बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित वाघनखं अखेर साताऱ्यात दाखल झाली आहेत. ही वाघनखं शिवाजी महाराजांची नसल्याचा दावा अनेक इतिहासतज्ज्ञांकडून केला जात आहे. दरम्यान 17 जुलै रोजी अत्यंत गोपनीयता पाळत ही वाघनखं साताऱ्यातील वस्तू संग्रहालयात आणण्यात आली. कोणताही गाजावाजा न करता वाघनखं तत्काळ साताऱ्याला आणण्यात आली. काल लंडनहून कडेकोट सुरक्षा व्यवस्थेत वाघनखं मुंबईत आणण्यात आली आहे. वाघनखांच्या सुरक्षेसाठी प्रचंड गोपनीयता पाळण्यात येत असल्याची माहिती आहे. शिवप्रेमींसाठी उद्या वाघनखांसह शस्त्रास्त्र प्रदर्शनाचे उद्घाटन होणार आहे.
पुढील तीन वर्षे शिवप्रेमींना ही वाघनखं पाहता येणार आहे. उद्घाटनावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार व सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. सोबतच, उदयनराजे भोसले, शिवेंद्रराजे भोसले आणि छत्रपती घराण्यातील इतर उपस्थित राहतील, असं समजते. छत्रपतींची ही वाघनखं पाहण्यासाठी शिवप्रेमींची मोठी गर्दी उसळण्याची दाट शक्यता आहे.
नक्की वाचा - कोल्हापुरात कलम 163 लागू, 'या' गोष्टी करण्यावर बंदी
वाघनखांची वैशिष्ट्ये...
घटक- पोलाद, चामडे आणि रेशीम
मोजमाप-
लांबी- 8.6 सें.मी.
खोली- 9.5 सें.मी.
पट्टीची लांबी- 7.5 सें.मी.
अंगठ्याचा व्यास- 2.5 सें.मी. (मोठी)
अंगठ्याचा व्यास- 2.3 सें.मी. (लहान)
नखांतील अंतर (मोठी अंगठी ते लहान अंगठी)- 1.8 सें.मी., 1.8 सें.मी., 1.5 सें.मी.
एकूण वजन- 49 ग्रॅम
कसा असेल कार्यक्रम?
- सातारा येथील जिल्हा परिषद सभागृहात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत सकाळी 11 वाजता मुख्य कार्यक्रमास सुरुवात
- कार्यक्रमाच्या सुरुवातीला 'गडगर्जना' या तासभर चालणाऱ्या सांस्कृतिक कार्यक्रमाची मेजवानी असेल
- मुख्यमंत्र्यांसह सर्व मान्यवर दुपारी 12.30 वाजता राज्य वस्तू संग्रहालय येथे पोहोचतील.
- दुपारी 12.35 वाजता वाघनखांसमोरील पडदा बाजुला सारून वाघनखांसह शस्त्रास्त्र प्रदर्शनाचे उद्घाटन केले जाईल.
- हे प्रदर्शन पाहिल्यानंतर सर्व मान्यवर दुपारी 1 वाजता पुन्हा वस्तुसंग्रहालयातून जिल्हा परिषद सभागृहात परततील.
- दुपारी 1 ते 2.15 वाजेपर्यंत सर्व मान्यवरांचे स्वागत-सत्कार समारंभ व मार्गदर्शन होईल.
- या कार्यक्रमास मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसह सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार, छत्रपती घराण्याचे वंशज उदयनराजे भोसले, संभाजी राजे छत्रपतीछत्रपती व शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची प्रमुख उपस्थिती असेल.
- याशिवाय लंडनहून वाघनखं घेऊन आलेल्या व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट वस्तुसंग्रहालयाचे आंतरराष्ट्रीय कार्यक्रम प्रमुख निकोलास मर्चंड यांची कार्यक्रमात विशेष उपस्थिती असेल.