सेंट विल्फ्रेड महाविद्यालय व्यवस्थापनाला शिवसेना-युवासेनेचा 7 दिवसांचा अल्टिमेटम, मोठ्या आंदोलनाच्या तयारीत

सेंट विल्फ्रेड महाविद्यालयील विद्यार्थ्यांवर होत असलेल्या कथित प्रशासकीय मनमानी, शुल्क आकारणीतील अपारदर्शकता, विद्यार्थ्यांच्या हक्कांची होत असलेली पायमल्ली आणि शासन नियमांकडे केलेले दुर्लक्ष याविरोधात युवासेनेने आक्रमक भूमिका घेतलीय.

जाहिरात
Read Time: 2 mins
Shivsena Yuvasena Latest News Update

Shivsena-Yuvasena Latest News Update : पनवेल शेंडुग येथील सेंट विल्फ्रेड महाविद्यालयील विद्यार्थ्यांवर होत असलेल्या कथित प्रशासकीय मनमानी, शुल्क आकारणीतील अपारदर्शकता, विद्यार्थ्यांच्या हक्कांची होत असलेली पायमल्ली आणि शासन नियमांकडे केलेले दुर्लक्ष याविरोधात युवासेनेने आक्रमक भूमिका घेत महाविद्यालय व्यवस्थापनाला 7 दिवसांचा अंतिम अल्टिमेटम दिला आहे. यावेळी युवासेनेचे लोकसभा संपर्कप्रमुख पराग शरद मोहिते यांनी महाविद्यालय व्यवस्थापनाला धारेवर धरलं आणि विद्यार्थ्यांच्या तक्रारींवर तातडीनं उपाययोजन राबवण्याची मागणी केली. 

विद्यार्थ्यांच्या तक्रारीनुसार, महाविद्यालयात प्रवेश माहितीपत्रक उपलब्ध नसणे, शुल्क आकारणीत पारदर्शकतेचा अभाव, फीमध्ये तफावत, विद्यार्थी परिषद स्थापन न करणे, महिला विकास कक्ष आणि विद्यार्थी तक्रार निवारण व्यवस्था प्रभावी नसणे, संकेतस्थळ अद्ययावत नसणे, विद्यार्थ्यांची मूळ कागदपत्रे वेळेवर परत न देणे, गुणपत्रिकांबाबतचा गोंधळ आणि विद्यार्थ्यांशी कर्मचाऱ्यांकडून अयोग्य वर्तन अशा अनेक गंभीर बाबी समोर आल्या आहेत.

Advertisement

युवासेनेने विल्फ्रेड महाविद्यालयाबाबत उपस्थित केलेले प्रश्न

  • शासनाच्या निर्देशांनुसार शुल्क संरचना जाहीर का करण्यात आली नाही?
  • विद्यार्थ्यांकडून आकारण्यात येणाऱ्या प्रत्येक शुल्काचा कायदेशीर आधार काय?
  • विद्यार्थी परिषद आणि वैधानिक समित्या कार्यरत का नाहीत?
  • विद्यार्थ्यांच्या तक्रारींकडे दुर्लक्ष का केले जात आहे?
  • विद्यार्थ्यांचे शैक्षणिक आणि प्रशासकीय प्रश्न महिनोनमहिने प्रलंबित का ठेवले जात आहेत?

पराग मोहिते यांनी स्पष्ट इशारा देताना म्हटले की, "महाविद्यालय म्हणजे विद्यार्थ्यांचे भवितव्य घडविण्याचे मंदिर आहे. विद्यार्थ्यांना मानसिक त्रास, आर्थिक संभ्रम आणि प्रशासकीय अडथळे निर्माण करण्याचे केंद्र नव्हे. शासनाचे नियम धाब्यावर बसवून विद्यार्थ्यांवर अन्याय करणाऱ्यांना युवासेना कधीही पाठीशी घालणार नाही. प्रत्येक विद्यार्थ्याला न्याय मिळेपर्यंत आमचा संघर्ष सुरू राहील."

नक्की वाचा  >> KDMC News: 18 वर्षांपासून एकाच पदावर 2 अधिकारी कार्यरत, केडीएमसीत चाललंय तरी काय? अधिकाऱ्यांच्या बदलीची मागणी

युवासेनेने व्यवस्थापनाला ७ दिवसांच्या आत सर्व मुद्द्यांवर लेखी स्पष्टीकरण देऊन आवश्यक सुधारणा करण्याची मागणी केली आहे.अन्यथा विद्यार्थ्यांना सोबत घेऊन लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल. तसेच संपूर्ण प्रकरण उच्च शिक्षण संचालनालय, संबंधित विद्यापीठ, UGC,बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवा आणि इतर सक्षम शासकीय प्राधिकरणांकडे पुराव्यानिशी सादर करण्यात येईल.

"विद्यार्थ्यांच्या हक्कांवर गदा आणणाऱ्या कोणत्याही व्यवस्थापनाला युवासेना जाब विचारल्याशिवाय राहणार नाही. विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांविरुद्ध रस्त्यावरचा आणि कायदेशीर असा दोन्ही लढा दिला जाईल," असा निर्धार युवासेनेने व्यक्त केला आहे. यावेळी युवासेना जिल्हा अध्यक्ष प्रीतम सुर्वे, रोशन पुजारी, जिल्हा सचिव रोहन ढोले, विधानसभा संपर्क प्रमुख अभिनय सोमण, तालुका अध्यक्ष ऋषिकेश सोगे, सोशल मीडिया जिल्हा अध्यक्ष सागर रोकडे, महानगर अध्यक्ष प्रेम ठाकूर, विभाग अध्यक्ष गौरव खांडेकर, शहर उपाध्यक्ष फरहाद शेख, सोशल मीडिया शहर समन्वयक साई म्हाप्सू आदी उपस्थित होते.


Topics mentioned in this article