रिझवान शेख, प्रतिनिधी
Thane Metro News : ठाणेकरांच्या जिव्हाळ्याचा विषय असलेल्या मेट्रो प्रवासाचे स्वप्न आता सत्यात उतरताना दिसत आहे. शहरात मेट्रो कधी धावणार याची प्रतीक्षा आता संपत आली असून लवकरच ठाणेकरांचा प्रवास अधिक वेगवान आणि सुखकर होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मेट्रो प्रकल्प 4 ची प्राथमिक चाचणी पार पडली होती. आता या मार्गावरील उर्वरित स्थानकांसाठीच्या हालचालींना मोठा वेग आला आहे. त्यामुळे नवीन वर्षात ठाणेकरांना हक्काची मेट्रो मिळणार आहे.
कधी सुरु होणार ठाणे मेट्रो?
ठाणे मेट्रो प्रकल्प 4 च्या कामाला आता मोठी गती मिळाली आहे. सुरुवातीला केवळ 4 मेट्रो स्थानकांपर्यंतच ही चाचणी मर्यादित ठेवण्यात आली होती, मात्र आता पहिल्या टप्प्यातील गायमुख ते कॅडबरी जंक्शन दरम्यानच्या उर्वरित 6 स्थानकांसाठी ट्रायल रनची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार, नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच ठाणेकरांना मेट्रो प्रवासाची मोठी भेट मिळण्याची दाट शक्यता आहे. हा पहिला टप्पा गायमुख मेट्रो स्टेशनपासून सुरू होऊन कॅडबरी जंक्शन मेट्रो स्थानकापर्यंत असणार आहे. या टप्प्यातील सर्व तांत्रिक बाबींची पूर्तता सध्या वेगाने केली जात आहे.
( नक्की वाचा : CIDCO Home : नवी मुंबईतील सिडकोच्या घरांचे दर 10 टक्क्यांनी कमी; 17,000 घरांच्या लॉटरीबाबत सरकारचा मोठा निर्णय )
ठाणे मेट्रोची 10 स्टेशन कोणती?
ठाणे मेट्रोच्या पहिल्या टप्प्यात एकूण 10 स्थानकांचा समावेश असणार आहे. या स्थानकांवरच सध्या चाचणी घेतली जात असून ती प्रवाशांसाठी लवकरच खुली केली जातील.या स्टेशनची नावं खालीलप्रमाणे आहेत.
1) कॅडबरी
2) माजीवाडा
3) कपूरबावाडी
4) मानपाडा
5) टिकूजी -नी -वाडी
6) डोंगरी पाडा
7) विजय गार्डन
8) कासरवाडावली,
9) गव्हाणपाडा
10) गायमुख
कशी असेल ठाणे मेट्रो?
ठाणे मेट्रोचा हा एकूण प्रकल्प दोन भागांमध्ये विभागला गेला आहे. मेट्रो 4 ही 32.32 किमी लांबीची आहे, तर मेट्रो 4 अ ही 2.7 किमी लांबीची मार्गिका आहे. या दोन्ही मार्गिकांवर मिळून एकूण 32 स्थानके प्रस्तावित आहेत. वडाळा ते कासारवडवली या विस्तारित मार्गाचे काम जवळपास 80 टक्क्यांहून अधिक पूर्ण झाले आहे. नियोजनानुसार, कासारवडवली ते कॅडबरी जंक्शन हा पहिला भाग डिसेंबर 2025 पर्यंत पूर्णपणे तयार होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. यामुळे ठाणे शहरातील अंतर्गत वाहतुकीचा ताण मोठ्या प्रमाणात कमी होण्यास मदत होईल.
( नक्की वाचा : Pagdi Buildings : मुंबईतील पगडी इमारतींसाठी मेगा प्लॅन, भाडेकरूंना हक्काचे घर; वाचा FSI आणि TDR चा नवा फंडा )
पुढील टप्पे आणि प्रवासाची प्रतीक्षा
ठाणे मेट्रोचा पहिला टप्पा नवीन वर्षाच्या सुरुवातीला सुरू होईल. त्यानंतरच्या टप्प्यात 2026 मध्ये कॅडबरी जंक्शन ते गांधीनगर हा भाग प्रवाशांसाठी उपलब्ध होईल. संपूर्ण प्रकल्पाचा शेवटचा टप्पा म्हणजे वडाळापर्यंतची कनेक्टिव्हिटी 2027 मध्ये पूर्ण होण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.ठाणे शहरात नवीन वर्षात मेट्रो धावताना दिसेल, मात्र वडाळापर्यंतच्या प्रवासासाठी ठाणेकरांना अजून काही काळ वाट पाहावी लागणार आहे.