School Bus Fees: सरकारकडून मदत नाही, आता पालकांवरच भार! राज्यात स्कूल बसचे दर वाढले, वाचा सविस्तर बातमी

School Bus Fees: शाळेचा गणवेश, पुस्तके आणि इतर साहित्यासोबतच आता मुलांच्या शाळा प्रवासाचा खर्चही वाढणार आहे.

जाहिरात
Read Time: 3 mins
School Bus Fees: ही दरवाढ केवळ डिझेलच्या वाढत्या किमतींमुळे झालेली नाही, तर ...
मुंबई:

ऋतिक गणकवार, प्रतिनिधी

School Bus Fees: नवीन शैक्षणिक वर्षाची तयारी करत असलेल्या पालकांसाठी एक मोठी आणि खिशाला कात्री लावणारी बातमी आहे. शाळेचा गणवेश, पुस्तके आणि इतर साहित्यासोबतच आता मुलांच्या शाळा प्रवासाचा खर्चही वाढणार आहे. गेल्या काही दिवसांपासून वाहतूक क्षेत्रात होत असलेले बदल आणि वाढती महागाई याचा थेट फटका आता शालेय बसच्या शुल्काला बसला असून पालकांचे बजेट कोलमडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

स्कूल बस शुल्कात वाढ

स्कूल बस ओनर्स असोसिएशन महाराष्ट्रने राज्यातील शालेय बसच्या शुल्कात वाढ करण्याची अधिकृत घोषणा केली आहे. येत्या जून 2026 पासून सुरू होणाऱ्या 2026-27 या नवीन शैक्षणिक वर्षापासून ही दरवाढ लागू होणार आहे. असोसिएशनने घेतलेल्या निर्णयानुसार, बस शुल्कात एकूण 15 टक्के वाढ करण्यात आली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून बस चालक आणि मालक विविध आर्थिक समस्यांचा सामना करत होते, ज्याचा परिणाम आता या शुल्कवाढीच्या स्वरूपात समोर आला आहे.

Advertisement

( नक्की वाचा : काय आहे BH सीरिजची नंबर प्लेट? कुणाला मिळते आणि काय आहेत फायदे? सोप्या शब्दात समजून घ्या सर्व माहिती )

का वाढले बसचे दर?

ही दरवाढ केवळ डिझेलच्या वाढत्या किमतींमुळे झालेली नाही, तर त्यामागे अनेक तांत्रिक आणि आर्थिक कारणे असल्याचे संघटनेने स्पष्ट केले आहे. डिझेलच्या दरात झालेली वाढ, बसवरील चालक आणि क्लिनर या कर्मचाऱ्यांच्या वेतनात झालेली वाढ, गाड्यांच्या देखभालीचा खर्च आणि सुट्या भागांच्या किमतीत झालेली मोठी वाढ यामुळे बस चालवणे कठीण झाले आहे. याशिवाय विमा हप्ते, टोल, परवाना शुल्क आणि इ-चलन तसेच दंडाचा वाढता बोजा यामुळे ही 15 टक्के वाढ करणे अपरिहार्य असल्याचे बस मालकांचे म्हणणे आहे.

सरकारच्या उदासीनतेचा फटका

स्कूल बस ओनर्स असोसिएशनने दावा केला आहे की, ही शुल्कवाढ टाळण्यासाठी त्यांनी राज्य सरकार, परिवहन मंत्रालय आणि संबंधित विभागांकडे अनेकदा पाठपुरावा केला होता. शुल्कवाढ न करता बस चालकांना काही सवलती मिळाव्यात यासाठी विविध प्रस्तावही सादर करण्यात आले होते. 

मात्र, वारंवार निवेदने देऊनही सरकारकडून कोणताही सकारात्मक प्रतिसाद किंवा मदत मिळाली नाही. अखेर कोणताही पर्याय शिल्लक न राहिल्याने हा बोजा पालकांवर टाकण्याची वेळ आल्याचे संघटनेने प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटले आहे.

( नक्की वाचा : तुमचं पेट्रोल-डिझेल स्वस्त होणार? भारताची होर्मुजच्या कटकटीतून सुटका, आता या देशातून येणार स्वस्त तेल )
 

पालकांना सहकार्याचे आवाहन

विमान प्रवास असो किंवा इतर वाहतूक सेवा, सर्वत्र दरवाढ होत असताना शालेय बस सेवा टिकवून ठेवण्यासाठी हे पाऊल उचलणे गरजेचे होते, असे असोसिएशनने नमूद केले आहे. विद्यार्थ्यांची सुरक्षितता आणि नियमांचे पालन करून सेवा देणे आता पूर्वीच्या दरात शक्य राहिलेले नाही. त्यामुळे निर्माण झालेली परिस्थिती समजून घेऊन पालकांनी आणि शाळांनी सहकार्य करावे, असे आवाहन संघटनेने केले आहे. 

Advertisement

तसेच सरकारने अजूनही या प्रकरणात लक्ष घालून काही ठोस उपाययोजना कराव्यात, जेणेकरून विद्यार्थी आणि पालकांचे हित जपले जाईल, अशी मागणीही पुन्हा एकदा करण्यात आली आहे.