आषाढी वारी पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर मुक्ताईनगरमध्ये वारकऱ्यांची मांदियाळी पाहायला मिळत आहे. खानदेशासह विदर्भ व मध्य प्रदेशातून हजारो दिंड्या आषाढी वारीसाठी मुक्ताईनगरमध्ये दाखल झाल्या आहेत. आषाढी वारी पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर संत मुक्ताईची महापूजा करण्यात येते. पहाटेपासूनच मुक्ताईच्या मंदिरात वारकऱ्यांची दर्शनासाठी गर्दी केली आहे. यावर्षी प्रथमच संत मुक्ताईच्या नऊ किलो चांदीच्या पादुका पालखी सोहळ्यात विराजमान होणार आहेत.
आषाढी एकादशीनिमित्त राज्यभरातून विविध संतांच्या पालख्या पंढरपूरकडे प्रस्थान करतात. दरम्यान या सर्वात प्रथम मान संत मुक्ताईच्या पालखीला असून आज संत मुक्ताईची पालखी मुक्ताईनगर येथून पंढरपूरकडे प्रस्थान करणार आहे. या आषाढी वारी पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर मुक्ताईनगरमध्ये वारकऱ्यांची मांदियाळी पाहायला मिळत असून पालखी सोहळ्यात सहभागी होण्यासाठी खानदेशासह विदर्भ व मध्य प्रदेशातून हजारो दिंड्या या मुक्ताईनगरमध्ये दाखल झाले आहेत. पहाटेपासूनच संत मुक्ताईच्या मंदिरात महापूजा महाआरती यासह भजन कीर्तन इत्यादी धार्मिक कार्यक्रम पार पडत आहेत.
नक्की वाचा - मुंबईकरांना पावसासाठी किती दिवस करावी लागणार प्रतीक्षा? हवामान विभागाकडून अलर्ट
दरम्यान, निर्जला एकादशीनिमित्ताने आज पंढरपुरात लाखो भाविकांनी गर्दी केली आहे. हरिनामाचा गजर मुखी विठ्ठल विठ्ठल नाम अशा जयघोषात पंढरी नगरी दुमदुमून गेली होती. आषाढी एकादशी पूर्वी येणारी निर्जला एकादशीला वारकरी संप्रदायात अनन्य साधारण महत्त्व आहे. त्यामुळे या एकादशीला भाविक मोठ्या संख्येने पंढरपूरात येऊन विठ्ठल दर्शन घेतात. एकादशीनिमित्त मंदिर परिसर नामदेव पायरी चंद्रभागा वाळवंट हा भाग वारकऱ्यांनी फुलून गेला होता.आज विठ्ठल दर्शनासाठी सुमारे पाच तासांचा कालावधी लागत होता.