहेत. त्यांनी निर्णय घेतला. जिल्हा परिषदेला एकाच चिन्हावर लढायचं आहे असं त्यांनी सांगितलं. त्यांनी निर्णय घेतला त्यामुळे तो पाळणे आम्हाला बंधनकारक असल्याचं ते म्हणाले. तसाच आदेश हा अजित पवारांनी दत्ता भरणे मामांना दिला. त्यांनी ही तो मान्य केला. त्यामुळे आम्ही दोघे ही एकत्र आलो आहोत. ज्यावेळी आमच्यात संघर्ष होता त्यावेळी त्यांची आणी आपली भूमीका वेगळी होती असंही ते म्हणाले. पण या संघर्षाचा कार्यकर्त्यांना, गावाला त्रास होतो. विकासात अडथळे निर्माण होता. सामाजिक सलोखा टिकला पाहीजे. विकासाची गंगा लोकां पर्यंत पोहोचली पाहीजे असं ते म्हणाले.
या स्थानिक निवडणुका आहेत. त्यामुळे एकत्र आलो आहेत. निवडणुका या भांडणासाठी नसतात. ही विचारांची लढाई असते. त्यांचा पक्ष वेगळा, माझा वेगळा. त्यामुळे एकमेका विरोधात लढलो. आमच्यात वाद नव्हता. तालुक्याच्या विकासासाठी कुटुता कमी करण्यासाठी आम्ही एकत्र येण्याचा निर्णय घेतला आहे. मारामाऱ्या टाळायच्या आहेत. या पुढे ही आम्ही एकत्रच राहाण्याचं ठरवलं आहे. जिल्ह्यातील 60 ग्रामपंचायतीमध्ये ही आम्ही एकत्र लढणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे. भविष्यात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येतील का असा प्रश्नही त्यांना विचारण्यात आला. त्याचं ही उत्तर हर्षवर्धन पाटील यांनी दिलं.
राष्ट्रवादी काँग्रेसचं विलिनिकरण होणार का याबाबत शरद पवार आणि अजित पवार हे एकत्र निर्णय घेतील. तो निर्णय हा पक्ष नेतृत्वाचा आहे. पण सध्या तरी राज्यात महायुती आहे. त्या महायुतीचे आम्ही भाग आहोत असं म्हणत त्यांनी पुढच्या काळात काय होईल याचे जणू संकेतच दिले आहेत. फक्त पुणे जिल्हा नाही तर राज्यातील अनेक ठिकाणी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्याचं त्यांनी सांगितलं. त्यामुळे सध्या आम्ही एकत्र आलो आहोत. पुढे राजकारणात काय होईल हे सांगता येत नाही असं ही हर्षवर्धन पाटील यांनी सांगितलं.