KDMC Election 2026 "शिंदे गट म्हणजे MIM"; मनसेच्या पाठिंब्यानंतर राऊतांचा संताप अनावर, राज ठाकरेंना दिला सल्ला

KDMC Election 2026 : कल्याण डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीच्या निकालानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा भूकंप झाला आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
KDMC Election 2026 : संजय राऊत यांनी यावेळी थेट राज ठाकरेंनाच सल्ला दिला आहे.
मुंबई:

KDMC Election 2026 : कल्याण डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीच्या निकालानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा भूकंप झाला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने अनपेक्षितपणे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला पाठिंबा जाहीर केल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. विकासाच्या नावाखाली मनसेने घेतलेल्या या भूमिकेमुळे ठाकरे गटात संतापाची लाट असून, खासदार संजय राऊत यांनी यावर अत्यंत कडक शब्दात आपली भूमिका मांडली आहे.

.... त्यांची हकालपट्टी करा - राऊत

मनसेने शिंदे गटाला दिलेल्या पाठिंब्यावर बोलताना संजय राऊत यांनी स्पष्ट केले की, कल्याण डोंबिवलीचा हा विषय अत्यंत चिंताजनक आहे. हा केवळ स्थानिक पातळीवरचा निर्णय आहे असे म्हणून चालणार नाही. एखादे स्थानिक नेतृत्व पक्षाच्या मूळ ध्येयधोरणांच्या विरोधात जाऊन काम करत असेल, तर पक्षनेतृत्वाने त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करणे गरजेचे आहे. 

काँग्रेसने जसे भाजपशी हातमिळवणी करणाऱ्या आपल्या 12 नगरसेवकांना पक्षाबाहेर काढले, तसाच कठोर निर्णय इथेही अपेक्षित असल्याचे राऊत यांनी स्पष्ट केले.

( नक्की वाचा : KDMC Election 2026 : कल्याण डोंबिवलीत शिंदेंना पाठिंबा का दिला? मनसे नेत्यांनी सांगितली A to Z कारणं )

'पक्षांतर करणारे राजकीय मनोरुग्ण'

संजय राऊत यांनी या संदर्भात राज ठाकरे यांच्याशी चर्चा झाल्याचे सांगितले. काही लोक स्वार्थासाठी पक्ष सोडून जातात, अशा प्रवृत्तीबद्दल राज ठाकरेंनीही नाराजी व्यक्त केली आहे. अशा प्रकारे पक्षांतर करणाऱ्यांना राऊत यांनी राजकीय मनोरुग्ण असे संबोधले आहे. शिवसेनेच्या चिन्हावर निवडून येऊन दुसऱ्या गटाला मदत करणाऱ्यांवर पक्षनेतृत्वाने तातडीने कारवाई करून, आपण या भूमिकेशी सहमत नाही हे स्पष्ट करायला हवे, असेही ते म्हणाले.

शिंदे गट हा मराठी माणसांमधील एमआयएम

 संजय राऊत यांनी शिंदे गटाची तुलना एमआयएमशी केली. ते म्हणाले की, शिंदे गट हा मराठी माणसांमधील एमआयएम असून तो बेईमान आणि महाराष्ट्रद्रोही आहे. ज्यांनी बाळासाहेब ठाकरे आणि महाराष्ट्राशी गद्दारी केली, त्यांच्याशी कोणतेही राजकीय संबंध ठेवता कामा नयेत. अशा गद्दारांना साथ देणारे लोक देखील त्याच विशेषणांना पात्र ठरतात, असा आरोप राऊत यांनी केला.

( नक्की वाचा : KDMC Election 2026 : कल्याण डोंबिवलीत 'पॉवर गेम' महापौरपदी कुणाची होणार निवड? वाचा कोण आहेत प्रबळ दावेदार )

सर्वोच्च न्यायालयाच्या भूमिकेवर नाराजी

या संपूर्ण प्रकरणामागे पक्षांतराची कीड असून ती रोखणे सर्वोच्च न्यायालयाचे काम असल्याचे राऊत यांनी सांगितले. मात्र, आजही न्यायालयाने या प्रकरणातील सुनावणी पुढे ढकलल्याने त्यांनी संताप व्यक्त केला. सर्वोच्च न्यायालयाने आज पुन्हा माती खाल्ली आहे, अशी जळजळीत टीका त्यांनी केली. सुनावणी वारंवार पुढे ढकलणे म्हणजे देशाच्या ऱ्हासाला हातभार लावण्यासारखे आहे, असेही राऊत म्हणाले.
 

Advertisement