रमेश शर्मा, प्रतिनिधी
Bhayander Railway Station: मुंबईची जीवनवाहिनी मानल्या जाणाऱ्या लोकल रेल्वेच्या भाईंदर स्थानकावर आज सकाळी (मंगळवार, 31 मार्च) एक हृदयद्रावक आणि तितकीच धक्कादायक घटना घडली आहे. ऐन गर्दीच्या वेळी एका 27 वर्षीय तरुणाने रेल्वे रुळावर झोकून देत स्वत:चं आयुष्य संपवलं. या घटनेमुळे स्थानक परिसरात आणि प्रवाशांमध्ये मोठी खळबळ उडाली असून काही काळासाठी रेल्वे सेवेवरही याचा परिणाम झाला होता.
काय आहे घटना?
भाईंदर रेल्वे स्थानकावरील फलाट क्रमांक 2 वर आज सकाळी सुमारे 10:30 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, ही लोकल येण्याची वेळ झाली असतानाच हा तरुण अचानक रेल्वे रुळावर उतरला. ट्रेन जवळ येण्यापूर्वीच तो रुळावर जाऊन झोपल्याचे सांगण्यात येत आहे. मोटरमनने गाडी थांबवण्याचा प्रयत्न केला असावा, परंतु तोपर्यंत उशीर झाला होता आणि या भीषण अपघातात तरुणाचा जागीच मृत्यू झाला.
( नक्की वाचा : Dombivli News: डोंबिवली हादरली! पालिका अधिकाऱ्या महिला कर्मचाऱ्याला व्हॉट्सॲप कॉल; सेटलमेंटसाठी मागितलं 'सुख' )
ऐन गर्दीच्या वेळी प्रवाशांची धांदल
सकाळची वेळ असल्याने मीरा-भाईंदर परिसरातून हजारो नोकरदार आणि विद्यार्थी मुंबईच्या दिशेने प्रवास करत असतात. फलाटावर प्रवाशांची मोठी गर्दी असतानाच ही घटना घडल्याने प्रवाशांमध्ये भीतीचे आणि गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. या घटनेमुळे फलाट क्रमांक 2 कडून जाणारी रेल्वे वाहतूक काही काळासाठी थांबवण्यात आली होती, ज्यामुळे कामावर जाणाऱ्या चाकरमान्यांचे हाल झाले.
पोलिसांकडून तपास सुरू आणि ओळख पटवण्याचे आवाहन
घटनेची माहिती मिळताच रेल्वे पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. पंचनामा करून तरुणाचा मृतदेह रुळावरून बाजूला काढण्यात आला आणि त्यानंतर रेल्वे सेवा पुन्हा पूर्ववत करण्यात आली. अद्याप या मृत तरुणाची ओळख पटलेली नाही. तो नक्की कुठला रहिवासी होता आणि त्याने हे टोकाचे पाऊल का उचलले, याचा तपास रेल्वे पोलीस करत आहेत. पोलिसांकडून आता आसपासच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज आणि मिसिंग तक्रारींची पडताळणी केली जात आहे.
| Helplines | |
|---|---|
| Vandrevala Foundation for Mental Health | 9999666555 or help@vandrevalafoundation.com |
| TISS iCall | 022-25521111 (Monday-Saturday: 8 am to 10 pm) |
| (If you need support or know someone who does, please reach out to your nearest mental health specialist.) | |