मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येने संपूर्ण महाराष्ट्र हादरला होता. त्याचे तिव्र पडसाद राज्यभर उमटले होते. ज्या पद्धतीने संतोष देशमुख यांचा खून करण्यात आला होता तो पाहात सर्वत्र संताप व्यक्त केला जात होता. जनतेचा रोष पाहून सरकारलाही कारवाई करणं भाग पडलं. मोठं मोठे मासे या केसमध्ये अडकले. मंत्र्यांना राजीनामा द्यावा लागाल. तर त्यांच्या खास व्यक्तीला जेलची हवा खावी लागली. त्यानंतर या केसची झटपट सुनावणी होवून निकाल लागेल असे आश्वासन देण्यात आले होते. पण तसे होताना दिसत नाही. त्याबाबत या केसचे सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी NDTV मराठीला दिलेल्या खास मुलाखतील मोठे वक्तव्य केले आहे.
संतोष देशमुख यांच्या हत्येचा खटला बीड जिल्ह्यात सुरू आहे. या खटल्यासाठी विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांची नियुक्ती सरकार मार्फत करण्यात आली आहे. सुरूवातीला निकम या खटल्यासाठी नियमित जात होते. पणनंतर ते या खटल्याच्या सुनावणीला येत नाहीत असा आरोप त्यांच्यावर होत होता. त्याबाबत निकम यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. शिवाय याखटल्यात काय सुरू आहे याबाबतही सांगितलं आहे. हा खटला का जलद गतीने सुरू नाही हे न्यायालयाला विचारलं पाहीजे असं निकम थेट म्हणाले आहे.
खटल्याला हजर राहील्यानंतर दर वेळी पंधारा-पंधरा दिवसांची तारीख दिली जाते. तिथं फक्त तारीख पे तारीख सुरू आहे. आपण या आधीच सांगितलं होतं की सहा महिन्याच्या आत आरोप निश्चित झाले पाहीजे. मी नेहमी या खटल्यासाठी बीडला जात होतो. पण तिथे काहीच काम होत नाही. सुनावणी होत नाही. फक्त तारीख दिली जाते. कोर्टात कामच चालत नसेल तर मी तिथे जावून काय करू असा प्रश्नच निकम यांनी केला आहे. त्यामुळे ज्या वेगाने या खटल्याची सुनावणी व्हायला पाहीजे तशी होत नाही याबाबत त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. शिवाय आपण का जात नाही याचे कारण ही सांगितले आहे.
हा खटला आपण लढवत असलो तरी आपण कुणालाही भीत नाही. आपला जन्म हनुमान जयंतीला झाला आहे असं ही त्यांनी सांगितलं. हा खटला माझ्याकडे आल्यावर सर्वात आधी आपल्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा फोन आला होता. त्यांनी आपल्याला संपूर्ण राज्यातील गुन्हेगारी संपवायची आहे असं सांगितलं होतं. त्यानुसार आपण हा खटला लढत आहोत. पण त्यात अपेक्षित वेग नाही याबद्दल त्यांनी या मुलाखतीत नाराजी व्यक्त केली आहे. संतोष देशमुख यांची हत्या झाल्यानंतर राज्यात मोर्चे निघाले होते. वाल्मिक कराड या मुख्य आरोपीला ही अटक करण्यात आली. त्याचे इतर साथिदारही जेलमध्ये आहे.
पण ज्या पद्धतीने या केसची सुनावणी होणे अपेक्षित आहे तशी ती होत नाही. त्यामुळे संतोष देशमुख हत्ये प्रकरणी नियमित सुनावणी कधी होणार हा खरा प्रश्न आहे. सुनावणी त्यानंतर निकाल, अपिल या सर्व गोष्टी आल्याच. त्यामुळे ज्या पद्धतीने निकम यांनी तारीख पे तारीख मिळत आहे तसचं देशमुख कुटुंबियांना मात्र प्रतिक्षाच करावी लागत आहे. आता या प्रकरणाला एक वर्ष होत आलं आहे. अनेकांच्या हे प्रकरण विस्मरणातही गेलं असेल. अशा वेळी पिडीत कुटुंबाला न्याय कधी मिळणार हा प्रश्न निर्माण होत आहे. यानंतर तरी या केसची नियमित सुनावणी होवून देशमुख कुटुंबाला न्याय मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.