उज्ज्वल निकम यांची ओळख एक निष्णात वकील म्हणून आहे. पण त्यांनी अचानक राजकारणात एन्ट्री केली. ऐवढच नाही तर त्यांनी लोकसभेची निवडणूक ही लढवली. भारतीय जनता पक्षाने त्यांना उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदार संघातून उमेदवारी दिली होती. त्यांच्या विरोधात काँग्रेसच्या वर्षा गायकवाड यांनी निवडणूक लढली. ही निवडणूक निकम सहज जिंकतील असं वाटत होतं. पण झालं उलटं. या निवडणुकीत उज्ज्वल निकम यांनी पराभवाचा सामना करावा लागला. कोर्टात जिंकणारा वकील राजकारणाच्या कोर्टात मात्र हरला. या निमित्ताने एक मजेशिर किस्सा निकम यांनी सांगितला. NDTV मराठीच्या प्रपंच कार्यक्रमात बोलताना त्यांनी हा किस्सा सांगितला.
एखाद्याच्या आरोपी विरोधात जर आपण केस लढलो आणि ती जिंकलो तर तो आरोपी आपल्यावर राग ठेवेल की नाही असा प्रश्न स्वत: निकम यांनी उपस्थित केला. त्याला उत्तर ही त्यांनीच दिलं. ते म्हणाले असे आरोपी कधीच राग ठेवत नाहीत असा आपला अनुभव आहे. त्यासाठी त्यांनी अबू सालेमचं उदाहरण दिलं. मी लढलेल्या केसमुळे अबू सालेमला जन्मठेपेची शिक्षा झाली. तो माझ्या मुळे जेलमध्ये आहे. पण ज्यावेळी त्याला माझी अँजिओप्लॅस्टी झाली हे समजलं त्यावेळी त्यांनी आपल्याला जेलमधून पत्र लिहीलं होतं. त्यात त्यांने प्रेमाने आपल्या तब्बेतीची विचारपूस केल्याचं त्यांनी सांगितलं.
पुढे जावून त्यांनी संजय दत्तबाबत ही एक आतली गोष्ट सांगितली. संजय दत्तला ही आपल्यामुळेच शिक्षा झाली होती. त्यावेळी तर एकाच विचाराची दोन सरकारं केंद्रात आणि राज्यात होती. तोच संजय दत्त गेल्या काही दिवसांपूर्वी आपल्याला भेटला होता. त्याने मला तुम्ही राजकारणात का आलात असा प्रश्न विचारला. त्यावर मी त्याला तू मला लोकसभेला मतदान केलं की नाही सांग असं विचारलं. त्यावर तो मी तुम्हालाच मतदान केलं असं म्हणाले. पण तो खोटं बोलत होता असंही निकम यांनी यावेळी सांगितलं.
संजय दत्त असो किंवा अबू सालेम यांना शिक्षा मिळवून देणारे हे उज्ज्वल निकमच होते. त्यांनी राज्यात अनेक महत्वाच्या केस लढल्या आहेत. त्यातील बहुतांश केसमध्ये त्यांना यश आलं आहे. कसाबलाही त्यांच्यामुळे फाशी मिळाली होती. उज्ज्वल निकम म्हणजे हमखास यश असं समिकरण झालं आहे. सध्या त्यांच्याकडे संतोष देशमुख हत्या प्रकरणाची केस आहे. विशेष सरकारी वकील म्हणून ते ही केस लढत आहेत. या केसच्या निकालाकडे ही सर्वांच्या नजरा लागल्या आहे. मात्र त्याची वेळेत सुनावणी होत नसल्याबद्दल निकम यांनी नाराजी व्यक्त केली आहे.