Malegaon Blast : मालेगाव स्फोट प्रकरणातील माजी ATS प्रमुखांच्या गौप्यस्फोटाला RSS ची साथ, वाचा नेमकं काय घडलं?

RSS Backs Former ATS Chief’s Raghuvanshi: मालेगाव बॉम्बस्फोटाच्या चौकशीबाबत माजी आयपीएस अधिकारी के.पी. रघुवंशी यांनी केलेल्या खळबळजनक खुलाशामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

जाहिरात
Read Time: 3 mins
Malegaon Blast : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने आपली भूमिका स्पष्ट केली असून रघुवंशी यांनी मांडलेले सत्य 'दुर्दैवी' असल्याचे म्हटले आहे.
मुंबई:


RSS Backs Former ATS Chief's Raghuvanshi: मालेगाव बॉम्बस्फोटाच्या चौकशीबाबत माजी आयपीएस अधिकारी के.पी. रघुवंशी यांनी केलेल्या खळबळजनक खुलाशामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. यूपीए सरकारच्या काळात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) इंद्रेश कुमार यांना अटक करण्यासाठी आपल्यावर प्रचंड दबाव होता, असा दावा रघुवंशी यांनी केला आहे. या दाव्यावर आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने आपली भूमिका स्पष्ट केली असून रघुवंशी यांनी मांडलेले सत्य 'दुर्दैवी' असल्याचे म्हटले आहे.

माजी पोलीस अधिकारी के.पी. रघुवंशी यांच्या 35 वर्षांच्या पोलीस कारकिर्दीवर आधारित 'ट्रबलशूटर' (Troubleshooter) हे आत्मकथनपर पुस्तक नुकतेच प्रकाशित झाले आहे. ज्येष्ठ पत्रकार आणि लेखक जितेंद्र दीक्षित यांनी हे पुस्तक लिहिले आहे. या पुस्तकात रघुवंशी यांनी त्यांच्या कार्यकाळातील अनेक धक्कादायक प्रसंगांचा उलगडा केला आहे. 2010 मध्ये महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाचे (ATS) प्रमुख असताना त्यांना दिल्लीतून वारंवार फोन करून आणि बोलावून घेऊन इंद्रेश कुमार यांना अटक करण्यास सांगण्यात येत होते, असा आरोप त्यांनी केला आहे.

Advertisement

संघाकडून सत्याचे स्वागत 

मुंबई प्रेस क्लबमध्ये झालेल्या एका पत्रकार परिषदेत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कोकण प्रांताचे कार्यवाह विठ्ठलराव कांबळे यांनी रघुवंशी यांच्या धैर्याचे कौतुक केले. एका प्रामाणिक अधिकाऱ्याला केवळ राजकीय दबावापोटी त्रास सहन करावा लागला, ही लोकशाहीतील अत्यंत दुर्दैवी घटना असल्याचे त्यांनी सांगितले. रघुवंशी यांनी आपले अनुभव मोकळेपणाने मांडणे हे विचार स्वातंत्र्याचे लक्षण असल्याचे सांगत, त्यांनी हे सत्य उशिरा का होईना पण लोकांसमोर आणले, याचे संघाने स्वागत केले आहे.

( नक्की वाचा : RSS News : आता लक्ष्य तरुण आणि हिंदू संमेलने; कोकण प्रांतात संघाचे 'मेगा प्लॅनिंग' वाचा सविस्तर )
 

पुस्तकात काय आहे?

पुस्तकातील माहितीनुसार, तत्कालीन केंद्र सरकारमधील एका बड्या मंत्र्याने मालेगाव स्फोटाच्या कटात इंद्रेश कुमार यांचा सहभाग असल्याचे सांगून त्यांना तात्काळ अटक करण्याचे आदेश रघुवंशी यांना दिले होते. मात्र, रघुवंशी यांनी पुराव्याशिवाय अटक करण्यास स्पष्ट नकार दिला. या नकाराचा परिणाम म्हणून त्यांना एटीएस प्रमुखपदावरून तडकाफडकी हटवण्यात आले. कोणत्याही ठोस पुराव्याशिवाय एखाद्या व्यक्तीला गोवणे आपल्याला मान्य नव्हते, असे त्यांनी पुस्तकात स्पष्टपणे म्हंटले आहे.

बाळासाहेब ठाकरेंच्या अटकेबाबतही मोठे खुलासे

के.पी. रघुवंशी यांनी केवळ मालेगाव प्रकरणावरच नाही, तर तत्कालीन राज्य सरकारमधील घडामोडींवरही प्रकाश टाकला आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना अटक करण्यासाठी तत्कालीन गृहमंत्री छगन भुजबळ यांनी कसा दबाव निर्माण केला होता, याचे सविस्तर वर्णन पुस्तकात आहे. इतकेच नाही तर, बाळासाहेबांच्या अटकेला उशीर का होत आहे, याचे उत्तर देण्यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी आपल्याला थेट सोनिया गांधी यांच्यासमोर उभे केले होते, असा खळबळजनक दावाही रघुवंशी यांनी केला आहे.


रघुवंशी यांच्या अनुभवांचा खजिना असलेले हे पुस्तक 28 फेब्रुवारी रोजी मुंबई पोलीस क्लबमध्ये एका विशेष कार्यक्रमात प्रकाशित झाले. महाराष्ट्राचे माजी पोलीस महासंचालक ए.एन. रॉय आणि रॉ (RAW) चे माजी उपप्रमुख व्ही. बालचंद्रन यांच्या हस्ते या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. या पुस्तकातील दाव्यांमुळे आता जुन्या प्रकरणांची पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली असून राजकारणात याचे मोठे पडसाद उमटण्याची शक्यता आहे.
 

Advertisement