Ujjwal Nikam Story : जळगावचे उज्ज्वल निकम देशातील सर्वात चर्चित सरकारी वकील कसे बनले?

Ujjwal Nikam Story : संपूर्ण राज्य हादरवणाऱ्या तसंच देशाचं लक्ष वेधून घेणाऱ्या प्रकरणात उज्ज्वल निकम यांचीच सरकारी वकील म्हणून नेमणूक करा, ही मागणी सातत्यानं होत असते. 

जाहिरात
Read Time: 5 mins
मुंबई:

घटना क्रमांक 1

बदलापूरमधील शाळेत अल्पवयीन मुलीचा विनयभंग  शाळेतील शिपायांनी केला आणि संपूर्ण महाराष्ट्र हादरला. राज्यभर या प्रकरणाचे जोरदार पडसाद उमटले. या प्रकरणातील आरोपीला फासावर लटकवा, अशी मागणी होत होती. पण, त्याचवेळी सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांनीच केल लढवावी, अशी मागणी सर्वत्र केली जात होती.   माझ्याकडे जर ही केस दिली तर मी नक्कीच मुलीला न्याय मिळवून देईन असा विश्वास निकम यांनी माध्यमांसमोर व्यक्त केला होता. मात्र त्यानंतर उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींनी बदलापूर प्रकरणातील आरोपी अल्पवयीन आहे आणि या केससाठी सरकारी वकील म्हणून महिलाच असली पाहिजे असा आदेश दिला.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

घटना क्रमांक 2

बीड जिल्ह्यातल्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचं प्रकरण सध्या संपूर्ण राज्यात गाजत आहे. या हत्येनंतर राज्याचं राजकारण ढवळून निघालं आहे. या प्रकरणात देखील संतोष देशमुख यांना न्याय मिळवून देण्यासाठी उज्ज्वल निकम यांना सरकारी वकील करा अशी मागणी होत होती.

राज्यात गेल्या काही दशकात झालेल्या हायप्रोफाईल प्रकरणातील ही अलिकडची उदाहरणं. संपूर्ण राज्य हादरवणाऱ्या तसंच देशाचं लक्ष वेधून घेणाऱ्या प्रकरणात उज्ज्वल निकम यांचीच सरकारी वकील म्हणून नेमणूक करा, ही मागणी सातत्यानं होत असते. 

( नक्की वाचा : Walmik Karad MCOCA : वाल्मिक कराडला कसा लागला मोक्का? कोर्टातल्या युक्तिवादाची Inside Story )
 

महाराष्ट्रात कोणतीही घटना घडल्यानंतर ती केस अ‍ॅड. उज्ज्वल निकम यांनीच लढवावी यासाठी सर्वजण आग्रही असल्याचं यापूर्वी वारंवार दिसलं आहे. आरोपींचा कर्दनकाळ आणि सामान्य नागरिकांचे तारणहार अशी त्यांची प्रतिमा आहे. निकम यांची ही प्रतिमा कशी तयार झाली? एखाद्या खटल्याची तयारी ते कसे करतात? निकम यांच्या या प्रवासाचं रहस्य काय? त्यांच्या वाटचालीबाबत त्यांच्या जवळच्या आणि प्रतिस्पर्धी वकिलांना काय वाटतं? हे जाणून घेण्याचा प्रयत्न 'NDTV मराठी' नं केला आहे. 

कसा सुरु होतो निकमांचा दिवस?

उज्ज्वल निकम यांचा दिवस पहाटे चार वाजता सुरु होतो. ते पहाटे उठल्यानंतर त्यांच्याकडील खटल्यांचा अभ्यास करतात. हे खटले लढवताना कोणत्या केसचं उदाहरण द्यायचं, साक्षीदार कसे उभे करायचे याची तयारी निकम करतात. त्यानंतर व्यायाम करतात आणि कोर्टात जातात, असं त्यांचा मुलगा आणि वकील अनिकेत निकम यांनी सांगितलं. 

Advertisement

आम्ही कोणत्याही खटल्याची घरी चर्चा करत नाही. माझ्या आई आणि बायकोला त्याबाबत फारस माहिती नाही. त्यामुळे त्या कंटाळतात. मात्र बाबा माझ्याकडे असलेल्या अनेक खटल्यांमध्ये मार्गदर्शन करतात, असं अनिकेत यांनी 'NDTV मराठी' ला बोलताना सांगितले. 

उज्ज्वल निकम यांची कारकिर्द

उज्ज्वल निकम यांनी त्यांच्या कारकिर्दीची सुरुवात जळगाव येथे केली. त्यावेळी ते जिल्हा वकील म्हणून काम करत होते.  त्यांनी राज्य आणि राष्ट्रीय खटल्यांपर्यंत काम केले.  30 वर्षांच्या कारकिर्दीत 628 गुन्हेगाराला जन्मठेप आणि 37 गुन्हेगाराला फाशीची शिक्षा देण्यात त्यांना यश आले आहे.

Advertisement

निकम यांनी अनेक हायप्रोफाईल केस लढल्या आहेत. गुलशन कुमार हत्या, मरीन ड्राईव्ह बलात्कार प्रकरण, शक्तीमिल बलात्कार प्रकरण , प्रमोद महाजन यांची हत्या, खैरलांजी हत्या, कोपर्डी बलात्कार, प्रीती राठीचा खून , मोहसीन शेख खून, पल्लवी पूरकायस्थची हत्या अशा अनेक खटल्यात त्यांनी विशेष सरकारी वकील म्हणून भूमिका पार पाडली आहे.

बॉम्बस्फोट प्रकरणातील वकील

कल्याण रेल्वे स्टेशनजवळ 1991 साली झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणात निकम पहिल्यांदा चर्चेत आले. त्यांनी या प्रकरणातील आरोपींना दोषी सिद्ध केलं.  1993 मध्ये झालेल्या मुंबईत झालेल्या साखळी बॉम्ब स्फोटात त्यांची सरकारी वकील म्हणून नियुक्ती झाली आणि ते आणखी नावारूपास आले.2003 ला गेट वे ऑफ इंडिया येथे झालेला बॉम्बस्फोट आणि 2008 मध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा खटला देखील त्यांनी हाताळला. निकम यांना 2016 मध्ये भारत सरकारने पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केले. सध्या त्यांना झेड प्लस सुरक्षा देखील देण्यात आली आहे. 

Advertisement

'तेच का हवे? आम्ही का नको?'

हायप्रोफाईल केसमुळे निकम यांच नाव घरोघरी पोहोचले. एक खटला यशस्वीपणे तडीस नेल्यानंतर दुसरा त्यानंतर तिसरा अशी वेगवेगळी प्रकरणं त्यांनी हातळली आहेत. हायप्रोफाईल खटल्यात निकम यांचं नाव सातत्यानं पुढं येतं, त्यावर इतर वकिलांना काय वाटतं? हे आम्ही जाणून घेतलं.

उज्ज्वल निकम यांना माजी गृहमंत्री आर.आर. पाटील यांनीच मोठं केलं असल्याचा दावा एका ज्येष्ठ वकिलांनी नाव न सांगण्याच्या अटीवर केला. त्यांची नुसती हवा करुन ठेवली आहे, असंही त्यांनी सांगितलं. 


( नक्की वाचा : Sharad Pawar vs Amit Shah : शरद पवार अमित शाहांना हिणवतात 'ते' प्रकरण काय आहे? )

तर, निकम यांच्याकडे खटला सोपवल्यानंतर इतर वकिलांनी विधी आणि न्याय विभागात माहिती अधिकारांतर्गत तक्रार केली आहे, असं एका ज्येष्ठ वकिलांनी सांगितलं. एखाद्या खटल्यात. 'तेच का हवे, आम्ही का नको? असे प्रश्न विचारले होते, असं त्यांनी सांगितलं. 

आणखीन एका ज्येष्ठ वकिलांनी सांगितले की मंत्रालयात देखील त्यांना खटला दिल्यानंतर इतर सरकारी वकिलांनी अनेक वेळा विधी आणि न्याय विभागात आर टी आय टाकला आहे. यामध्ये आम्ही का नको तेच का हवे असे प्रश्न विचारलेले आहेत अशी माहिती दिली. 

सांगलीतील अनेक वकिलांनी आंदोलन देखील केले असल्याची माहिती एका ज्येष्ठ वकिलांनी दिली. तर, निकम भाजपाचे चेले असल्यानं त्यांना सातत्यानं चांगल्या केस दिल्या जातात असा आरोप एका वकिलानं नाव न सांगण्याच्या अटीवर केला.  'सातत्याने एका व्यक्तीला संधी दिली तर नवीन मुल कधी शिकणार? असे मत ज्येष्ठ वकील प्रदीप घरत' यांनी व्यक्त केले.  

निकम लोकप्रिय का?

उज्ज्वल निकम यांच्याबाबत त्यांच्या सहकारी वकिलांची मतं वेगवेगळी आहेत. पण, अनेक तरुण वकील त्यांचे खटले सुरू झाले तर ते ऐकण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी करतात हे देखील तितकेच खरे आहे.

शहाण्या माणसानं कोर्टाची पायरी चढू नये असं आपल्याकडं सर्रास बोललं जातं. पण, त्याचवेळी वेगवेगळ्या सिनेमांमधून कोर्टातील खटले आणि ते खटले लढवणारे वकील यांना मोठं ग्लॅमर मिळालं आहे. सरकारी वकिलांनी गरिबांना न्याय मिळवून द्यावा. आरोपींना कठोर शिक्षा करावी. चित्रपटात दिसतं ते प्रत्यक्षात घडावं अशीच सामान्यांची अपेक्षा असते. 

निकम यांनी कल्याणच्या प्रकरणात ते पहिल्यांदा दोषींचा गुन्हा सिद्ध करत ते दाखवून दिलं. त्यानंतरच्या मुंबई बॉम्बस्फोट खटल्यानं ते घरोघरी पोहचले. पुढं एकापाठोपाठ एक खटले त्यांच्याकडं चालत आले. या प्रकरणात त्यांच्या यशाचा स्ट्राईक रेट मोठा आहे. त्यामुळे प्रत्येक खटल्यानंतर त्यांची लोकप्रियता आणि मागणी वाढत चाललीय. इतर वकिलांचे आक्षेप असले तरी सरकारी वकिलांना ग्लॅमर मिळवून देण्याचं काम उज्ज्वल निकम यांनी केलं आहे. त्यांचं हे श्रेय कुणीही नाकारु शकणार नाही.