प्रथमेश गडकरी
राज्यात गेल्या तीन दिवसांत पडलेल्या मुसळधार पावसाचा मोठा फटका भाजीपाल्याला बसला आहे. शेतांमध्ये भाजीपाला पाण्यात भिजल्याने मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. परिणामी, एपीएमसी मार्केटमध्ये येणाऱ्या भाजीपाल्याची आवक घटली आहे. पावसा आधी 600 ते 700 गाड्या मार्केटमध्ये होत्या. पण पावसानंतर बाजारात आता फक्त 400-450 गाड्यांचीच आवक होत आहे. त्याचा परिणाम भाजांच्या दरावरही झाला आहे. पावसाचा फटका आणि पुरवठ्यातील कमतरता लक्षात घेता, पुढील काही दिवस तरी भाजीपाल्याचे दर उच्चांकी राहण्याची शक्यता आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
या कमतरतेमुळे बाजारात आलेला भाजीपाला ओलसर आणि नाशवंत आहेत. ग्राहकांना याचा फटका भाजीपाला दरवाढीच्या स्वरूपात बसला आहे. अनेक भाज्यांचे दर दुप्पट झाले आहेत. तर काही भाज्यांनी शंभरी ओलांडली आहे. किरकोळ बाजारात शेवगा 160 रुपये प्रतिकिलोवर पोहोचला आहे. गवार, शिमला मिरची, फ्लॉवर यांसारख्या भाज्यांचे दर 100 ते 130 रुपयांच्या दरम्यान आहेत. त्यामुळे नवी मुंबईच्या एपीएमसी मार्केटमध्ये भाज्यांचे दर काय आहेत त्यावर एक लक्ष टाकूयात.
किरकोळ बाजारातील भाजीपाला दर (प्रति किलो)
- शेवगा 150-160 रुपये
- शिमला मिरची 100-110 रुपये
- फ्लॉवर 120-130 रुपये
- गवार 120-130 रुपये
- टोमॅटो 50-60 रुपये
- वांगी 60-70 रुपये
- गाजर 60-70 रुपये
- काकडी 60-70 रुपये
- भेंडी 80-90 रुपये
- कार्ली 80-90 रुपये
पालेभाज्यांचे दर (प्रति जुडी):
- कोथिंबीर 50 रुपये
- मेथी 50 रुपये
- पालक 50 रुपये