अविनाश पवार
पुणे जिल्ह्यातील शिरूर, खेड, जुन्नर परिसरात बिबट्याची मोठ्या प्रमाणात दहशत आहे. गेल्या विस दिवसात या भागातील एका नरभक्षक बिबट्याने तिन जणांचा जिव घेतला होता. त्यात दोन लहान मुलांचा समावेश होता. त्यानंतर स्थानिकांमध्ये मोठ्या प्रमाणात असंतोष निर्माण झाला होता. त्यानंतर सरकारला जाग आली आणि काही उपाययोजना केला. या बिबट्यांचा बंदोबस्त करण्यासाठी अकरा कोटीचा निधी ही मंजूर केला. ही दिलासा देणारी बाब असली तरी त्यावर दुसऱ्याच दिवशी विरजण पडल्याची घटना घडली आहे. ही घटना खेड तालुक्यातल्या काळेवाडी या ठिकाणी घडली. इथं बिबट्या, चिमुकला आणि बचावासाठी धावलेला कुत्रा यांच्यातला जीव वाचवण्याचा थरार सर्वांनीच अनुभवला.
खेड तालुक्यातील काळेवाडी गावात ही घटना घडली. सायंकाळच्या सुमारास गावातील सात वर्षांचा मुलगा आपल्या घराच्या अंगणात खेळत होता. त्याचवेळी जवळच्या झाडीत बिबट्या दबा धरून बसला होता. तो त्या चिमुकल्यावर हल्ला करण्याच्या तयारीत होता. पण त्यावेळी या मुलाच्या घरातील पाळीव कुत्रा ही तिथेच होता. त्यालाही झुडपात काही तरी हालचाल होत असल्याचं जाणवलं. बिबट्या त्या चिमुकल्यावर झेप घेणार होता. त्याच वेळी कुत्र्याने त्या बिबट्याच्या दिशेने जोरात भुंकण्यास सुरूवात केली. कुत्रात जोरात पळत घराच्या अंगणात आला.
नक्की वाचा - Pune News: शिरूरमधील तिघांचा बळी घेणारा नरभक्षक बिबट्या ठार; वनविभागाची कारवाई
कुत्रा अचानक भुकू लागल्याने तो लहान मुलगा ही सतर्क झाला. त्याने ही झुडपात काही तरी असल्याचं पाहीले. तसेच त्यांने कसला ही विचार न करता घरात धूम ठोकली. त्यामुळे तो बालबाल बचावला. या घटनेनंतर काळेवाडी आणि परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. ग्रामस्थांनी तात्काळ वनविभागाला याची माहिती दिली असून, बिबट्याचा शोध घेण्यासाठी सापळे लावण्याची तयारी सुरू करण्यात आली आहे. गेल्या काही आठवड्यांपासून खेड–आंबेगाव–जुन्नर–शिरूर परिसरात बिबट्यांच्या हालचालींमध्ये मोठी वाढ झाल्याचं स्पष्ट दिसत आहे.
पिंपरखेड, जांबुत, आणि आता काळेवाडी या भागांमध्ये घडलेल्या घटनांमुळे नागरिकांमध्ये तीव्र चिंता निर्माण झाली आहे. स्थानिक नागरिकांच्या मते, “गावाच्या शिवारात दररोज बिबट्यांचे पाऊलखूण दिसतात. रात्री पशुधनावर हल्ले होतात.” त्यामुळे प्रशासन आणि वन विभागाने त्वरित आणि ठोस उपाययोजना करण्याची गरज असल्याचं नागरिकांचं म्हणणं आहे. दरम्यान, वन खात्याचे अधिकारी सांगतात की, परिसरात कॅमेरे बसविण्यात येणार असून निगराणी वाढवली जाईल. तसेच बिबट्यांच्या संख्येवर नियंत्रण ठेवण्यासाठी विशेष पथक कार्यरत आहे.या घटनेमुळे पुन्हा एकदा पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील बिबट्यांचा प्रश्न गंभीर स्वरूपात समोर आला आहे.