Health Service Scheme : केंद्रीय आरोग्य सेवा योजनेच्या (CGHS) दरांमध्ये सुधारणा करण्याची बाब केंद्र सरकारच्या विचाराधीन असून लवकरच त्यात सुधारणा केली जाईल, अशी ग्वाही केंद्रीय श्रम व रोजगार मंत्री मनसुख मांडविया यांनी दिली. राज्याचे सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी बुधवारी नवी दिल्ली येथे केंद्रीय श्रम व रोजगार मंत्री मांडविया यांची वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळासह भेट घेतली. या भेटीत महाराष्ट्रातील राज्य कामगार विमा योजना रुग्णालयांच्या सद्यस्थितीबाबत सविस्तर चर्चा झाली. राज्यातील कामगार रुग्णालयामध्ये दर्जेदार आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्याचे शासनाचे धोरण असुन राज्यातील कामगार रुग्णालयासंबंधीत प्रलंबित प्रश्नांची तातडीने सोडवणूक व्हावी, अशी मागणी आरोग्यमंत्री आबिटकरांनी यावेळी केली.
राज्यात कामगार विमा सोसायटीची 15 रुग्णालये असून योजनेची संलग्नित असलेल्या 450 खाजगी रुग्णालये व 134 सेवा दवाखान्याच्या माध्यमातून कामगार व सर्वसामान्य नागरिकांसाठी आरोग्य सेवा उपलब्ध करून दिली जाते. राज्यात सद्यस्थितीत 48 लाख 70 हजार 460 विमाधारक कामगार असून, कामगार व त्यांचे कुटुंबीय मिळून सुमारे 2 कोटी नागरिक विमा योजनेचा लाभ घेतात. केंद्रीय श्रम व रोजगार मंत्री यांच्या भेटीत उल्हासनगर, अंधेरी, कोल्हापूर येथील बांधकामांची सद्यस्थिती, विविध ठिकाणी सुरू असलेल्या रुग्णसेवा बाबतची चर्चा झाली.
(नक्की वाचा - Awhad vs Padalkar: विधानभवनात आव्हाड-पडळकरांचे कार्यकर्ते भिडले, जोरदार राडा)
कामगार व त्यांचे कुटूंबियांना गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवा देण्यासाठी राज्याला अधिक निधी देण्याची विनंती आरोग्य मंत्री आबिटकर यांनी केली. सद्यस्थितीत 21,000 हजार रुपये मासिक उत्पन्न असलेल्या कामगारांना विमा योजनेचा लाभ घेता येतो. ही उत्पन्न मर्यादा 30,000 हजार रुपयांपर्यंत वाढवण्याची मागणी यावेळी केली. उत्पन्नाची मर्यादा वाढवल्यास विमाधारक कर्मचाऱ्यांची संख्याही वाढेल तसेच अनेक कामगारांना या योजनेचा लाभ घेता येईल, असेही मंत्री आबिटकर यांनी केंद्रीय मंत्र्यांना सांगितले.
केंद्रीय मंत्री मांडविया यांनी वरील सर्व प्रश्नांच्या सोडवणुकीबाबतीत सकारात्मक चर्चा केली. तसेच राज्याचे आरोग्य मंत्री यांचे समवेत मुंबईतील अंधेरी येथील ईएसआयएस (ESIS) रुग्णालयास संयुक्त भेट देऊन पाहणी करणार असल्याचे सांगितले आहे. राज्यातील सर्व ईएसआयसी (ESIC) रुग्णालयांबाबत एक सविस्तर आढावा बैठक आयोजित करण्याच्या सूचनाही केंद्रीय मंत्र्यांनी यावेळी दिल्या.
(नक्की वाचा- Awhad Vs Padalkar: जितेंद्र आव्हाडांनी गोपीचंद पडळकरांन 'मंगळसूत्र चोर' का म्हटलं? काय आहे कारण?)
अंधेरी, कोल्हापूर आणि उल्हासनगर येथील ईएसआयसी (ESIC) रुग्णालयांची प्रलंबित कामे लवकरात लवकर पूर्ण करून ती कार्यान्वित करण्यासाठी ईएसआयसी महासंचालकांना सूचना देण्यात येतील, तसेच कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक येथील ईएसआयसी रुग्णालयाची श्रेणीवाढ करण्याबाबतही विचार केला जाईल, असे डॉ. मांडविया यांनी सांगितले. या भेटीमुळे महाराष्ट्रातील ईएसआयसी ESIC आरोग्य सुविधांच्या सक्षमीकरणाला गती मिळेल आणि विमाधारक कर्मचाऱ्यांसाठी उत्तम आरोग्य सेवा उपलब्ध होतील, असे आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी सांगितले.