रेवती हिंगवे, प्रतिनिधी
Salil Ankola mother : माजी क्रिकेटपटू आणि अभिनेता सलील अंकोलाच्या आईनं राहत्या घरी आत्महत्या केल्याची माहिती आहे. माला अंकोला (वय 77) असं त्यांचं नाव आहे. त्यांनी पुण्यातील डेक्कन परिसरात राहत्या घरी आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली आहे. आत्महत्येचं कारण अद्याप अस्पष्ट आहे.
सलिल अंकोलानं इन्स्टाग्रामवर पोस्ट करत आईच्या मृत्यूची बातमी त्याच्या चाहत्यांना दिली आहे. मात्र या पोस्टमध्ये त्यानं आईचा मृत्यू कसा झाला याबाबत कोणतीही माहिती दिलेली नाही.
मास्टर ब्लाल्टर सचिन तेंडुलकरसोबत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केल्यामुळे सलिल अंकोला क्रिकेट फॅन्सना चांगलाच लक्षात आहे. महाराष्ट्र आणि मुंबईकडून देशांतर्गत क्रिकेट खेळलेल्या अंकोला फास्ट बॉलर होता.
अंकोलानं सचिनसोबतच 15 नोव्हेंबर 1989 रोजी पाकिस्तान विरुद्ध कराची टेस्टमध्ये पदार्पण केलं. पहिल्या टेस्टमध्ये त्यानं दोन विकेट्स घेतल्या. पण, दुर्दैवानं तीच त्याची शेवटची टेस्ट ठरली. अंकोलानं 20 वन-डेमध्ये भारताचं प्रतिनिधित्व केलं. त्यामध्ये त्यानं 13 विकेट्स घेतल्या आहेत.
सलील अंकोलाला दुखापतीमुळे क्रिकेट कारकिर्दीला अलविदा करावा लागला. त्यानंतर त्यानं हिंदी मालिका तसंच चित्रपटांमध्येही काम केलं. 'कोरा कागज' या मालिकेतील त्याची भूमिका विशेष गाजली. संजय दत्तची मुख्य भूमिका असलेल्या कुरुक्षेत्र या हिंदी चित्रपटातही त्यानं काम केलं आहे.