अंबानींचे हेलिकॉप्टर क्रॅश करण्याचा कट, आजपर्यंत सापडला नाहीये मास्टरमाईंड

30 एप्रिलच्या दुपारी हेलिकॉप्टरची पाहणी करण्यात आली होती. या पाहणीत धक्कादायक बाबी आढळल्या होत्या.

जाहिरात
Read Time: 4 mins
मुंबई:

साधारणपणे 4 वर्षांपूर्वी... नेमके सांगायचे झाल्यास फेब्रुवारी2021 रोजी संपूर्ण भारतात जरबदस्त खळबळ माजली होती. उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अँटालिया या इमारतीबाहेर स्फोटके सापडली होती. अँटालियाबाहेर एक स्कॉर्पिओ कार सापडली होती ज्यात ही स्फोटकं ठेवण्यात आली होती. मुकेश अंबानी यांना जीवे ठार मारण्याची ही एकप्रकारे धमकीच होती. ही घटना घडण्याच्या आधी 2009 साली एक घटना घडली होती. मुकेश अंबानी यांचे बंधू अनिल अंबानी यांना घातपात घडवत ठार मारण्याचा कट रचण्यात आला होता. सुदैवाने अनिल अंबानी यातून बचावले होते. अनिल अंबानी यांचे हेलिकॉप्टर क्रॅश करण्याचा कट रचण्यात आला होता. मात्र हा कट कोणी रचला होता, हे अद्याप कळू शकलेलं नाही. 

बेल 412 बनावटीचे हेलिकॉप्टर 

रिलायन्स अनिल धीरुभाई अंबानी समूहाचे प्रमुख अनिल अंबानी हे मुंबईहून त्यांना ज्या ठिकाणी जायचे असायचे त्या ठिकाणापर्यंत हेलिकॉप्टरने जात असत. बेल 412 बनावटीचे हे हेलिकॉप्टर होते आणि त्यातून एकावेळी 13 जण प्रवास करू शकायचे. अनिल अंबानी हे कफ परेड येथील त्यांच्या 'सी विंड' नावाच्या बंगल्यावरून निघायचे आणि ते महालक्ष्मी कोर्सवर यायचे. तिथून ते हेलिकटप्टरने त्यांना जिथे जायचे असायचे तिथपर्यंत जायचे. त्यांचं हे हेलिकॉप्टर देखभालीसाठी सांताक्रूझ येथील हँगरमध्ये ठेवण्यात येत असे. 

त्या दिवशी काय झाले?

24 एप्रिल 2009 रोजी अनिल अंबानी यांना महालक्ष्मी रेसकोर्सपासून नवी मुंबईतील धीरूभाई अंबानी नॉलेज सिटीला जायचे होते. त्यांच्यासोबत त्यांच्या कंपनीचे 10 वरिष्ठ अधिकारीही होते. या प्रवासाबद्दलची माहिती हेलिकॉप्टर चालकाला देण्यात आली होती. मात्र प्रवासाच्या एक दिवस आधी एक अत्यंत धक्कादायक घडामोड घडली होती. देशातील एका नामवंत उद्योजकाशी निगडीत ही बातमी असल्याने ती सगळ्या वृत्तवाहिन्या आणि वृत्तपत्रांमध्ये ठळकपणे प्रसिद्ध करण्यात आली होती. 

तपासणीत आढळली धक्कादायक बाब

30 एप्रिलच्या दुपारी भरत बोरगे आणि रामशंकर चव्हाण या दोन तांत्रिक अधिकाऱ्यांनी सांताक्रूझ हँगरमध्ये अनिल अंबानी यांच्या हेलिकॉप्टरची पाहणी केली होती. यावेळी त्यांना धक्का बसला, कारण हेलिकॉप्टरच्या गिअर बॉक्समध्ये दगड टाकले होते आणि हेलिकॉप्टरच्या फ्युएल टँकचे झाकणही उघडे होते. जर हेलिकॉप्टर हवेत झेपावले असते तर ते क्रॅश होणं निश्चित होतं. 

Advertisement

कट का रचला ?

बोरगे आणि चव्हाणांनी दिलेल्या माहितीच्या आधारे पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली होती. व्यावसायिक स्पर्धेतून हा सगळा प्रकार करण्यात आला असावा असा दाट संशय तक्रारदारांनी व्यक्त केला होता. अनिल अंबानी यांच्या हत्येचा कट रचण्यात आल्याचा आरोपही करण्यात आला होता. सांताक्रूझ पोलिसांनी तक्रारीनंतर तपास सुरू केला खरा मात्र या तपासावर अनिल अंबानी यांच्या कंपनीचे अधिकारी समाधानी नव्हते. 

रिलायन्स समूहाने केलेल्या मागणीच्या आधारे सांताक्रूझ पोलिसांकडून हा तपास काढून मुंबई  पोलिसांच्या गुन्हे शाखेकडे सोपवण्यात आला. राकेश मारीया हे तेव्हा गुन्हे शाखेचे प्रमुख होते. त्यांनी स्वत: या प्रकरणात लक्ष घातले. त्यांनी तपासामध्ये डीजीसीए आणि हवाई वाहतूक तज्ज्ञांची मदत घेतली होती. भादंसंच्या कलम 440 अंतर्गत जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा नोंदवला होता. 

Advertisement

बोरगेंच्या मृत्यूने खळबळ

गुन्हे शाखेने तपास सुरू केल्यानंतर 28 एप्रिल रोजी एक धक्कादायक घटना घडली. ज्या भरत बोरगे यांनी हेलिकॉप्टरमधील बिघाड पहिल्यांदा पाहिला होता, त्यांचा मृतदेह विलेपार्ले रेल्वे स्टेशनच्या रुळांवर सापडला. बोरगे यांच्या खिशात पोलिसांच्या नावाने एक सुसाइड नोटही सापडली होती. या नोटमध्ये, त्याने असा संशय व्यक्त केला होता की या प्रकरणात त्यालाच दोषी ठरवले जाऊ शकते. पोलिसांनी चौकशीसाठी बोलावल्यानंतर रिलायन्स समूहाच्या एका अधिकाऱ्याने आपल्याशी संपर्क साधल्याचेही त्याने लिहून ठेवले होते.  बोरगे यांच्या घरच्यांनी आरोप केला की त्याने आत्महत्या केली नाही, तर त्याची हत्या करून ती आत्महत्या असल्याचा बनाव करण्यात आला आहे.  

बोरगेंचा मृत्यू झाला, पण त्यांच्या मृत्यूपूर्वी पोलिसांनी एकदा त्यांचा जबाब नोंदवला होता. त्यांच्या जबाबाच्या आधारावर पोलिसांनी उदय वारेकर आणि पालराज तेवर या दोन लोकांना अटक केली. हे दोघेही हेलिकॉप्टरच्या देखभालीचे काम करणाऱ्या कंपनीत तंत्रज्ञ म्हणून काम करत होते. गुन्हे शाखेने या दोघांची कसून चौकशी केल्यावर त्यांनीच हेलिकॉप्टरमध्ये दगडाचे तुकडे टाकल्याचे समोर आले. पोलिसांनी याबद्दल माहिती देताना म्हटले होते की हा प्रकार अंबानी यांना ठार मारण्यासाठीच्या कटाचा भाग नव्हता तर कंपनी मॅनेजमेंट आणि युनियनमधील भांडणामुळे हा प्रकार करण्यात आला होता. अटक केलेले दोन्ही आरोपी महाराष्ट्र जनरल कामगार महासंघाचे सदस्य होते.

Advertisement

आरोपी निर्दोष, मास्टरमाईंड कोण?

जवळपास एक वर्ष मुंबईच्या कोर्टात त्यांच्यावर खटला चालला. 1 डिसेंबर 2010 रोजी कोर्टाने वारेकर आणि तेवर या दोघांनाही निर्दोष मुक्त केले. याचे मुख्य कारण म्हणजे ज्या रामशंकर चव्हाणने दोघांना घटना घडण्याआधी हेलिकॉप्टरजवळ पाहिले होते, त्याने कोर्टात साक्ष देताना आपला जबाब बदलला. याव्यतिरिक्त, पोलीस दोघांविरुद्ध कोणतेही ठोस पुरावे सादर करू शकले नाहीत.मुकेश अंबानी यांचे प्रकरण असो किंवा अनिल अंबानी यांचे, या दोन्हीमध्ये काही गोष्टी समान आहेत. दोन्ही प्रकरणांतील महत्त्वाच्या साक्षीदारांचा संशयास्पद मृत्यू झाला आणि दोन्ही प्रकरणातील खरे सूत्रधार आजही समोर आलेले नाहीत.

Topics mentioned in this article